Sunday, December 13, 2020

बोधकथा -- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ


बोधकथा -- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ 
 
            एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर कावळ्याचे एक जोडपे घरटयात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप राहत होता. हा साप कावळ्याची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी. दरवेळी असे झाल्याने कावळा कावळी खूप दुःखी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा राहत होता. कावळ्याने त्याची भेट घेतली. सापाचा बंदोबस्त करण्यासाठी मदत मागितली. 
               कोल्ह्याने बराच विचार केला. त्याला एक युक्ती सुचली ती त्याने कावळ्याला सांगितली. एखादया श्रीमंत घराण्यात जाऊन मौल्यवान दागिना घेऊन ये व सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे ते तुझा पाठलाग करतीलच, प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू घेऊन जातील. कावळ्याला हा उपाय एकदम पटला. 
           कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावर काढून ठेवले होते. कावळ्याने त्यातला एक मौल्यवान हार उचलला व उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते. 
               कावळ्याने तो हार  बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई त्या बिळाजवळ आले व बीळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले व हार घेऊन निघून गेले. कावळा व कावळीची चिंता कायमची दूर झाल्याने ते आनंदी झाले व त्यांनी कोल्ह्याचे आभार मानले. अशा तऱ्हेने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली.
               









 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...