Sunday, October 3, 2021

अवीट गोडीचे गाणे - देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा । उघड दार देवा आता उघड दार देवा ।।

 

अवीट गोडीचे गाणे - देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा । उघड दार देवा आता उघड दार देवा ।।

          हे गीत 'आम्ही जातो आमुच्या गावा' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६८ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट कमलाकर तोरणे यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात उमा भेंडे, श्रीकांत मोघे, सूर्यकांत मांढरे, धुमाळ, गणेश सोळंकी, मधू आपटे यांच्या मुख्य भुमिका आहेत. 

         हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे तसेच आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हे भक्तीगीत असून अजूनही ऐकायला गोड वाटते. 

       संताजी, धनजी आणि सयाजी (सूर्यकांत मांढरे, धुमाळ, गणेश सोळंकी) हे श्रीधर पंतच्या दारात येतात. ते पंतला समजावून सांगतात की ते प्रवासी आहेत आणि पंत त्यांना काही दिवस त्यांच्या घरी ठेवण्याची संधी देतात. एके रात्री संधी बघून तिघेजण श्रीधर पंतांची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या कानावर ह्या गीताचे बोल पडतात. तिथेच त्यांचे हात थबकतात व तिजोरी फोडण्याचा विचार सोडून देतात. जेव्हा तिघे तिजोरी फोडत असतात तेव्हा त्यांच्या मनात एक भीती असते कि एका सज्जन माणसाच्या घरी आपण चोरी करत आहोत म्हणून त्यांच्या हाताला कंप सुटतो म्हणजेच त्यांचे हात थरथर कापतात. जगदीश खेबूडकरांनी 'मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची, सरावल्या हातांनाही कंप का सुटावा' या ओळीतून सुंदर मांडले आहे. जगदीश खेबूडकरांनी हे भक्तिगीत उत्तम लिहिले आहे व सुधीर फडके यांनी आपल्या सुरेल आवाजात गावून अजरामर केले आहे. 

     

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा

उघड दार देवा आता उघड दार देवा ।। धृ ।।

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची

मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची

सरावल्या हातांनाही कंप का सुटावा ।। १ ।।

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप

ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप

दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा ।। २ ।।

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा ।। ३ ।।

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी 

मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी 

मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा ।। ४ ।।

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला 

बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला  

आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा ।। ५ ।।
 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...