Saturday, December 14, 2019

स्वराज्याचे शिलेदार -- तानाजी मालुसरे


स्वराज्याचे शिलेदार -- तानाजी मालुसरे 

          तानाजी मालुसरा, उमरठ्याचा निधडया छातीचा वीर. महाराजांचा लाडका दोस्त. तानाजीने आपल्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न ठरवले. त्याचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी शिवाजी महाराजांकडे आला. त्याने शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्यातील कोंढाणा किल्ल्याबाबत चर्चा ऐकली. त्याने शिवाजी महाराजांना सांगितले कि कोंढाणा किल्ला मी घेणार. या कामगिरीवर मी जाणार. शिवाजी महाराज त्याला म्हणाले, "अरे तुझ्या मुलाचे लग्न आहे ते महत्वाचे. या कामगिरीवर दुसऱ्या कुणाला तरी पाठवता येईल." तानाजी महाराजांना म्हणाला, "आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे. हि कामगिरी फत्ते करून येईन मगच रायबाचे लगीन लावीन." असे म्हणून कोंढाणा किल्ला घ्यायचा विडा त्याने उचलला. महाराजांच्या पायावर त्याने शब्द वाहिला. त्याच्या मदतीला त्याचा भाऊ सुर्याजी उभा राहिला. 
          तानाजी बरोबर पाचशे मावळ्यांची फौज निघाली. गडाचा आकार कुऱ्हाडीसारखा होता. गडाला दोन दरवाजे होते, एक पुणे दरवाजा व दुसरा कल्याण दरवाजा. गडाला उभे सरळ कडे होते. तटबंदी पक्की होती. आत जायलाही जागा नव्हती. वद्य नवमीच्या काळ्या कुट्ट अंधारात तानाजी व सूर्याजी कडा चढून गडावर आले. शिपायांना संशय आला. त्यांनी आरडाओरडा केला. त्यासरशी मावळे 'हर हर, हर हर महादेव' म्हणून शत्रूवर तुटून पडले. तानाजी व उदयभान यांच्यात घनघोर लढाई चालू होती. दोघेही त्वेषाने लढत होते, एकमेकांवर तुटून पडले होते. तलवारीचे घावावर घाव पडत होते. आणि.....घात झाला ! उदयभानाच्या तलवारीच्या एका घावेने तानाजीच्या ढालीचे दोन तुकडे झाले. त्याही परिस्थितीत तानाजी हातावर वार झेलत लढत होता. दोघांनीही एकमेकांवर वज्रघाती घाव घातले. दोघेही धारातीर्थी पडले. तानाजी पडल्याची हाक उठली. त्यामुळे सर्व मावळे सैरावैरा पळू लागले. सुर्याजीला तानाजी पडल्याचे कळले तसा तो चवताळून म्हणाला, "अरे इथे तुमचा बाप मरून पडला आणि तुम्ही भ्याडासारखे पाळता कुठे ? चला माघारी फिरा." हे शब्द कानी पडताच मावळे त्वेषाने लढू लागले आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना जेव्हा हि बातमी कळली तेव्हा गड आला त्याचा आनंद झाला पण त्यांचा जीवाभावाचा दोस्त गेला त्याचे दुःख झाले. शिवाजी महाराजांना गड मिळाला पण निधडया छातीचा सिंह गमावला. म्हणून शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले. 
 
























 

























 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...