Saturday, January 11, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तीळ जाळिले तांदूळ ।


तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तीळ जाळिले तांदूळ ।

तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। १ ।।
का रे सिणलासी वाऊगा । न भाजता पांडुरंगा ।। २ ।।
मानदंभासाठी । केली अक्षरांची आटी ।। ३ ।।
तप करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। ४ ।।
वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। ५ ।।
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। ६ ।।

ओवी : तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। १ ।।
अर्थ : अग्नीत तीळ तांदूळाचे हवन करणाऱ्या करणाऱ्या साधकांना तुकाराम महाराज सांगतात कि, अरे मुख्य पीडक जे कामक्रोधातीक विकार ह्या खळांना जसेचे तसे ठेवून बाहेरचे गरीब तीळ तांदूळ यांना का जाळतोस?
भावार्थ : या ओवीतून तुकाराम महाराजांना असे म्हणायचे आहे कि, बरेच लोक आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी होम-हवन करतात. आपल्या स्वार्थासाठी या होमामध्ये तीळ, तांदूळ, लाकूड इ. टाकतात. काही वेळा पशु पक्ष्यांचा बळी दयायला कमी करत नाहीत. तुकाराम महाराजांना हे खोटेपणाचे व दांभिकपणाचे कृत्य वाटते. या कृत्यापासून पुण्य व मनाला शांती मिळणेऐवजी पशुहत्येचे पाप मात्र लागते.  तसेच तीळ तांदूळ जाळल्याने मन:शांती मिळते हा लोकांचा भ्रम आहे. कारण आपल्या शरीरात क्रोध, कपट, असत्याने वागणे, मत्सर, वासना इ. मनाला पीडा देणारे विकार आहेत तोपर्यंत मनाला शांती मिळणार नाही. तुकाराम महाराजांच्या मते मनःशांती मिळवण्यासाठी अग्नीत तीळ-तांदूळ जाळण्याऐवजी शरीराला पीडा देणारे कामक्रोधादिक विकारांना जाळावे.
ओवी : का रे सिणलासी वाऊगा । न भाजता पांडुरंगा ।। २ ।। मानदंभासाठी । केली अक्षरांची आटी ।। ३ ।।
अर्थ : अरे, एका पांडुरंगाला न स्मरता ह्या व्यर्थ खटाटोपाचा का शीण घेतोस ? ग्रंथाक्षरांचे जे पाठ पाठांतर केलेस ते केवळ मान मिळावा व दंभ वाढवावा एवढ्याचकरीता. 
भावार्थ : काही लोक पुण्य पदरात पडावे व मनःशांती मिळावी यासाठी मोठं-मोठे होम, यज्ञ करतात. तसेच मोठमोठाले ग्रंथ वाचतात. त्याचे पाठांतर करतात. तुकाराम महाराजांच्या मते हा केलेला खोटा व व्यर्थ खटाटोप आहे. यातून देवाची भक्ती होण्याऐवजी स्वतःचे नाव मात्र होईल. ग्रंथाचे पाठांतर केल्याने सगळे जग वाहवा करील. एकदा जगाने वाहवा करायला सुरवात केल्यावर 'माझ्या सारखा मीच' असा अहंकार अंगी येईल. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, ग्रंथाचे पाठांतर करण्यापेक्षा पांडुरंगाचे स्मरण केल्यावर, त्याचे नामःस्मरण घेतल्यावर मनःशांती मिळते. 
ओवी : तप करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। ४ ।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। ५ ।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। ६ ।।
अर्थ : नानाप्रकारे तप तीर्थाटन करून त्या विषयीचा अभिमान तू आपल्या ठिकाणी वाढता केलास. त्याचप्रमाणे दुसऱ्याला द्रव्य-दान देऊन मी मोठा दाता अशा अहंतेचे मात्र रक्षण केलेस. 
भावार्थ : या अभंगातून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि, नुसते तप करून किंवा तीर्थक्षेत्रे फिरून मोक्ष मिळत नाही. त्यासाठी देवाची बरीच आराधना करावी लागते. मनापासून देवाची भक्ती करावी लागते. काही लोक बरेच तप करतात. तीर्थक्षेत्रे फिरतात. पण ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. स्वतःचा अभिमान बाळगण्यासाठी. यात यःकिंचितही भक्तीचा लवलेश नसतो. हे केलेले वरवरचे ढोंग असते. तसेच काहीजण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी दानधर्म करतात. पण जो भुकेला आहे अशा लोकांना लाथेने तुडवतात. ज्याला खरंच अन्न वस्त्राची गरज आहे अशांकडे दुर्लक्ष करतात. ज्याला द्रव्याची किंमत नसूनही दिखावा करण्यासाठी दानधर्म करतात व मी दाता आहे असे मिरवतात. तुकाराम महाराजांच्या मते असे स्वार्थी व ढोंगी लोक असे अधर्म कृत्य करून व चुकीच्या मार्गाने गेल्याने त्यांना मोक्ष व आत्मप्राप्ती होत नाही.


















 




































 



 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...