तुकाराम महाराज गाथा
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांद्वारे सोप्या भाषेत जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी जवळ जवळ चार ते साडे चार अभंग लिहिले. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे.
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहे.
वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. तुकाराम महाराजांचे अभंग १३ दिवस पाण्यात होते. या १३ दिवसात तुकाराम महाराज अन्न पाण्याविना नदीकाठी बसून होते. लोकही त्यांच्याबरोबर बसून होते व त्यांचे अभंग म्हणत होते. चौदाव्या दिवशी एक चमत्कार घडला व अभंग पाण्यावर तरंगू लागले. हे अभंग बघून तुकाराम महाराजांसह इतर जमलेल्या लोकांना आनंद झाला. त्यांनी अभंगांची गावातून मिरवणूक काढली. हा चमत्कार बघून रामेश्वर भटांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले.