Sunday, December 1, 2019

जनादेशाचा अवमान

         


निवडणुकीआधी 


निवडणूकीनंतर 
जनादेशाचा अवमान 

          आताच्या निवडणुकीत राज्यातील लोकांनी भाजप सेना युतीला बहुमत देऊन सत्ता स्थापन करण्याची संधी दिली होती. भाजपला १०५ जागा म्हणजेच सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर बसावे लागले तर शिवसेनेला राष्ट्रवादी  काँग्रेस व काँग्रेस यांचे बरोबर हातमिळवणी   करून सत्ता स्थापन करावी लागली आहे. खरं तर भाजप सेना सत्तेवर येवून राहिलेली कामे मार्गी लागतील व दोघे मिळून चांगल्या प्रकारे राज्य चालवतील असा जनादेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना तर बहुमत नसतानासुध्दा सत्तेत यावे लागले आहे. 
          या घडामोडींना भाजप व शिवसेना जबाबदार आहेत. भाजपने आमचाच मुख्यमंत्री हवा, शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद देणार नाही हा हट्टाहास केला तर शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसली. भाजप सेनेने यावर तोडगा काढणेऐवजी दोघेही मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसले व जनतेने दिलेली सत्तास्थापनेची सोन्यासारखी संधी गमावून बसले. 
         राज्यातील लोकांना यावेळी गलिच्छ राजकारण बघायला मिळाले. निवडणुकीआधी चारही पक्ष एकमेकांवर शिंतोडे उडवत होते, उकाळ्या पाकळ्या काढत होते, खालच्या थराला जावून निंदानालस्ती करत होते. तेच पक्ष नंतर सत्तास्थापनेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत होते, हात मिळवणी करत होते. भाजपने राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेवून सत्ता स्थापन केली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो हे चारही पक्षांनी दाखवून दिले आहे. या सत्ता स्थापनेच्या खेळात जनता मात्र मुर्ख ठरली आहे. चारही पक्षांनी मिळून जनतेच्या मतांचा अपमान केला आहे. जनादेशाचा अवमान केला आहे.

 संतोष वसंत जोशी 
सायली रेसिडन्सी, गंगापुरी
वाई, जिल्हा सातारा

















 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...