तुकाराम महाराज गाथा - अभंग - वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ।।१।।
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ।।२।।
दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ।।३।।
तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळ ।।४।।
ओवी : वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ।।१।। करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ।।२।।
अर्थ : विठ्ठलाचे सेवक हे मोठे शूर आहेत, म्हणून काळ त्यांच्या पाया पडतो. ते निरंतर विठ्ठलनामाच्या जयजयकाराचा घोष करितात, त्या योगाने मोठमोठे पापांचे डोंगरही जळून जातात.
भावार्थ : विठ्ठलाचे सेवक (भक्त) सतत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असतात. भजन-कीर्तनात दंग असतात. त्यांचे मुखातून 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग-पांडुरंग' असा विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. विठ्ठलावर त्यांची अपार श्रद्धा असते. त्यांनी विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थान दिलेले असते. तसेच ते विठ्ठलाशी एकरूप झालेले असतात. विठ्ठलही आपल्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. त्यांच्या अडीअडचणीला धावून येतो. भक्तांवर आलेली संकटे स्वतः झेलतो तसेच संकटांचे निवारण करतो. म्हणूनच विठ्ठलाचे भक्त हे निर्धास्त असतात. विठ्ठल पाठीराखा असल्याने विठ्ठलभक्त कुणालाही घाबरत नाहीत अगदी काळालासुद्धा. विठ्ठलामुळे काळच त्यांच्याजवळ यायला घाबरतो तसेच त्यांच्या पाया पडतो. विठ्ठलनामात फार मोठी ताकत आहे. सतत विठ्ठलाचे नाम घेतल्याने (जयजयकाराचा घोष केल्याने) मन पवित्र, निर्मळ होते. मनात असलेले वाईट विचार निघून जातात. हातून घडलेल्या पापांचे क्षालन होते. म्हणूनच विठ्ठलभक्त सतत विठ्ठलनामाच्या जयजयकाराचा घोष करतात त्यायोगाने त्यांचे हातून घडलेल्या पापांचे क्षालन होते.(पापांचे डोंगर जळून जातात.)
ओवी : दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ।।३।। तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ।।४।।
अर्थ : त्या वीरांच्या हातामध्ये दया क्षमा शांति हे न तुटणारे बाण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या भूमंडळामध्ये तेच एक बलाढय आहेत.
भावार्थ : विठ्ठलाचे भक्त हे मनाने प्रेमळ असतात. ते सहसा कुणावर क्रोधीत होत नाहीत. त्यांच्याविषयी कुणी अपशब्द वापरले अथवा त्यांची निंदानालस्ती केली तरी ते करणाऱ्यावर चिडत नाहीत. शांतचित्ताने सर्व ऐकून घेतात व करणाऱ्याला चार चांगल्या उपदेशपर गोष्टी सांगतात. त्यांच्या प्रेमळ व शांत स्वभावामुळे ते रंजल्या-गांजलेल्याना, दीन-दुबळ्या, गरीबांना आपलेसे करतात. त्यांना पाहिजे ती मदत करतात. अशा लोकांवर ते प्रेम करतात. जर एखादा वाईट मार्गाने जात असेल, वाईट विचाराने वागत असेल तर अशा माणसाला विठ्ठलभक्त क्षमा करतात व त्याला दुष्कृत्य करण्यापासून रोखतात तसेच चांगल्या मार्गावरून चालण्यास व विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करतात. दया क्षमा शांति या त्रिसूत्रीनुसार त्यांचे आचार विचार असतात. 'दया क्षमा शांति, तेथे देवाची वस्ती' या उक्तीनुसार त्यांचेजवळ देवाची वस्ती आहे. त्यामुळे संकटे, अडचणी, दुःख त्यांचेपासून लांब राहतात. देवच त्यांचा पाठीराखा असल्याने ते बलाढय आहेत. ते कुणाला घाबरत नाहीत. म्हणूनचं तुकाराम महाराज म्हणतात कि, "त्या वीरांच्या (विठ्ठल भक्तांच्या) हातामध्ये दया क्षमा शांति हे न तुटणारे बाण आहेत म्हणूनच ते ह्या भूमंडळामध्ये (पृथ्वीमध्ये) बलाढय आहेत."
No comments:
Post a Comment