कथा विवेकानंदांची -- भाषणातील एकाग्रता
हि गोष्ट आहे नरेंद्र जेव्हा स्वामी विवेकानंद बनून अमेरिकेला गेले होते तेव्हाची. अमेरिकेच्या पश्चिम भागातील एका गावी व्याख्यान देताना विवेकानंद म्हणाले कि, "ज्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे तो सदा-सर्वकाळ शांत आणि अविचलित राहतो. बाहेरच्या जगातील कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही."
त्या व्याख्यानाला आलेल्या काही गुराखी पोरांनी त्यांचे हे म्हणणे ऐकले होते. म्हणून स्वामीजी जेव्हा त्यांच्या गावी व्याख्यानाला आले तेव्हा याबाबतीत त्यांची परीक्षा घेण्याचे त्या पोरांनी ठरवले. व्याख्यानासाठी स्वामीजींना एका पालथ्या टाकलेल्या टबावर उभे केले. व्याख्यान सुरु झाले आणि थोडयाच वेळात स्वामीजी त्या विषयाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेले. त्यावेळी या गुराखी पोरांनी मागून बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास सुरवात केली. स्वामीजींच्या कानाजवळून त्या गोळ्या सूं सूं करीत जात होत्या, पण स्वामीजींना त्याचे भानही नव्हते. ते पूर्णपणे एकाग्र होऊन भाषण करीत होते.
जेव्हा व्याख्यान संपले आणि स्वामीजी खाली बसले, तेव्हा खजील होऊन ती पोरे पुढे आली आणि स्वामीजींची क्षमा मागून त्यांना म्हणाली, "आपण फार थोर आहात. आपण जे तोंडाने सांगता ते आचरणातही आणता."
No comments:
Post a Comment