Saturday, March 14, 2020

'त्यांचे" कार्य छोटे ... डोंगराएवढे !

 'त्यांचे' कार्य छोटे ... डोंगराएवढे !

          ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन पार पडला. तो नेहमीप्रमाणे दरवर्षी येतो. या दिवशी महिलांचा उदो उदो होतो. फेसबूक, व्हाट्सअप, इन्स्टाग्रामवर महिलांबद्दल चांगल्या चांगल्या पोस्ट टाकल्या जातात. त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, सत्कार केले जातात. ८ मार्च पार पडला कि परत स्त्री पुरूष भेदभाव सुरू. 
          खरे तर स्त्री शिवाय घर अपूर्णच असते. घरातील प्रत्येक गोष्टीत स्त्रीचा हातभार लागलेला असतो. स्त्री जवळ जवळ निम्मा संसार सांभाळत असते. काही स्त्रिया तर नोकरी, व्यवसाय करून घर सांभाळत असतात. घरातील प्रत्येकाची आवड निवड जपत असतात. पै-पाहुणे, नातेवाईक यांचा पाहुणचार करत असतात. मुलांना सांभाळणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ह्या सर्व गोष्टी त्या जबाबदारीने पार पाडत असतात. एवढे करूनही समाजात तिला दुय्यम स्थान दिले जाते, तिची अवहेलना केली जाते. आज प्रत्येक स्त्री पुरुषांच्या बरोबरीने उभी आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती करत आहे, आपला ठसा उमटवत आहे. 
          मी रायगड जिल्ह्यातील गोरेगावला असताना अशाच दोन वयस्कर महिला आपला व्यवसाय सांभाळून घराला हातभार लावताना दिसल्या. दोघींचे अंदाजे वय ५५ ते ६० च्या दरम्यान असावे. पण दोन्ही महिला आपला व्यवसाय आनंदाने करत होत्या. 
          अधिकारी काकू ह्या घरगुती खानावळ चालवतात. त्यांच्याकडे रोज १० ते १२ जण जेवायला असतात. त्यांचा रोजचा स्वयंपाक त्या स्वतः करतात. जेवायला येणाऱ्यांना रोज ताजे व गरमागरम जेवण वाढणे, हवं-नको ते बघणे हे स्वतः लक्ष घालून बघत असतात. घरात एखादा नवीन पदार्थ केला कि हक्काने पानात वाढतात. त्यांचे जेवण रुचकर असते. दुसऱ्या मेहता आजी, ह्यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय आहे. पाऊस असो कि थंडी असो, न चुकता सकाळी लवकर येऊन पेपरचा स्टॉल लावतात. सर्व वृत्तपत्र त्या विकत असतात. मी रोज नियमितपणे त्यांच्याकडून 'सकाळ' वृत्तपत्र घेत असे. एक दोन दिवस जर नाही गेलो तर 'काल आला नाही, गावाला गेला होता का?' असे आपुलकीने विचारत असत. 
          त्या दोघी वयस्कर जरी असल्या तरी त्यांचा काम करण्याचा उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे. आज अशा बऱ्याच महिला आहेत कि आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून घर चालवतात, पण आपण महिला म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो. या दोघींचे कार्य जरी छोटे असले तरी त्यांच्यामुळे घराला हातभार लागत आहे, त्यांच्यामुळे घरात चार पैसे येत आहेत. त्यांचे कार्य छोटे जरी असले तरी डोंगराएवढे मोठे आहे म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला सलाम !


संतोष वसंत जोशी,
वाई, जिल्हा सातारा


















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...