आषाढी एकादशी -- आनंद व भक्तिमय सोहळा
एका महिन्यात दोन एकादशी असतात. त्यात सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी व कार्तिकी एकादशी. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन हि देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रातीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होते म्हणजेच देवांची रात्र सुरु होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी म्हणतात.
आषाढी एकादशीला असंख्य भक्तजन विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला जात असतात व विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरात भक्तजनांचा मेळाच भरलेला असतो. या दिवशी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज व इतर संतांच्या पालख्या व त्यांच्या बरोबर आलेल्या वारकऱ्यांच्या दिंडया पंढरपुरात दाखल होतात. सगळीकडे टाळ, मृदूंगाच्या निनादात विठूनामाचा गजर चालू असतो. विठ्ठलाच्या दर्शनामुळे सर्व भक्तजन पंढरपूरच्या वाळवंटात आनंदाने नाचत असतात, विठूनामाच्या गजरात डोलत असतात. " अवघे गरजे पंढरपूर, चालला विठूनामाचा गजर" या उक्तीनुसार संपूर्ण पंढरपूर विठूनामाच्या गजराने भरून गेलेले असते तसेच भक्तीमय वातावरणाने भारावून गेलेले असते. पंढरपूरनगरी भक्तीरसाने न्हाहून निघालेली असते. पंढरपुरात या दिवशी आनंद, चैतन्यदायी सोहळाच भरलेला असतो. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात एकादशीचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, "आज आहे एकादशी । चला जाऊ पंढरीसी ।। १ ।। चंद्रभागे करुनि स्नान । घेऊ देवाचे दर्शन ।। २ ।। वाळवंटी झाली दाटी । संत महंत होतील भेटी ।। ३ ।। तुका म्हणे पंढरपूर । साधू संतांचे माहेर ।। ४ ।।
एकादशी व्रत हे पवित्र, निर्मळ आहे. या दिवशी उपवास करावा. विठ्ठलाचे चिंतन करावे, नामस्मरण करावे, भजन-कीर्तन गावे. हरीकथा वाचावी. ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज गाथा, एकनाथी भागवत असे ग्रंथ वाचावेत. एकादशी व्रत कसे करावे हे पुढील अभंगात सांगितले आहे, "एकादशी, एकादशी । जया छंद अहर्निशी ।। १ ।। व्रत करी जो नेमाने । तया वैकुंठीचे येणे ।। २ ।। नामस्मरण, जाग्रण । वाचे गाये नारायण ।। ३ ।। तोचि भक्त सत्य याचा । एक जनार्दन म्हणे वाचा ।। ४ ।।" पुढील अभंगात असे म्हणले आहे कि, "पवित्र व्रत एकादशी । करा रे उपवासी ।। १ ।। करा रे हरीचे चिंतन । वाचे गावे हरीचे भजन ।। २ ।। चला जावू पंढरीला । विठू माऊलीच्या दर्शनाला ।। ३ ।। घेऊ विठुरायाचे दर्शन । स्वच्छ, निर्मळ होईल मन ।। ४ ।।
एकादशी व्रत हे फलप्राप्ती करून देणारे व्रत आहे. हे व्रत केल्याने अंतर्मन व बाह्यमन शुध्द, निर्मळ होते. मोह, माया, मत्सर, क्रोध, लोभ, अहंकार या दुर्गुणांपासून मन बाजूला होते व विठ्ठलाशी एकरूप होते. विठ्ठल हे विष्णूचे रूप असल्याने विठ्ठलामार्फत विष्णूपाशी जायला मिळते हा आषाढी एकादशी करण्याचा मोठा फायदा आहे. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात कि, "ज्यासी घडे एकादशी । जाणे लागे विष्णूपाशी ।। तुका म्हणे पुण्यराशी । तोचि करी एकादशी ।।" म्हणजेच जो एकादशी करतो त्याच्या जवळ विठ्ठलाच्या रूपात पुण्याच्या राशी ओतल्या जातात.