श्री गणेशाचे संपूर्ण शक्तीपीठ - राजूरचा राजुरेश्वर
जालन्यापासून २५ किलोमीटरवर जालना-भोकरदन मार्गावर राजूर हे स्थळ आहे. हे स्थळ येथील महागणपतीमुळे प्रसिद्ध आहे. येथील गणपतीला राजुरेश्वर नावाने ओळखले जाते. या ठिकाणच्या महागणपतीची महती म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक, श्रीगणेशाचे संपूर्ण शक्तीपीठ म्हणून या गणपतीला ओळखले जाते. या गणपतीची आख्यायिका अशी कि पुराणकाळात महापराक्रमी पण अहंकारी वृत्तीचा सिंदरासूर नावाचा एक राक्षस होता. तो जनतेला भरपूर त्रास देत होता. त्याचा वध करण्यासाठी गणपतीने राजूर येथे अवतार घेतला. तोच राजूरचा राजुरेश्वर महागणपती. राजुरेश्वराची जन्मकथा व सिंदुरासुराच्या वधाच्या कथा गणेशपुराणात समाविष्ट आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी राजूरच्या गणेशाचे स्थळ नाभिस्थान मानतात. चिंचवडच्या गणेशाचे हृदयस्थान, मोरगावच्या गणेशाचे शिराचे स्थान म्हणजेच डोक्याचा भाग तर जळगाव जिल्ह्यातील पद्मालय गणेशाचे स्थान पायाचा भाग म्हणून ओळखले जाते. राजुरेश्वराच्या मंदिराचे नूतनीकरण नुकतेच झाले आहे. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा देखणा नमुना आहे. मंदिरावर बसविण्यात आलेल्या संगमरवरी फारशींमुळे मंदिराच्या सौन्दर्यात भर पडली आहे. पौर्णिमेला हे मंदिर चंद्रप्रकाशाने उजळून निघते. ते दृश्य पाहण्याजोगे असते. या मंदिराला राज्यशासनाकडून पर्यटनाचा "ब" दर्जा देण्यात आला आहे. अंगारकी चतुर्थीस राजुरेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. परिसरातील अनेक भाविक पायी दर्शनासाठी येतात. अशा भाविकांसाठी अनेक गणेशभक्त श्रद्धेने चहा फराळाची व्यवस्था करतात. राजुरेश्वर मंदिराला समई व घंटा दान करण्याची परंपरा आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला मोठ्या आकाराची घंटा अर्पण केली होती. ती घंटा आजही भाविकांचे लक्ष वेधून घेते.
राजुरेश्वर गणपतीची मूर्ती व आकर्षक गणेश मंदिर
राजुरेश्वर गणपतीची मूर्ती व आकर्षक गणेश मंदिराचा व्हिडीओ
No comments:
Post a Comment