Friday, July 17, 2020

अमृत गाथा -- अभंग -- जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।।


अमृत गाथा -- अभंग -- जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।।

जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।। १ ।।
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।। २ ।।
वन पट्टण एकभावं । अवघा ठाव सरता झाला ।। ३ ।।
आठव नाही सुखदुःखा । नाचे तुका कौतुके ।। ४ ।। 

ओवी :  जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।। १ ।। पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।। २ ।।
अर्थ : जन अगर जनरहित सर्व आम्हाला विठ्ठलनामाप्रमाणे झाले आहेत. जिकडे पाहतो तिकडे विठ्ठल बाप व रखुमाबाई आई भरलेली असे दिसते. 
भावार्थ : तुकाराम महाराजांनी आपल्या संसाराचा, सुखी जीवनाचा त्याग करून विठ्ठलभक्तीतच आपले जीवन अर्पण केले. ते दिवस रात्र विठ्ठलनामात, भजन-कीर्तनात तल्लीन होऊ लागले. यासाठी त्यांनी भौतिक सुखांचा पुर्णपणे त्याग केला. ते एवढे विठ्ठलात सामावले कि त्यांना संपूर्ण जगच विठ्ठलमय भासू लागले. जिकडे पाहावे तिकडे त्यांना विठ्ठल आणि रखुमाबाई आई भासू लागले. त्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठल रखुमाई  उभे आहेत असे दिसू लागले. म्हणूनच ते म्हणतात कि, "जन अगर जनरहित सर्व आम्हाला विठ्ठलनामाप्रमाणे झाले आहेत. जिकडे पाहतो तिकडे विठ्ठल बाप व रखुमाबाई आई भरलेली असे दिसते."
ओवी : वन पट्टण एकभावं । अवघा ठाव सरता झाला ।। ३ ।। आठव नाही सुखदुःखा । नाचे तुका कौतुके ।। ४ ।।
अर्थ : वन असो अगर शहर असो आमचे मध्ये एकच भाव आहे. सर्व ठिकाणी योग्य असे पांडुरंगरूपच भासते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ह्या ऐक्यभावाच्या आनंदात कौतुकाने नाचतो. यामुळे आमचे चित्त सुखदुःखाच्या अनुभवाला विसरले आहेत. 
भावार्थ : तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात पांडुरंग एवढा साठवला आहे कि ते जिथे जातील तिथे त्यांना पांडुरंगाचे दर्शन झालेशिवाय राहात नाही. त्यांना सगळीकडे पांडुरंग आपल्या जवळ उभा आहे असे भासत असते. ते वनात जरी गेले किंवा शहरात गेले किंवा घरी जरी असले तरी पांडुरंगाच्या भक्तीत, त्याच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातात. त्याच्या भजन-कीर्तनात रमतात. त्यांना सर्व ठिकाणी पांडुरंगाचे सावळे, सुंदर रूप भासत असते. त्यांना कुठल्याही जागेचे बंधन नाही. त्यांच्या मनात फक्त पांडुरंग हाच एक भाव आहे. 
               तुकाराम महाराज विठ्ठलनामात, त्याच्या भक्तीत एवढे तल्लीन होतात कि त्यांना संपूर्ण जगच विठ्ठलमय भासते. सगळीकडे त्याचे मोहक, अतिसुंदर रूप भासत असते. विठ्ठलही त्यांची भक्ती पाहून भारावून जातो. त्यांना आपल्या हृदयात स्थान देतो. दोघेही एकमेकांच्यात कधी एकरूप होतात ते दोघांनाही कळत नाही. ह्या ऐक्यभावनेमुळे तुकाराम महाराज एवढे आनंदित होतात कि त्यांना संपूर्ण  जगाचा विसर पडतो. ह्या ऐक्यभावनेमुळे त्यांचे  मन आनंदाने व कौतुकाने  नाचू लागते. त्यांचे मन विठ्ठलनामामुळे एवढे भारावलेले असते कि ते त्यांच्या देहाला विसरून जातात. भौतिक सुखदुःखाला विसरून जातात. विठ्ठलनाम हेच सुख मानू लागतात.


















 


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...