Wednesday, November 8, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।



तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।

 

धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

ओवी :  धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
             सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥

अर्थ : परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो व आपले जे सेवक आहेत त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही. आपण मात्र आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करिते. 

भावार्थ : जे भक्त चिकाटीने परमार्थ करतात, त्यात खंड पडू देत नाहीत. परमार्थ करतात म्हणजेच मनात कुठलीच आशा, लोभ, मोह याचा विचार न करता निःस्वार्थ भावनेने सेवा करतात, सत्कर्म करतात, चांगली कार्ये करतात व हि कार्ये, सत्कर्म त्यांचे हातून नियमित घडत असतात. हि कार्ये, सत्कर्म साधू-संत, सज्जन ह्या लोकांकडून होत असतात. ह्या लोकांनाच नारायण साह्य होतो, ह्या लोकांच्या पाठीमागे उभा राहतो. त्यांना हवी ती मदत करतो. त्यांचा सर्व भार आपल्या शिरावर घेतो. त्यांना कुठलेही श्रम पडू देत नाही कि चिंता करू देत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि,"परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो व आपले जे सेवक(भक्त) आहेत त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही."

          परमार्थ केल्याने नारायण साह्य होतो व आपल्या भक्तांना कुठलेही श्रम पडू देत कि त्यांच्यावर कुठलेही संकट येऊ देत नाही. आलेल्या संकटाचे लगेच निवारण करतो. तो भक्तांची काळजी वाहतो.   म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि,"हरीचे आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करिते." म्हणजेच हरीचे आनंदाने कीर्तन केल्याने व त्याचे गुण गायल्याने हरी आपल्यावर प्रसन्न होतो व आपल्यावरील संकटाचे निवारण करतो. 

ओवी :  जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

अर्थ : लहान मुलाला काही दुखणेबाने आले असता त्याची आई आपला जीव देखील देण्यास तयार होते. हि प्राकृत आईची गोष्ट झाली आणि हा तर दाता प्राकृतासारखा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "हि माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट सांगितली. मात्र निःस्सीम भक्त बनले पाहिजे वरवर भक्ती केली असता काही उपयोग होत नाही."

भावार्थ : आई व मुलाचे नाते वात्सल्याचे आहे, प्रेमाचे आहे. आईला आपले मुलं काळजाचा तुकडा वाटतो. म्हणूनच आई आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. तिचा सर्व जीव आपल्या मुलावर असतो. म्हणूनच आपल्या मुलाला काही दुखले खुपले तर आई स्वतःचा जीव द्यायला मागेपुढे पाहत नाही. खरेतर जगातील कुठलीही आई आपल्या मुलासाठी जीव द्यायला तयार होते आणि हे स्वाभाविकच आहे. कारण आईच्या पोटातून मुलाचा जन्म होतो व आई आपल्या पोटच्या गोळ्याला कधीही दूर सारत नाही. 

         जसे आई व मुलाचे नाते असते तसेच हरीचे व भक्ताचे नाते मायेचे, प्रेमाचे, वात्सल्याचे असते. हरी आपल्या भक्तांवर अंतःकरणापासून प्रेम करतो. आपल्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. त्यांना कधीही अंतर देत नाही. भक्तांवर कुठलेही संकट येवू देत नाही व आलेच तर त्याचे लगेच निवारण करतो. थोडक्यात हरी आपल्या भक्तांची आई झालेला असतो. परंतु भक्ताची हरीवर नितांत श्रद्धा पाहिजे, त्याची निःस्सीम भक्ती पाहिजे. अंतःकरणापासून  केलेली भक्ती हरीपर्यंत पोहोचते. वरवर केलेली (भक्तीचा दिखावूपणा केलेली) व स्वार्थापोटी केलेली भक्ती हरीपर्यंत पोहचत नाही. हरी हा भक्तीचा भुकेला आहे व जो भक्त निःस्सीम भक्ती करतो तोच हरीला आवडतो. हरी त्याला आपल्या हृदयात स्थान देतो. 

         तुकाराम महाराज अंतःकरणापासून हरीची (विठ्ठलाची) भक्ती करायचे, त्याचे नामःस्मरण घ्यायचे. विठ्ठलनामात तल्लीन व्हायचे. हीच भक्ती हरीला आवडायची. म्हणूनच हरी तुकाराम महाराजांवरील संकटाचे निवारण करायचा. त्यांना कुठलेही श्रम पडू देत नव्हता कि कुठलीही चिंता करू देत नव्हता. सतत परमार्थ करत राहिल्याने नारायण त्यांना साह्य होता व हाच त्यांना आलेला अनुभव त्यांनी या अभंगात सांगितला आहे.


 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...