तुकाराम महाराज गाथा - अभंग - हाकेसरशी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
ओवी : हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
अर्थ : प्रल्हादाने नारायण नामाने हाक मारल्याबरोबर देव त्याजकरिता धाव घेवून खांब फोडून प्रगट झाले. अशी कृपावंत माझ्या विठाई माऊलीवाचून कोण आहे ?
भावार्थ : प्रल्हाद हा राजा हिरण्यकश्यपू याचा मुलगा होता. प्रल्हादाची भगवान विष्णूवर अतोनात भक्ती होती. तो सतत विष्णूच्या नामःस्मरणात तल्लीन असायचा त्याचे मुखातून 'नारायण-नारायण' हे शब्द बाहेर पडायचे. त्याची हि भक्ती हिरण्यकश्यपूला आवडायची नाही. प्रल्हादाची भक्ती तुटण्यासाठी हिरण्यकश्यपू त्याचा हर प्रकारे छळ करायचा. कधी त्याला चाबकाचे फटके द्यायचा, त्याच्यावर गरम तेल ओतायचा. अशी त्याला शिक्षा द्यायचा. हि शिक्षा होऊनही प्रल्हादाची भक्ती तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली. प्रल्हादाची वाढत चाललेली भक्ती बघून हिरण्यकश्यपूला आणखी राग यायला लागला. त्याने प्रल्हादाला विचारले, "तु एवढा नारायण-नारायण करतोस तर कुठे आहे तुझा नारायण?" प्रल्हाद म्हणाला, "नारायण चराचरात आहे, कणाकणात आहे, आकाशी आहे पाताळी आहे, सजीवात आहे निर्जीवात आहे, त्याने सर्व विश्व व्यापले आहे. तो सर्वेश्व, विश्वात्मा आहे." हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याने एका खांबाकडे बोट दाखवून प्रल्हादाला विचारले कि, "ह्या खांबात तुझा नारायण असेल तर दाखव मला." असे म्हणून हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली. प्रल्हादाने नारायणाचा धावा करायला सुरवात केली. त्याची हाक ऐकून नारायण नरसिंहाच्या रूपात खांब तोडून प्रकट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला.
नारायणाने जसे नरसिहांचे रूप घेऊन प्रल्हादाला संकटातून सोडवले तसेच नारायण तसेच नारायण विठ्ठलाचे रूप घेऊन सर्व संतांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरला. त्याने सर्व संतांना संकटातून मुक्त केले. त्यांच्यावरील सर्व दुःखे स्वतः झेलली व त्यांना सुख प्राप्त करून दिले. अशी हि कृपावंत विठाई माउली म्हणजेच प्रल्हादाला संकटातून सोडवणारे नारायणाचे रूप आहे.
ओवी : करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
अर्थ : तिचा आठव केल्याबरोबर मोठ्या प्रेमाने धाव घेवून ती आठव करणारास मिठी घालते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते.
भावार्थ : विठाई माऊली हि आपल्या भक्तांबाबत प्रेमळ आहे, कृपावंत आहे. आपल्या भक्ताने अंतःकरणापासून केलेली भक्ती विठाई माऊलीला आवडते. आई जसे आपल्या मुलावर माया करते, प्रेम करते तसेच विठ्ठल आपल्या भक्तांची आई बनून, माऊली बनून भक्तांना लेकरासमान मानून त्यांच्यावर प्रेम करते, माया लावते. विठ्ठलाचे व भक्ताचे नाते वात्सल्याचे आहे. भक्तसुद्धा विठ्ठलाला आपल्या माऊलीसमान मानतो. मुलगा कसा 'आई-आई' म्हणून आठवण काढतो व आईसुद्धा आपल्या मुलाकडे धाव घेते व मुलाला प्रेमाने मिठीत घेते तसेच विठाई माऊलीचा आठव केल्याबरोबर म्हणजेच विठ्ठलाचे नामःस्मरण केल्याबरोबर विठ्ठल धावत येतो व आपल्या भक्ताला प्रेमाने मिठी मारतो.
तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते. विठ्ठलाचे नाम हे गोड असून पवित्र, निर्मळ आहे. या नामात दडली आहे प्रसन्नता, सात्विकता. म्हणूनच जो हरीचे(विठ्ठलाचे) नाव घेईल त्याला जीवनात सुख, शांती प्राप्त होईल. जगातील परमोच्च आनंद प्राप्त होईल. मनुष्याने जर नित्यनियमाने हरीचे(विठ्ठलाचे) नामःस्मरण केले तर त्याला देवाजवळ जाता येते. विठ्ठलालाही आपले नामःस्मरण केलेले आवडते. जो कोणी भक्त नित्यनियमाने विठ्ठलाचे गुणगान गात असेल, त्याचे नामःस्मरण घेत असेल त्याच्यावर विठ्ठल प्रसन्न होतो व त्याला संसारचक्रातून सोडवतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो व मोक्षपदाला नेतो. विठ्ठल त्याला सायुज्यता मिळवून देतो.