लक्ष्यातला ''लक्ष्या''
लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव जरी उच्चारले तरी तोंडावर हसू उमटते. मराठी चित्रपटसृष्टीला पूर्णपणे मरगळ आली होती तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेनीं आपल्या विनोदी अभिनयाने चित्रपटसृष्टीत जान आणली. लक्ष्मीकांत बेर्डेन्च्या विनोदी अभिनयाने मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे गर्दी करू लागला. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे विनोद व विनोद म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे असे समीकरण झाले होते. त्यांचा जन्मच लोकांना हसवण्यासाठी झाला आहे असे वाटत होते.
लक्ष्मीकांत बेर्डेन्ची सुरवातच विनोदी अभिनयाने झाली. 'टुरटूर', 'शांतेच कार्ट चालू आहे' हि नाटके तर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रचंड गाजली. याआधी त्यांची 'नसती आफत' हि दूरदर्शनवर विनोदी मालिका चांगली चालली. यामुळेच त्यांचा विनोदी अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यांची आणि महेश कोठारेंची चांगली केमेस्ट्री जुळली. या दोघांनी मिळून 'धुमधडाका', 'दे दणादण', 'थरथराट', 'झपाटलेला', 'धडाकेबाज' असे सुपरहिट सिनेमे दिले. धुमधडाकामधील शरद तळवलकरांना भीतीदायक गोष्ट सांगून घाबरवण्याचा प्रसंग तर अफलातून केलेला आहे. विनोदी अभिनयामुळे लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारेंच्या चित्रपटातील हुकमी एक्काच झाले होते. त्यांची अभिनय कौशल्याची भुरळ सचिनलाही पडली. 'अशी हि बनवाबनवी', 'एकापेक्षा एक', 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटात सचिनने त्यांना महत्वाच्या भूमिका दिल्या. अशी हि बनवाबनवी मधील त्यांनी साकारलेली पार्वतीची स्त्री भूमिका तोंडावर हसू आणते. 'प्रेम करू या खुल्लमखुल्ला', 'आम्ही दोघे राजा राणी', 'हमाल दे धमाल', पटली रे पटली', 'एक होता विदूषक' हे चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे प्रचंड गाजले.
लक्ष्मीकांत बेर्डेन्च्या अभिनयाची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीलाही पडली. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कोन' 'साजन', 'बेटा' अशा काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोद कधी निरस वाटला नाही. उलट त्यांचे विनोदी संवाद फेकीचे अचूक टायमिंग, चेहऱ्यावरचे हावभाव यामुळे ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले. सर्वांचा लाडका 'लक्ष्या' बनले.
या सर्वांच्या लाडक्या लक्ष्याने १६ डिसेंबर २००४ रोजी अचानक जगाचा निरोप घेतला. सर्वांना हसवत ठेवत या रंगमंचावरून अचानक exit घेतली. त्यांच्या जाण्याने एका विनोदाचा अंत झाला. ते जरी गेले तरी त्यांच्या विनोदी अभिनयामुळे ते अजूनही आपल्यात आहेत असे वाटते. त्यांचा अभिनय अजूनही जिवंत आहे असे वाटते.
No comments:
Post a Comment