Monday, July 13, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गातां गीतीं ।।

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- विठ्ठल हा चित्ती । गोड  लागे गातां गीतीं ।।

विठ्ठल हा चित्ती । गोड  लागे गातां गीतीं ।। १ ।।
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ।। २ ।।
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ।। ३ ।। 
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।। ४ ।।

ओवी : विठ्ठल हा चित्ती । गोड  लागे गातां गीतीं ।। १ ।।
           आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ।। २ ।।
अर्थ : श्रीविठ्ठलाचे नाव व गाणे चित्तास गोड लागते. आमचे जीवन एक विठ्ठलच असून टाळ चिपळ्या हेच काय ते आमचे धन आहे. 
भावार्थ : विठ्ठल भक्तीत एवढी जादू आहे कि माणूस स्वतःला हरवून जातो. विठ्ठलाचे नाव जरी घेतले तरी मनाला समाधान वाटते. मन प्रसन्न, आनंदी होते. विठ्ठल आपल्याबरोबर असून साऱ्या चिंता तो मिटवत आहे असे वाटते. म्हणूनच निश्तिन्त मनाने घेतलेले विठ्ठलाचे नाव व गाणे (विठ्ठलाचे गायलेले भजन-कीर्तन) मनास (चित्तास) गोड लागते. मन प्रफुल्लित होते. 
         एकदा विठ्ठलभक्तीत, नामस्मरणात मन रमले कि मनात विठ्ठलाशिवाय दुसरे कुठलेही विचार येत नाहीत. मनात विठ्ठलाचे नाव असले कि मनातील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती दूर पळून जातात. आपल्या अंतःकरणात विठ्ठल आपले स्थान निर्माण करतो. तुकाराम महाराजही आपल्या साऱ्या चिंता, विवंचना विसरून विठ्ठलभक्तीत, नामस्मरणात एवढे रमले कि, ते पुर्णतः विठ्ठलमय झाले. त्यांच्या जीवनात विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला (सांसारिक गोष्टींना) स्थान नव्हते. हातात टाळ व चिपळ्या घ्यायच्या व  भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात विठ्ठलनामात रंगून जायचे किंवा एखाद्या मंदिरात जाऊन भजन-कीर्तन करायचे व त्यात स्वतःला हरवून जायचे. हाच त्यांचा दिनक्रम असायचा. टाळ व चिपळ्या हेच त्यांचे साधन होते. म्हणूनच ते म्हणतात कि, "टाळ व चिपळ्या हेच आमचे धन आहे."
ओवी : विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ।। ३ ।। 
           रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।। ४ ।।
अर्थ :  श्रीविठ्ठल हे शब्द केवळ संजीवनी अमृतच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलरंगानेच मी सर्वांगाने रंगून गेलो. 
भावार्थ : तुकाराम महाराज जसजशे विठ्ठलभक्तीत रमू लागले तसे त्यांच्या  संसाराच्या साऱ्या चिंता मिटू लागल्या. संसारातील पाशातून मुक्ती मिळाली. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तींमुळे ते दुःखी झाले होते. जीवनातील त्यांचा रसच संपून गेला होता परंतु विठ्ठलभक्तीमुळे, नामस्मरणामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मोह, माया, मत्सर, क्रोध, अहंकार या गोष्टींपासून अलिप्त झाले. त्यांनी आपले जीवनच विठ्ठलाला अर्पण केले. ते पुर्णतः विठ्ठलमय झाले, विठ्ठलाशी  एकरूप झाले. 
विठ्ठलामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. ते संतपदापर्यंत पोचले. विठ्ठलाचे भजन-कीर्तन करणे, नामस्मरण करणे, त्याची सतत भक्ती करणे हाच त्यांचा दररोजचा नित्यक्रम चालू झाला व यातूनच त्यांना आनंद मिळू लागला. जगातील इतर क्षणिक सुखांपेक्षा कितीतरी पटींनी विठ्ठलनामामुळे सुख प्राप्त झाले. म्हणूनच ते म्हणतात कि, "श्रीविठ्ठल ह्या एका शब्दापुढे सर्व सुखे फिकी पडतात." श्रीविठ्ठल या शब्दातच एवढे चैतन्य साठवले आहे कि हे नाव घेतले कि साऱ्या चिंता मिटून जातात, दुःखे नाहीशी होतात. संकटे कुठल्याकुठे पळून जातात. श्रीविठ्ठल म्हणजे पर्मोच आनंद आहे. जीवनामृत आहे. विठ्ठलनामातच मधुर रस आहे. हा रस कितीही प्याला तरी समाधान होत नाही. मन तृप्त होत नाही. तुकाराम महाराजांनी तर विठ्ठलनामाला संजीवनी अमृतच म्हणले आहे. यावरूनच विठ्ठलनामाची किती महती आहे हे दिसून येते. 



































 












 














 

1 comment:

  1. अगदी समर्पक असा अभगाचा भाव मांडला
    धन्यवाद

    ReplyDelete

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...