Friday, April 26, 2019

कथा -- सर्जा राजा

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

कथा -- सर्जा राजा 

         
          शिरपानं आज सर्जा राजाला गुरांच्या बाजारात विकायला आणले. त्यांना विकायला आणताना शिरपाच्या व त्याच्या साऱ्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी येत होते. सर्जा राजावर साऱ्या कुटुंबाचा जीव जडला होता. त्यांच्या काळजाचा तुकडाच होते ते. भीषण दुष्काळामुळे ह्याच काळजाच्या तुकडयाला शिरपान बाजारात विकायला आणलं. सर्जा राजाची बाजारात बोली लावताना शिरपाच्या डोळ्यात पाणी येत होते. त्याचा कंठ दाटून दाटून येत होता.  सारखा सर्जा राजाच्या पाठीवर थाप मारीत होता. त्याची व सर्जा राजाची शेवटची भेट होती. यापुढे सर्जा राजा कधीही त्याच्या गोठयात दिसणार नव्हते. सर्जा राजाशिवाय त्याचा गोठा रिकामा राहणार होता. शिरपाला मागील सारे दिवस आठवू लागले. 
          पाच वर्षापूर्वी याच बाजारातून शिरपानं हि बैलजोडी खरेदी केली. शिरपानं हि बैलजोडी घरी आणली तेव्हां घरातील सर्वांना आनंद झाला होता. शिरपाच्या बायकोने बैलजोडीला ओवाळले. बैलजोडी घरात आली म्हणून गोडाधोडाचे जेवण केले. बैलांनाही खाऊ घातले. घरातील मुले बैलांपाशी घुटमळू लागली तर माणसे  प्रेमाने बैलांच्या पाठीवर हात फिरवू लागली. बैलांचे नाव काय ठेवायचे यावर घरात चर्चा रंगली. शेवटी सर्जा राजा हे नाव ठेवले गेले. 
          शिरपा जातीनं या बैलांची काळजी घेऊ लागला. त्यांना वेळेवर चारा पाणी देऊ लागला. शिरपा सर्जा राजाला रानात घेऊन जावू लागायचा तेव्हा रस्त्यावरचे लोक या जोडीकडे डोळे विस्फारून बघायचे. 'शिरपाला हि उमदी जनावरं कुठून मिळाली?' हे आश्चर्यकारक भाव त्यांच्या डोळ्यात दिसायचे. लोक जेव्हां या जोडीकडे बघायचे तेव्हां शिरपाची छाती अभिमानाने फुलून यायची. शिरपा मग प्रेमाने बैलांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारायचा. शिरपाने कधी बैलांना आसूडाने मारले नाही. आपल्या मुलांप्रमाणे शिरपाने बैलांवर प्रेम केले, त्यांना सांभाळले. बैलांनाही शिरपाचा चांगला लळा लागला होता. 
          बैलपोळ्याच्या दिवशी तर शिरपाचे घर आनंदाने भरून गेले होते. घरातील वातावरण उत्साही झाले होते. शिरपाच्या बायकोने तर सकाळी लवकर उठून गोडाधोडाचे जेवण करायला घेतले होते. आज शिरपाच्या घरात पुरणपोळीचा बेत होता. कारण आज सर्जा राजाचा पहिला बैलपोळा होता. त्यामुळे घरातील सर्वांच्यात उत्साहाचे उधाण आले होते. शिरपा तर सकाळपासूनच बैलांना सजवायला लागला होता. त्याने आपल्या मनाप्रमाणे बैलांना सजवले. सजवलेल्या बैलांकडे बघून शिरपाच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली होती. 
          संध्याकाळी गावातील शेतकऱ्यांनी बैलांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. शिरपाची बैलजोडी चांगलीच उठून दिसत होती. उमदया बैलजोडीमुळे मिरवणुकीचा पहिला मान शिरपाला मिळाला. सर्वात पुढे शिरपाची बैलजोडी व त्याच्यामागे इतर बैल अशी मिरवणूक गावातून निघाली. सर्व गावकरी शिरपाच्या बैलजोडीकडे कौतुकाने बघत होते. शिरपाही मनातून आनंदला होता. आज त्याला सर्जा राजाचा अभिमान वाटायला लागला. 
          दिवसामागून दिवस जात होते. शिरपा व त्याच्या कुटुंबाला सर्जा राजाचा चांगलाच लळा लागला होता. पण नियतीला हे बघवले नाही. लवकरच  त्यांच्यावर दुष्काळ नावाचे संकट ओढवले. दोन वर्ष झाली गावात पावसाचा ठिपूस पडला नाही. पाऊस नुसता हुलकावणी द्यायचा दुष्काळाच्या झळा साऱ्या गावाला बसत होत्या. काहींची पीकं करपून चालली होती तर काहींनी पेरलेली बियाणं पाण्याअभावी उगवलीच नाही. जमिनी कोरडया ठणठणीत पडल्या होत्या. गुरांना चारा पाणी  मिळना. गुरं रोडावत चालली होती. शेतकऱ्यांना आपल्या गुरांचे हाल बघवत नव्हते. काही शेतकऱ्यांनी तर आपली गुरे बाजारात विक्रीला आणली होती. पडेल त्या किमतीला विकत होती. 
