अभिनयाचा महामेरू - 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू
डॉ. श्रीराम लागूंनी आपल्या अभिनयाने काही भूमिका अजरामर करून ठेवल्या. प्रेक्षक या भूमिका कदापि विसरणार नाही. या भूमिकांमुळेच डॉ. श्रीराम लागूंचे नाव नाटयसृष्टीत व हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर राहील. असा कसदार अभिनेता परत होणे नाही.
नाटयसृष्टी व डॉ. श्रीराम लागू
वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच लागूंनी नाटकांमध्ये काम करायला सुरवात केली. पुरोगामी नाटय संस्था- पुणे आणि रंगायतन - मुंबई या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमी व्यापून टाकली. वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकाच्या माध्यमातून १९६९ साली त्यांनी पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायला सुरवात केली. त्यांनी 'एकच प्याला', 'किरवंत', 'गिधाडे', 'नटसम्राट', 'सूर्य पाहिलेला माणूस' अशी दर्जेदार नाटके केली. कुसुमाग्रज लिखित 'नटसम्राट' या नाटकात त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने साकारलेली गणपत उर्फ आप्पा बेलवलकर यांची भूमिका अजरामर केली. ते त्या भूमिकेत इतके समरस झाले होते कि आप्पासाहेब म्हणजेच डॉ. श्रीराम लागू असे समीकरण झाले होते.
चित्रपटसृष्टी व डॉ. श्रीराम लागू
डॉ लागूंनी नाटकांबरोबरच हिंदी-मराठी चित्रपटातही भूमिका केल्या. त्यांच्या 'सिंहासन', 'पिंजरा', 'सामना', 'मुक्ता', 'जानकी','भिंगरी' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. पिंजरातील साधाभोळा मास्तर बाईच्या नादाला लागून कसा तिच्या जाळ्यात अडकतो हि भूमिका डॉ. लागूंनी उत्तमरीत्या साकारली आहे. सामनातील त्यांची व निळू फुलेंची अभिनयातील जुगलबंदी तर उत्तमच. दोन अभिनयात कसलेले कलाकार सामना चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळाले. त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा मराठी चित्रपटाबरोबर हिंदी चित्रपटातही उमटवला. 'लावारीस', 'मुकद्दर का सिकंदर', 'हेराफेरी' या गाजलेल्या चित्रपटात देखील आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पडली.
सन्मान आणि पुरस्कार
डॉ. लागूंनी नाटक व सिनेमांमध्ये आपल्या कसदार अभिनयाची छाप पडली. त्यांनी केलेल्या अभिनयामुळे त्यांना पुढील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन १९७८ साली फिल्मफेअर पुरस्कार, १९९७ साली कालिदास सन्मान, २००६ साली दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार, २०१० साली संगीत नाटक अकादमी फेलोशिप, २०१२ साली राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या अभिनयाचा गौरवच आहे.
'नटसम्राट' व अभिनयाचा महामेरू डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे रंगभूमी व हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी पोरकी झाली.
No comments:
Post a Comment