तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सावळे मनोहर कैं देखेन ।।
गरुडाचे वारिके कसे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ।। १ ।।
बरविया बरवंटा घनमेघ सावळा । वैजयंती माळा गळां शोभे ।। २ ।।
मुगुट माथां कोटी सूर्याचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ।। ३ ।।
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ।। ४ ।।
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ।। ५ ।।
तुका म्हणे नव्हे आणिकां सारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ।। ६ ।।
तुकाराम महाराजांची विठ्ठलावरील भक्ती पराकोटीला पोचलेली आहे. त्यांच्या मुखातून सतत विठ्ठलाचे नामस्मरण चालू असते. ते भजन कीर्तनही विठ्ठलाचेच गात असतात. त्यांचे सर्व सुख आता विठ्ठल झाला आहे. त्यांना आता विठ्ठलाशिवाय कशातच सुख दिसत नाही. विठ्ठल आता त्यांचा सखा झाला आहे. म्हणूनच ते विठ्ठलाजवळ सतत गाराने गात असतात. विठ्ठलाजवळ हट्ट करत असतात. विठ्ठलसुद्धा त्यांचा हट्ट प्रेमाने पुरवत असतो. त्यांचे व विठ्ठलाचे एक अलौकिक नाते तयार झाले आहे.
तुकाराम महाराजांनाही आता विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. कधी एकदा विठ्ठलाचे गरुडरूपी घोडयावर आरूढ झालेले, कासेला(कंबरेला) पीतांबर नेसलेले, मनाला हरण करणारे असे शामसुंदर रूप केव्हां पाहीन असे तुकाराम महाराजांना झाले आहे.
तुकाराम महाराजांनी या अभंगात विठ्ठलाचे वर्णन किती सुंदर केले आहे. ते म्हणतात, उत्तमात उत्तम असे मेघासारखे शाम असणारे व त्याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. मस्तकावर कोटीसूर्याच्या तेजाप्रमाणे चकाकणारा असा मुकुट परिधान केला आहे व गळ्यामध्ये निर्मळ कौस्तुभमणी शोभत आहे. श्रीमुख सर्व सुखाच्या रसाचे केवळ ओतले आहे म्हणजेच विठ्ठलाचे मुख(श्रीमुख) पाहिल्यावर सर्वसुखाचा आनंद प्राप्त होतो. विठ्ठलाच्या डाव्या हाताला वामांगी रखुमाईदेवी उभी आहे. दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर उभे राहून विठ्ठलाची कीर्ती वर्णन करीत आहेत. पोवाडे गात आहेत. असा अन्य कोणासारखाही म्हणता येणार नाही असा तोच माझा प्रिय सखा पांडुरंग आहे.
No comments:
Post a Comment