लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
टिळक लहान असतानाची गोष्ट वर्गात काही टारगट मुलांनी शेंगा खाऊन फोलपटे इतरत्र टाकली. गुरुजी वर्गात आले. त्यांनी पडलेली फोलपटे पाहिली. ते खूप चिडले. त्यांनी प्रत्येक मुलाला विचारून फोलपटे उचलायला लावली. ते टिळकांजवळ आले व टिळकांना विचारले की तू शेंगा खाल्ल्या का? टिळक न घाबरता म्हणाले कि, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपटे उचलणार नाही. असे लहानपणापासून बाणेदार असलेले टिळक मोठेपणी श्रेष्ठ दर्जाचे राष्ट्रीय चळवळीचे नेते, मुत्सद्दी राजकारणी, प्रभावशाली पत्रकार तसेच तत्वज्ञही झाले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ज्यांची ज्यांची नोंद झाली किंवा ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यात लोकमान्य टिळकांचे नाव प्रथम घेता येईल.
लोकमान्य टिळकांचा जन्म १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले. त्यांच्याकडे अफाट कार्यक्षमता, तेजस्वी विचार, संघटनचातुर्य, असामान्य धैर्य व मुत्सद्दीगिरी हे गुण होते. या गुणांमुळेच त्यांनी भारतीय जनतेच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. लोकमान्य टिळकांनी पाहिले कि इंग्रज सरकार अशिक्षित जनतेवर अन्याय करीत आहेत. त्यांनी मग लोकांना शिक्षण दयायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. त्यात तरुण मुलांना शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्याचेही महत्व पटवून दयायला सुरवात केली. तसेच त्यांनी गावोगावी सभा घेऊन गावातील लोकांना व तरुण मुलांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून दयायला सुरवात केली.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या मंत्राने त्यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या जनतेला जागे केले. त्यासाठी त्यांनी लोकांना शिक्षण दयायला सुरवात केली तसेच परदेशी मालावर बहिष्कार टाकला व स्वदेशी मालाचा पुरस्कार करायला सुरवात केली. लोकांनी एकत्र यावे व स्वातंत्र्याचे महत्व पटावे यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व छत्रपती शिवाजीमहाराज जयंती साजरी करायला सुरवात केली. ते इंग्रज सरकार विरोधात जहाल बोलत असत तसेच त्यांचे लेखनही जहाल होते. लोकशिक्षणासाठी त्यांनी 'केसरी' व 'मराठा' हि वर्तमानपत्रे चालू केली.
या वर्तमानपत्रातून ते इंग्रज सरकार विरोधात जहाल लेखन करू लागले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला. आपल्या जहाल देशप्रेमी विचारांनी त्यांनी सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षे मंडाले येथे तुरुंगात खितपत पडावे लागले. या काळातही त्यांनी लेखन सोडले नाही. या तुरुंगवासातही त्यांनी लोकांना समजेल असा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.
त्यांच्या जहाल वक्तव्यामुळे व लेखणीमुळे त्यांनी भारतीय लोकांच्या असंतोषाला वाचा फोडून इंग्रज सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ उभारली म्हणूनच त्यांना 'राजकीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असत. त्यांनी आपले सारे जीवन स्वातंत्र्यासाठी व जनतेच्या उद्धारासाठी घालवले. म्हणून लोकांनी त्यांना सन्मानाने 'लोकमान्य' हि पदवी दिली.
होमरूल लीग चळवळीत भाग, विलायतचा प्रवास व जनजागृतीसाठी देशभर प्रवास या दगदगीने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. त्यांची प्रकृती खालावत चालली. शेवटपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढत असताना त्यांना १९२० साली मृत्यूने कवटाळले.
No comments:
Post a Comment