Saturday, July 11, 2020

तुकाराम महाराज गाथा अभंग -- पंढरीचा महिमा ।



तुकाराम महाराज गाथा अभंग -- पंढरीचा महिमा ।

पंढरीचा महिमा । देतां आणिक उपमा ।। १ ।।
ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभीं भेटे ।। २ ।।
आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ।। ३ ।।
तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ।। ४ ।।

ओवी : पंढरीचा महिमा । देतां आणिक उपमा ।। १ ।।
           ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभीं भेटे ।। २ ।।
अर्थ : पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमाच देता येत नाही. कारण ह्यासारखे त्रैलोक्यात दुसरे ठिकाण नाही. येथे देव तत्क्षणीच भेटतो. 
भावार्थ : तुकाराम महाराज या ओवीतून पंढरीचा महिमा वर्णन करताना सांगतात कि, पंढरीमध्ये सर्व जनांचा देव तो विठ्ठल राहत असल्याने सर्व तीर्थाहूनही पंढरी श्रेष्ठ झालेली आहे. म्हणूनच दर आषाढी-कार्तिकी एकादशीला सर्व जाती धर्माचे, गरीब-श्रीमंत लाखोहून अधिक भाविक देवाला भेटण्यासाठी  पंढरीला जातात. ह्या तिन्ही लोकात (आकाश, जमीन व पाताळात) पंढरीसारखे दुसरे पवित्र ठिकाण नाही. येथे अंतःकरणापासून देवाची भक्ती केली कि देव लगेच दर्शन देतो. तो आपल्या भक्तांच्यात भेदभाव करत नाही. 
 ओवी : आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ।। ३ ।।
            तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ।। ४ ।।
अर्थ : बाकीची सर्व तीर्थे कालांतराने फळ देणारी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हि पंढरी पेठ पृथ्वीवर साक्षात वैकुंठच आहे. 
भावार्थ : पंढरीचा देव (विठ्ठल) सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. त्याच्यावर दृढ श्रद्धा असली कि तो भक्तांना संकटातून मुक्त करतो. त्याची मनापासून भक्ती केली, त्याचे नामस्मरण घेतले कि लगेच दर्शन देतो. म्हणूनच गोरगरीब जनता विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात कारण त्यांना माहित असते कि देवापुढे आपले गाऱ्हाणे गायले कि देव लगेच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार म्हणूनच भाविक इतर तीर्थक्षेत्रांना न जाता पंढरपूरला जातात. 
          तिथे भाविकांचा मेळा भरलेला असतो. सर्व भक्त मंडळी विठ्ठलनामात दंग असतात व भजन कीर्तनात रंगून गेलेले असतात. तिथे विठ्ठलनामाचा गजर चालू असतो. प्रत्येकजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो. तिथले वातावरण भक्तिमय व पवित्र व निर्मळ झालेले असते. पांडुरंगाची सुशोभित केलेली मूर्ती व पंढरीचा सोहळा बघून तिथे जणू काही स्वर्गच अवतरला आहे असे वाटते. म्हणूनच तिथला सोहळा बघून तुकाराम महाराज म्हणतात, हि पंढरी म्हणजे पृथ्वीतलावर उतरलेला स्वर्ग (वैकुंठ) आहे.




























     

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...