कविता - पंढरीची वारी
पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी,
आणि म्हणाला, 'आवर लवकर बयो, निघालेत वारकरी, ।
मी म्हणाले, 'निघते हं विठू, घरचं एकदा बघते,
शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते ।
लगबग माझी सुरु झाली,
नवऱ्याचे कपडे बघू कि
मुलांसाठी खाऊ करू,
एवढया कमी अवधीत
सगळं कसं आवरू ।
शेवटी एकदाची तयार झाले,
आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।
काळजातली गलबल लपवु पाहत होते,
डोळ्यांमधले अश्रू थोपवू पाहत होते ।
नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी,
मीच मला समजावत होते परोपरी ।
घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,
यंदा असू दे, बघु पुढे केव्हांतरी ।
माझा एक पाय आत, एक पाय बाहेर,
वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।
आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना,
मला सोडून मग त्याचाही पाय निघेना ।
मी म्हणाले, 'सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं,
संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।
उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी,
तूच आता काहीतरी दे बाबा हमी ।
कुणी म्हणत ममत्व सोड,
कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।
गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे,
गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे ।
एकच भीती वाटते विठु,
प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक
तुटून जाईल ही श्वासाची दोरी,
आणि कधीच घडणार नाही रे
तुझ्या पंढरपूरची वारी ।
माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले,
त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले ।
माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,
'संसार सोडू नकोस एक फक्त कर,
श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव,
चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।
इंद्रियांना करू देत त्यांचं काम,
मनावर मात्र घाल चांगला लगाम ।
मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही,
प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही ।
तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी,
त्याचीच असुदे तुझ्यावर सत्ता, मग बघ
मन, बुद्धी, चित्त, अहंकार
हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।
हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल,
हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।
अहंकार गेला कि ममत्वही सुटेल,
रज-तमाच कवाड एक एक करून मिटेल ।
हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश,
हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।
निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल,
आणि विश्वास ठेव पोरी,
पैलतीरावर हात देण्यासाठी,
चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।
पैलतीरावर हात देण्यासाठी,
चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।
No comments:
Post a Comment