Saturday, November 16, 2019

गोष्ट -- सर्वात श्रेष्ठ कोण ?


जल 
वायू 

अग्नी 
गोष्ट -- सर्वात श्रेष्ठ कोण ?

          एकदा जल, वायू, अग्नी हे देव गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता सर्वात श्रेष्ठ कोण ? या विषयावर त्यांचे भांडण चालू झाले. जल म्हणाला, "मी पाऊस पडतो. पावसामुळे नदी नाल्याना पाणी येते. सर्व प्राणिमात्रांना प्यायला पाणी लागते. पाणी नसेल तर या पृथ्वीतलावर कोणी जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळे मी श्रेष्ठ." वायू म्हणाला, "माझ्यामुळे सगळीकडे हवा खेळली जाते. मी लोकांना व प्राण्यांना श्वास घ्यायला मदत करतो. मी जर हवा वाहणे बंद केले तर भूतलावरील सर्व प्राणीमात्र श्वासाविना गत:प्राण होतील. त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ." दोघांचे भांडण ऐकून अग्नीला राहवले नाही. तोही म्हणाला, "खरं तर या जगात मी श्रेष्ठ. माझ्यामुळे सर्वांना प्रकाश मिळतो. सर्वांचा अंधार दूर करतो त्यामुळे मी श्रेष्ठ." असे तिघांचे भांडण चालू होते. 
          तिथून एक तेजस्वी पुरूष चालला होता. त्या तिघांनी त्याला पाहिले व अडविले. तिघेही त्याला म्हणू लागली कि आमच्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण ? तेजस्वी पुरूषाने तिघांना एकदा न्याहळले. मग त्याने एक युक्ती केली. आपल्याजवळील एक छोटीसी वस्तू काढून ठेवली व अग्नीला म्हणाला, तू जर श्रेष्ठ असशील तर हि वस्तू जाळून दाखव. अग्नी म्हणाला, त्यात काय ? मी अख्खे ब्रम्हांड जाळू शकतो. हि वस्तू जाळायला मला काहीच वाटणार नाही. असे म्हणून त्याने ज्वाळांचे प्रचंड झोत त्या वस्तूवर टाकले. परंतु ती वस्तू काही अग्नीला जाळता आली नाही. वायुनेही आपली सर्व शक्ती एकवटून ती वस्तू हलवण्याचा प्रयत्न केला परंतू ती वस्तू काही जागची हलली नाही. पाण्यानेही प्रचंड लाटा निर्माण करून ती वस्तू बुडवण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही प्रयत्न निष्फळ ठरले. ते अहंकारी देव खजील झाले. तेजस्वी पुरूषाला शरण गेले. तेव्हा तेजस्वी पुरूष म्हणाला, "असे मी श्रेष्ठ म्हणून भांडता कसले ? खरे तर या जगात कोणीच श्रेष्ठ नाही कि कनिष्ठ नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करीत असतो. प्रत्येकाजवळ कुठली ना कुठली क्षमता, ताकत, गुण असतात. हे सर्व ओळखून त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद रहाणार नाही. एवढे बोलून तो तेजस्वी पुरूष अंतर्धान पावला. 

तात्पर्य : नेमून दिलेले कुठलेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा भेद न करता  आनंदाने करावे.



















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...