बोधकथा -- सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्याच्या पुरस्कार
एकदा सम्राट अशोकाने सर्वश्रेष्ठ शासकाला म्हणजेच राज्यकर्त्याला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या सर्व राज्यांच्या शासकांना निमंत्रण पाठवले. सारे शासक ठरल्यावेळी दरबारात हजर झाले. अशोकाने त्यांना त्यांच्या कामगिरीविषयी विचारले.
एक शासक म्हणाला कि, त्याच्या शासनकाळात राज्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. दुसऱ्या शासकाने सांगितले कि, त्याच्या काळात सुवर्णमुद्रांचे भांडार स्थापन केले आहे. तिसऱ्याने सांगितले कि, त्याने आधुनिक शस्त्रांची निर्मिती केली आहे. सर्वांनी आपली कामगिरी सांगितली.
शेवटी एक शासक पडत्या स्वरात म्हणाला, ना मी राज्याचा खजिना सुवर्णमुद्रांनी भरू शकलो ना उत्पन्न दुप्पट करू शकलो तसेच मी आधुनिक शस्त्रांची निर्मितीही केली नाही. उलट माझ्या शासन काळात राज्याचा खजिना कमी झाला आहे. मी खजिन्यातील धन शाळा आणि रुग्णालये उभारण्यासाठी खर्च केला आहे. माझ्या राज्यात वृक्ष लावण्यासाठी मी खूप खर्च केला आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्याचाही प्रयत्न केला आहे. यामुळे प्रजा आनंदी आहे. याशिवाय मी कोणतीही कामगिरी केली नाही.
सम्राट अशोकाने त्याला विजयी घोषित केले व सांगितले, "खरे तर तूच खरा सर्वश्रेष्ठ शासक आहे. प्रजेला सुखी बनवणे व त्यांना उपजीविकेची साधने मिळवून देणे हेच प्रत्येक शासकाचे कर्त्यव्य असते. बाकीच्या शासकांनी राज्यसत्ता बळकट होईल ते सारे मिळवण्याचा प्रयत्न केला व प्रजा कमकुवत केली हे मला मंजूर नाही. तू माझा आदर्श आत्मसात केला याचा मला आनंद वाटतो. इतर शासकांनीही या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे." हे ऐकून इतर शासकांनी लाजेने आपल्या माना झुकवल्या.
No comments:
Post a Comment