गोष्ट -- श्रमाशिवाय दुसरे सुख नाही
एक आटपाट नगर होतं. या नगरीतील प्रजा खाऊन पिऊन सुखी होती. राजाला प्रजेची किंवा शत्रूची धास्ती नव्हती. खाणे, पिणे आणि संगीत ऐकणे एवढेच काम राजाला होते. एकूण राजाचे आयुष्य मौज मजेत चालले होते. एके दिवशी राजा आजारी पडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना कि सुखाची झोप येईना. लगेच राजावर उपचार चालू झाले. बरेच हकीम, वैद्य यांना बोलावून त्यांचे औषधपाणी चालू केले. परंतु त्यांच्या औषधांचा गुण काही राजाला आला नाही. शेवटी जो कोणी राजाला बरे करेल त्याला बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले.
हि दवंडी ऐकून बऱ्याच जणांनी राजाला बरे करण्याचे प्रयत्न केले. परंतु कुणालाही यश आले नाही. एके दिवशी एक वृध्द गृहस्थ गावात आला असता त्याच्या कानावर हि दवंडी पडली. मग तो राजाकडे गेला व राजाला म्हणाला, "महाराज, मी तुम्हाला बरे करतो, पण माझे तुम्हाला ऐकावे लागेल. हे ऐकून राजा आनंदित झाला व तो इसम सांगेल तसे करण्यास राजा तयार झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघेही माळरानावर गेले. वृध्द गृहस्थाने राजाच्या हाती कुदळ दिली व राजाला एक मोठी विहीर खोदायला सांगितले. राजाने विहीर खोदायला सुरवात केली. दिवसभर विहीर खोदून राजाला दमायला व्हायचे. दिवसभर श्रम केल्यामुळे राजाला रात्री सटकून भूक लागायची त्यामुळे त्याला जेवण जायला लागले. तसेच शारीरिक कष्ट केल्यामुळे रात्री व्यवस्थित झोपही मिळायला लागली. त्यामुळे राजाचा आजार कुठल्याकुठे पळाला व राजा ताजातवाना दिसू लागला. शारिरीक कष्ट केल्यामुळे आरोग्य उत्तम राहते हे राजाला कळून चुकले. आपला आजार बरा केल्याबद्दल त्याने वृध्द गृहस्थाला योग्य बक्षीस दिले.
No comments:
Post a Comment