Saturday, October 16, 2021

नमक हलाल -- विनोदाचा तडका

 विनोदाचा तडका -- नमक हलाल 

          हा चित्रपट ३० एप्रिल १९८२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता सत्येंद्र पाल असून दिग्दर्शक प्रकाश मेहरा आहेत. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. अंजान यांनी गाणी लिहिली असून बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केली आहेत. अमिताभ बच्चन, परवीन बॉबी, शशी कपूर, स्मिता पाटील, वहिदा रेहमान, रंजीत, ओम प्रकाश यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

               या चित्रपटातील गीते किशोर कुमार व आशा भोसले यांनी गायली आहेत. विशेष म्हणजे आशा भोसले यांच्या आवाजातील 'जवानी जाने मन, हसीन दिलरूबा' हे गाणे सुपर हिट ठरले. हे गाणे परवीन बॉबीवर चित्रित झाले आहे तसेच तिच्यावर चित्रित झालेले 'रात बाकी, बात बाकी' हे गाणे सुद्धा सुपरहिट झाले. अमिताभ व स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेले गाणे 'आज रपट जाये तो हमे ना उठयो' हे गाणेसुद्धा सुपरहिट ठरले. अमिताभवर चित्रित झालेले गाणे 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' लोकप्रिय झाले. हे गाणे किशोर कुमार व पंडित सत्यनारायण मिश्रा यांनी गायले. ह्या गाण्यासाठी किशोर कुमार यांना फिल्मफेअरतर्फे दिला जाणारा सर्वश्रेष्ठ पार्श्वगायकचा पुरस्कार मिळाला.

               या चित्रपटात अमिताभ एका खेडेगावातील साधा भोळा माणूस दाखवला आहे. त्याचे नाव आहे अर्जुनसिंग. त्याचे दद्दू (ओम प्रकाश) त्याला प्रेमाने वाढवतात, त्याला जीव लावतात. त्यांचे सांगणेवरून अर्जुनसिंग नोकरीसाठी मुंबईत येतो व राजा कुमार (शशी कपूर) यांचे हॉटेलात नोकरी करतो. तिथे त्याची गाठ पडते पुनमशी (स्मिता पाटील). 

                ह्या हॉटेलचा मालक राजा कुमार असून हे हॉटेल सावित्री (वहिदा रेहमान) चालवत असते. ह्या हॉटेलचा मॅनेजर रंजित सिंग असून त्याचा ह्या हॉटेलवर डोळा असतो. हे हॉटेल मिळवण्यासाठी राजा कुमार याला मारण्यासाठी निशाला (परवीन बॉबी) हाताशी धरून प्लॅन आखतो. निशा हि डान्सर असते. राजाची आणि निशाची भेट होते आणि राजा तिच्याकडे आकर्षित होतो. निशाही हळूहळू राजाच्या प्रेमात पडते त्यामुळे ती राजाला मारू शकत नाही. राजाला मारण्यासाठी बोटीवर एका पार्टीचा प्लॅन आखतात परंतु अर्जुन हा प्लॅन उधळून लावतो. 

          शेवटी रंजीत आणि त्याची माणसे अर्जुन आणि राजाच्या कुटुंबाला किडनॅप करतात आणि राजाची प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यासाठी दोघांना ब्लँकमेल करतात परंतु राजा आणि अर्जुन रंजीत व त्याच्या माणसांशी दोन हात करतात व आपल्या कुटुंबाला त्यांच्या तावडीतून सोडवतात. राजाचे निशाशी व अर्जुनाचे पुनमशी लग्न होते व आई सावित्रीबरोबर सुखाने राहू लागतात. 

अमिताभचे विनोदी सीन --

          ह्या चित्रपटाला विनोदी तडका दिलेला आहे त्यामुळे हा चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही उलट प्रेक्षकांची चांगलीच करमणूक झाली. अमिताभने विनोदी अभिनय करून या चित्रपटात विनोदी रंग भरले व प्रेक्षकांना मनमुराद हसवले. अमिताभच्या विनोदी प्रसंगांमुळे हा चित्रपट चांगलाच लक्षात राहतो. अमिताभवर चित्रित झालेले व सुपरहिट ठरलेले काही विनोदी प्रसंग पुढीलप्रमाणे 

१) इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज --

          अमिताभ नोकरीसाठी शहरात येतो व रंजीतला भेटतो तेव्हा अमिताभ विनोदी ढंगात आपली ओळख करून देतो. रंजीत त्याला इंग्लिशबाबत विचारतो तेव्हा 'आय कॅन टाक इंग्लिश, आय कॅन वाक इंग्लिश, आय कॅन लाफ इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज' असे सांगतो आणि त्याला इंग्लिशमधून क्रिकेट कॉमेंटरी ऐकवतो. हा अमिताभचा विनोदी सीन चांगलाच प्रसिद्ध झाला. 

२) अमिताभ माशीला पकडण्याचा प्रयत्न करतो तो प्रसंग --

          शशी कपूरची हॉटेल विकणेबाबत व्यापाऱ्यांबरोबर मीटिंग चालू असते. मिटिंग चालू असताना अचानक एक माशी येते. हि माशी कुणाच्या टकलावर जाते तर कुणाच्या मिशीवर जावून बसते. अमिताभ या माशीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडतो. अमिताभच्या हरकतीमुळे सर्व व्यापारी पळून जातात. माशी शेवटी अमिताभच्या नाकावर बसते. शशी कपूर अमिताभला 'हिलना मत' असे सांगतो व त्याच्या नाकावर जोराचा ठोसा लगावतो. अमिताभच्या विनोदी अदाकारीमुळे प्रेक्षक मनमुराद हसतात. 

३) बुट पाण्यात पडतो तो प्रसंग -- 

          अमिताभ नोकरीसाठी शहरात येतो व भैरव (प्यारेलाल) याच्या इथे राहतो. भैरव त्याला रात्री एका मोठया हॉटेलमध्ये पार्टीला घेऊन जातो. पार्टीत आल्यावर अमिताभच्या बुटावर खादयपदार्थ पडतो. अमिताभ बुट साफ करण्यासाठी वाहत्या पाण्यात पाय ठेवतो एवढयात पायातून बूट निसटतो व पाण्याबरोबर वाहू लागतो. वाहत्या पाण्यातून बूट काढण्यासाठी अमिताभने केलेला प्रयत्न प्रेक्षकांना मनमुराद हसवतो. या प्रसंगात अमिताभने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. हा सीन अजूनही बघितला तरी चेहऱ्यावर हसू फुलते. 

          अमिताभच्या उत्तम अभिनयामुळे व विनोदी अदाकारीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.



इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज -- अमिताभचा सुपरहिट ठरलेला विनोदी प्रसंग








 

 

 

 

 

 

 

 

            

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...