          शिरपाही ह्या दुष्काळात  होरपळून चालला होता. त्याने पेरलेलं बियाणं उगवलंच  नाही व थोडफार उगवलेलं ऊन्हामुळं करपून चाललं होतं. शिरपा तर रानाकडं बघून हताश व्हायचा. त्याचे डोळे आभाळाकडे लागलेले असायचे. कधी पाऊस पडतोय आणि पेरलेलं बियाणं उगवतंय असं त्याला झालं होत. पण वरुणराजा कृपादृष्टी दाखवायला तयार नव्हता. 
          त्याच्या लाडक्या सर्जा राजाचे हाल चालले होते. त्यांना वेळेवर चारा पाणी मिळेनासे झाले. उमदी दिसणारी जनावरं चारा पाण्याअभावी रोडावत चालली होती. शिरपाला जनावरांचे हाल बघवत नव्हते. सर्जा राजाकडे बघितलं कि त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. मन गलबलायचं. त्यांना प्रेमाने थोपटायचा व म्हणायचा, "औंदा पन पावसाने हुलकावानी दिली. शेतात काय बी पिकलं नाय." सर्जा राजा मूकपणे त्याला संमती द्यायचे. 
          हळूहळू परिस्थिती हाताबाहेर चालली होती. दुष्काळाने अजूनच उग्र रूप धारण केले होते. पिकं उगवलीच नाहीत तर घरात पैसा येणार कुठून? मोठी माणसं उपाशी राहून दिवस काढत होती. पण पोराबाळांचे काय? जनावरांचे काय? त्यांना कुठून खायला आणणार? हीच चिंता साऱ्या गावाला व शिरपालाही सतावत होती. शेवटी शिरपाने एक हृदयद्रावक निर्णय घेतला. आपल्या लाडक्या सर्जा राजाला बाजारात विकण्याचा. 
          शिरपाने आपला निर्णय घरात सांगितला तसा सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. इतक्या वर्ष सर्जा राजाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले, त्यांच्यावर माया केली आणि त्यांनाच दूर करायचे. शिरपाने  सांगितल्यापासून घरात दु:खाचे वातावरण पसरले. शिरपाच्या बायकोला तर राहून राहून वाईट वाटत होते. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे तिने सर्जा राजाला सांभाळले होते. सर्जा राजाचे हाल तिलाही बघवत नव्हते. सर्जा राजा सुखात राहावा, त्यांना चारा पाणी नीट मिळावे यासाठी शिरपाची बायकोही तयार झाली. 
          शिरपा दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठला परंतु त्याच्यात नेहमीसारखा उत्साह नव्हता. तो जड पावलाने गोठयाकडे गेला. सर्जा राजाला प्रेमाने थोपटले. त्यांना शेवटचे चारा पाणी खाऊ घातले. त्याच्या बायकोनेही सर्जा राजाला ओवाळले. शिरपा सर्जा राजाला दावणीतून सोडवू लागला तेव्हा सगळ्यांचा कंठ दाटून आला. सर्जा राजा आता परत दिसणार नाहीत याचे सर्वांना वाईट वाटत होते. शिरपा जड अंतःकरणाने बैलांना घेऊन जाऊ लागला. त्याने मागे वळून गोठयाकडे बघितले. गोठा रिकामा बघून त्याला गलबलून आले. 
          शिरपा आपल्याच तंद्रीत होता. एक माणूस त्याला विचारू लागला, "कितीला देणार?" शिरपा भानावर येत म्हणाला, "पन्नास हजाराला घ्या." माणसाने बैलांकडे निरखून बघितले व म्हणाला, "अश्या मरतुकड्या बैलांचे पन्नास हजार?" शिरपा म्हणाला, "ओ, त्यांना मरतुकडे म्हणू नका. ते माझ्या काळजाचा तुकडा हायत. घ्यायचे असतील तर घ्या पन भलतं सलत बोलू नका." माणूस नरमाईला येऊन म्हणाला, "तीस हजार देतो." शिरपाने बैलांकडे बघितले व सौदा पक्का केला. शिरपाने पैसे घेतले व सर्जा राजाला त्या माणसाच्या हवाली केले. माणूस बैलांना घेऊन जाऊ लागला तेव्हा शिरपा डोळे भरून बैलजोडीकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यातून असावे गळत होती. शिरपा रिकाम्या हाताने व जड अंतःकरणाने घराकडे यायला निघाला.























 






































































  
























No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...