Sunday, November 3, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ५ व ६)


तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ५ व ६)

आम्हां घाली पाठीकडे । आपण कळिकाळासी भिडे ।। ५ ।।
तुका म्हणे कृपानिधी । आम्हां उतरी नावेमधीं ।। ६ ।।

अर्थ : मोठया संकटप्रसंगी आम्हा भक्तजनांना पाठीशी घेऊन आपण कळिकाळाशी झगडण्यास तयार होते. तुकाराम महाराज म्हणतात, "कृपेचा केवळ ठेवाच जो पांडुरंग, तो आम्हाला जन्ममृत्युरूपी संसारनदीतून आपल्या नामनौकेने पार उतरून नेतो."

भावार्थ : भक्तांवर कितीही मोठे संकट येवो, विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून येतो व भक्तांना संकटातून सोडवतो. संत गोरा कुंभार माती तुडवत होते व विठ्ठलनामात दंग होते. माती तुडवता तुडवता त्यांच्या पायाखाली त्यांचेच लहान मुल आले व तुडवले गेले हे देखील त्यांना कळले नाही. जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांनी विठ्ठलाचा धावा केला. गोरा कुंभारांनी केलेला धावा ऐकून विठ्ठलाने मेलेले मुल जिवंत केले. जनाबाईवर चोरीचा आळ आला. तिला सुळावर चढवण्याची शिक्षा झाली. जेव्हा तिला सुळावर चढवले तेव्हा तिने विठ्ठलाचा धावा केला. तिने केलेला धावा ऐकून विठ्ठलाने सुळाचे पाणी केले व जनाईला संकटातून सोडवले. मंगळवेढयाला मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नावाचून तडफडू लागले. दामाजींना हे दुःख पाहवले नाही. त्यांनी लोकांसाठी सरकारी गोदाम (कोठार) खुले केले व लोकांना पाहिजे तेवढे धान्य वाटून टाकले. हि वार्ता बादशहाला कळली. बादशहाने लगेच दामाजीला बेडया घालून आणण्याची व तुरूंगात टाकण्याची आज्ञा केली. हि वार्ता ऐकून दामाजी विठ्ठलाचा धावा करू लागला. विठ्ठलाने महाराचे रूप घेऊन धान्याचे सर्व पैसे बादशहाला दिले. बादशहाने दामाजीला सोडण्याची आज्ञा केली. विठ्ठलाने महाराचे रूप घेऊन दामाजींना मदत केली. 
          तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे वरील प्रसंगात संकटाच्या वेळी विठ्ठल भक्तांच्या पाठीशी उभा राहिला व स्वतः संकटांशी तोंड देण्यास तयार झाला व भक्तांना सुखरूप ठेवले. 
               पांडुरंगाची भक्ती केल्याने, त्याचे नित्यनियमाने नामस्मरण केल्याने पांडुरंग संसारपाशातून सोडवतो. आपले मन संसारात गुरफटले असेल तर पांडुरंग त्यातून सोडवतो व मनाला सुख, आनंद प्राप्त करून देतो. विठ्ठलनामामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. विठ्ठलाची भक्ती केल्यामुळे संसारातील सर्व अडचणी व कटकटीतून मुक्तता मिळते. पातकांचे क्षालन होते. मनातील लोभ, अहंकार, गर्व, आशा, वासना हे विकार जाऊन मन भक्तीमार्गाकडे व सत्कर्माकडे धावू लागते. मनात चांगले विचार येतात त्यामुळे मन पवित्र, निर्मळ होते. सतत विठ्ठलभक्तीमुळे संपुर्ण देह विठ्ठलमय होतो. जो भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करतो त्याला वरील सर्व फायदे मिळतात. विठ्ठल त्याच्यावर कृपादृष्टी ठेवतो. त्याला जन्ममृत्यूरूपी संसारनदीतून उतरून नेतो म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून व संसाराच्या पाशातून सोडवतो. 













 































































 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...