अवीट गोडीचे गाणे - मी रात टाकली, मी कात टाकली
'मी रात टाकली, मी कात टाकली' हे अवीट गोडीचे गाणे जैत रे जैत या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल असून निर्माता निर्माता उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर आहेत. या चित्रपटात मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणी ना. धों. महानोर यांनी लिहिली असून हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केली आहेत तर लता मंगेशकर, रवींद्र साठे, आशा भोसले यांनी स्वरबद्ध केली आहेत.
'मी रात टाकली, मी कात टाकली' हे गाणे लता मंगेशकर, रवींद्र साठे यांनी गायले असून स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झाले आहे. चिंधी(स्मिता पाटील) हिचा काडीमोड होतो. ती आपल्या नवऱ्यापासून फारकत घेते व त्याच्यापासून मुक्त होते. तिचे गावातीलच नाग्या (मोहन आगाशे) या तरुणावर प्रेम असते. तिच्या मनात त्या तरुणाने घर केलेले असते. त्याच्याबरोबर लग्नगाठ बांधायला तयार असते. म्हणूनच ती म्हणते कि, 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली'
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली ।
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती ।
ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती ।
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली ।