Monday, October 26, 2020

अवीट गोडीचे गाणे -- विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी


 अवीट गोडीचे गाणे -- विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी

          हे भावगीत गायले आहे माणिक वर्मा यांनी. या गीताला संगीत दिले आहे बाळ माटे यांनी. हे गीत लिहिले आहे योगेश्वर अभ्यंकर यांनी. 

         जेव्हा प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परतात तेव्हा अयोध्या नगरी आनंदाने फुलून उठते. प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्या नगरीत परत येतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात आनंद उत्पन्न झालेला असतो. अयोध्या नगरीत मंगलमय वातावरण तयार झालेले असते. प्रत्येकाच्या घरावर गुढयातोरणे उभारल्या जातात. घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. गुलाल उधळला जातो. सनई चौघडे  वाजवले जातात. फुलांचा सडा शिंपडला जातो. आपला आवडता राजा घरी परत आला आहे म्हणून प्रभू रामचंद्र कि जय असा गजर सगळीकडे चालू असतो. एकूणच संपुर्ण अयोध्या नागरी प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत तल्लीन झालेली आहे. 

           

विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी

गुलाल उधळून नगर रंगले, भक्तगणाचे थवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे, गुढ्यातोरणे घरोघरी ग

आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी

श्रीरामाचा गजर होऊनी, पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी, भक्ती युगाची ललकारी ग

 


 

Saturday, October 10, 2020

तुकाराम महाराज अभंग -- चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।।

 तुकाराम महाराज अभंग --  चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।।

चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।। १ ।।

बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ।। २ ।।

मनाचे तळमळे ।  चंदनेही अंग पोळे ।। ३ ।।

तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ।। ४ ।। 

          "चित्ताचे जर समाधान असेल तर विषवत असणारे दुःख सोन्यासारखे वाटते." या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे  कि, जर आपले मन समाधानी असेल, मनात कुठलाही लोभ नसेल तर आपल्याला जे दुःख होईल ते विषासारखे न वाटता सोन्यासारखे वाटेल म्हणजेच होणाऱ्या दुःखातूनही सुख वाटेल. "विषयाची हाव अतिशय असणे हे फार खोटे आहे." यातून असे सुचवायचे आहे कि एखादया गोष्टीबद्दल म्हणजेच संपत्ती, धन-द्रव्य, किंमती सुवर्णअलंकार याबद्दल अतिशय हाव बाळगली किंवा लोभ सुटला तर तो वाईटच आहे कारण तो शेवटी विनाशाकडे नेतो. म्हणूनच जास्त हाव न बाळगता जे आहे त्यातच समाधान मानले म्हणजे वाईट वाटणार नाही. "मन जर तळमळ करीत असेल तर चंदनाचे उटीनेही अंग भाजते. मन अस्वस्थ असेल तर अन्य  सुखोपचाराची पूजा केल्याने पीडा होते." तुकाराम महाराजांना असे सांगायचे आहे कि, एखादया गोष्टीबद्दल म्हणजेच संपत्ती, धन-द्रव्य, किंमती सुवर्णअलंकार याबद्दल अतिशय हाव बाळगली किंवा लोभ सुटला व ती गोष्ट मिळवण्यासाठी  मन तळमळ करीत असेल किंवा आतल्या आत जळत असेल तर चंदनासारख्या   थंडगार वस्तूने सुद्धा आग शांत होणार नाही. व एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून मन अस्वस्थ होत असेल तर दुसरे कुठलेही सुख पुढे टाकले तरी मनाचे समाधान होणार नाही. उलट ती गोष्ट मिळत नसल्याने दुःखच होणार.











 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...