तुकाराम महाराज अभंग -- मैंद आला पंढरीस ।
मैंद आला पंढरीस । हाती घेऊनि प्रेमपाश ।। १ ।।
पुढे नाडियले जग । नेतो लागों नेदी माग ।। २ ।।
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधिताहे ।। ३ ।।
वैकुंठीहूनि पेणें । केलें पंढरीकारणे ।। ४ ।।
पुंडलिकें थारा । देऊनि आणिलें या चोरा ।। ५ ।।
तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ।। ६ ।।
पांडुरंग हा लबाड चोर आहे कारण तो भक्तांवर प्रेमाचे पाश टाकतो. भक्तसुद्धा त्याच्या प्रेमाच्या पाशात अडकतात म्हणजेच आपले घर संसार सोडून पांडुरंगाच्या प्रेमात पडतात. त्याची भक्ती करू लागतात. पांडुरंग आपल्या भक्तांना नादी लावतो, त्यांना वेडे करतो. भक्तांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करतो. भक्तही पांडुरंगासाठी वेडे होतात. भक्तीपोटी, प्रेमापोटी पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जातात. पांडुरंग पंढरीमध्ये आपल्या भक्तांची वाट बघत कटीवर हात ठेवून उभा राहिलेला असतो. जे भक्त त्याला भेटायला जातील त्या भक्तांना ज्या ठिकाणचा काही मागमूसही लागत नाही त्याठिकाणी घेऊन जातो म्हणजेच वैकुंठात घेऊन जातो.
पांडुरंग आपले बाहू (हात ) वर करून आपल्या भक्तांकडे प्रेमाने बघत असतो. आपल्या भक्तांना प्रेमाने मिठी मारायला बघत असतो. पांडुरंगाने आपल्या भक्तांच्या डोळ्यात डोळे मिसळवले म्हणजेच भक्तांच्या डोळ्यात प्रेमाने बघितले कि भक्ताला पांडुरंगाच्या डोळ्यात आपल्याबद्दलचे प्रेम दिसते. पांडुरंगाचे आपल्याबद्दलचे प्रेम बघून भक्त मनोमन सुखावतो. त्याला पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागते. कधी एकदा पांडुरंगाला भेटतो व प्रेमाने मिठी मारतो असे भक्ताला होते. पांडुरंगच आपल्या भक्तांना प्रेमाने मिठीत घेण्यासाठी दोन्ही बाहू वर करून उभा आहे व भक्तांकडे प्रेमाने बघत आहे व आपल्या भेटीसाठी भक्तांना वेध लावीत आहे.
आपल्या भक्तांना भेटता यावे, त्यांना प्रेमाने मिठीत घेता यावे यासाठी पांडुरंगाने वैकुंठातून येऊन पंढरीस मुक्काम केला आहे. याचाच अर्थ त्याचे आपल्या भक्तांवर अतोनात प्रेम आहे. अंतःकरणापासून भक्ती करणारे भक्त पांडुरंगाला आवडतात. या भक्तांवर पांडुरंग मनापासून प्रेम करतो, त्यांना फुलासारखे जपतो. त्यांना भेटता यावे, त्यांचा सहवास घडावा यासाठी पांडुरंगाने वैकुंठ सोडले व पंढरीस येऊन मुक्काम केला आहे.
विठ्ठल पुंडलिकाची भक्ती बघून त्याला भेटण्यासाठी पंढरपुरात आला. विठ्ठल पंढरपुरात आल्यावर त्याला काय दृश्य दिसले तर आपला आवडता भक्त आई वडिलांच्या सेवेत मग्न आहे. विठ्ठलाने पुंडलिकाला हाक मारली व सांगितले, "मी आलो आहे तुला भेटायला." पुंडलिकाने विठ्ठलाकडे बघितले व म्हणाला, "मी आई वडिलांची करीत आहे. ती सेवा होईपर्यंत मला उठता येणार नाही. माझी सेवा होईपर्यंत तुला थांबावे लागेल." असे म्हणून पुंडलिकाने विठ्ठलाच्या दिशेने एक वीट भिरकावली. विठ्ठल विटेवर उभा राहून पुंडलिकाची सेवा संपण्याची वाट बघत आहे. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा बघून विठ्ठल भारावला.
तुकाराम महाराज म्हणतात, चोराला पुंडलिकाने आणून आधार दिला आहे. म्हणजेच विठ्ठल स्वतः पुंडलिकाच्या भक्तीवर भाळून वैकुंठ सोडून पृथ्वीतलावर आला. पुंडलिकाने आपल्या भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला पृथ्वीतलावर आणले व त्याला पंढरीस स्थान दिले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही जाऊ व त्याला धरू. म्हणजेच भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला आपलेसे करू. त्याच्या हृदयात स्थान मिळवू. त्याचे प्रेम, माया मिळवू.
No comments:
Post a Comment