Wednesday, November 8, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं । ताकाचे उपकार तरी करा ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं ।

नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥

ओवी : नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
         नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥

अर्थ :  अहो, तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या). तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा.

भावार्थ : काही लोक दानधर्म करण्याबाबत आपला हात आकडता घेतात. आपल्याकडे आहे त्यातील थोडे का होईना गरजुंना, गरिबांना, दीन-दुबळ्यांना द्यावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. या लोकांना जर दिले तर आपल्याकडे आहे ते संपेल असे या लोकांना वाटते. पण देणारा (देव) तर वर बसला आहे.   तो सढळ हाताने देत असतो. काही कमी पडू देत नाही. म्हणून आपण शक्यतो तितकी मदत गरजूना, अडलेल्याना करावी. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या)." तसेच तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा" म्हणजेच काही लोकांना द्यायची दानत नसते तसेच दुसऱ्यांना देण्याबाबत त्यांचा हात आकडता असतो अशा लोकांना उद्देशून  तुकाराम महाराज म्हणतात. खरे तर पाणी हे जीवन आहे. एकवेळ अन्नावाचून माणूस जगू शकेल परंतु पाणी मिळाले नाही तर माणूस तडफडून मरेल. माणूस पाण्याच्या शोधात लांब लांब भटकत असतो. जिथे पाण्याचा ठिपूस नसतो तिथल्या लोकांचे हाल होतात. एखाद्याला तहान लागली आणि त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासावीस होतो. म्हणूनच पाणी हे जीवन आहे व आपण दुसऱ्याला पाणी पाजतो म्हणजेच त्याला आपण जीवनच देत असतो. खरे तर आपल्या हातून सत्कर्म घडत असते. पुण्य प्राप्त होत असते. तहानलेल्या माणसाला पाण्याचा एक थेंब जरी मिळाला तरी त्याचा आत्मा शांत होतो. तो आपल्याला चांगला आशिर्वाद देतो. चांगला आशिर्वाद मिळणे हीच खरी फलप्राती होय. 

ओवी :  तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'

भावार्थ : तुकाराम महाराजांना हरीचे सगुणरूप बघण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचा जीव तळमळत आहे. तुकाराम महाराजांनी हरीची एवढी भक्ती केली कि त्यांना हरीच्या सगुणरूपाच्या दर्शनाची आस(ओढ) लागली आहे. कधी एकदा हरीचे सावळे, सुंदर, मनोहारी  रूप डोळ्यात साठवतो असे त्यांना झाले आहे. म्हणूनच ते संत-सज्जन लोकांना विनवणी(विनंती) करितात कि, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'







No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...