Monday, April 22, 2019

तुकाराम महाराज गाथा, अभंग -- कर कटावरी तुळशीच्या माळा ।

तुकाराम महाराज गाथा, अभंग -- कर कटावरी तुळशीच्या माळा ।

कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ।। १ ।।
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ।। २ ।।
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती ।। ३ ।।
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेंचि रूप ।। ४ ।।
झुरोनी पांजरा होऊं पाहे आता । येई पंढरीनाथा भेटावया ।। ५ ।।
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करू नये ।। ६ ।।

          
           तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीत अखंड बुडालेले आहेत. त्यांना विठ्ठल भक्तीशिवाय दुसरे काही सुचत नाही. त्यांच्या मुखातून सतत विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. त्यांच्या डोळ्यापुढे सतत विठ्ठलाचे रूप दिसत असते. त्यांना विठ्ठल भेटीची आस लागलेली आहे. कधी एकदा विठ्ठलाला भेटतो आणि त्याचे मूर्त रूप डोळ्यात साठवतो असे त्यांना झाले आहे. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "हे हरी, कंबरेवर हात आहेत आणि गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. दोन्ही पाय विटेवर ठेविले आहेत असे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पीतांबराची कास शोभत आहे अशी तुझी मूर्ती त्वरेने दाखव."
          तुकाराम महाराजांना आता विठ्ठलाला भेटायची आस लागलेली आहे. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "गरुडाच्या पारावर उभे राहिलेले असे तुझे रूप माझ्या मनात आठवते. त्याच विषयीच्या झुरणीने शरीर अस्थिपंजर होऊं पाहात आहे. ह्याकरिता पंढरीनाथा भेटावयास या. माझी एवढी आशा पूर्ण करा. ह्या प्रार्थनेचा अव्हेर करू नका."
 









 










 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...