तुकाराम महाराज गाथा - अभंग - डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२।।
मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥
ओवी : डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२।।
अर्थ : डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भुतें आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण आत्मानुभवाची खूण तेथे नसते.
भावार्थ : बरेच लोक असे असतात कि, ते आपल्या डोक्यावर केसांच्या जटा वाढवतात. अंगावर भस्म लावतात, गळ्यात मोठमोठया माळा घालतात व स्वतःला संत म्हणवतात. खरे तर हे लोक ढोंगी, पाखंडी असतात. त्यांना देवाविषयी, भक्तीविषयी काही ज्ञान नसते. परंतु खोटे ज्ञान सांगून लोकांना फसवण्याचा धंदा करतात. ह्या लोकांच्यात स्वार्थभाव दडलेला असतो. यांचे मन कधीही शुद्ध नसते. मन विषयांनी भरलेले असते. वरवर हे लोक संतांचा आव आणत असले तरी यांचे मन संसारचक्रात, मोहमायेत अडकलेले असते. त्यामुळे यांची भक्ती देवापर्यंत पोचू शकत नाही. त्यांच्या भक्तीत तेवढी ताकत नसते. त्यांच्यात आत्मानुभवाची खूण नसते म्हणजेच देवाने यांना दर्शन दिले आहे किंवा संकटकाळी देवाने यांना मदत केली आहे तसेच या लोकांनी देवाच्या मदतीने संकटात सापडलेल्या लोकांना सोडवले आहे असा काही त्यांना अनुभव आला नाही कारण त्यांच्या आत्म्याची ओळख देवाला कळली नाही.
खरे संत आहेत त्यांना केसांच्या जटा वाढवून, अंगाला भस्म फासून, अंगात भूते आणून संत म्हणवून घेण्याची गरज नसते. हे संत ईश्वरकार्यानेच संतपदाला पोहोचतात. त्यांचा जन्मच ईश्वरकार्यासाठी झालेला असतो. ईश्वरच त्यांचे हातून सत्कर्म घडवून आणत असतो. हि संतमंडळीसुद्धा ईश्वराने सांगितलेले कार्य करत असतात. ईश्वरभक्ती करा, त्याचे नामःस्मरण घ्या, शुद्ध आचरण ठेवा, नितीचा मार्ग अवलंबा, सत्याच्या मार्गावरून चाला ह्या ईश्वराने सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हि संतमंडळी करत असतात. संतमंडळींनी संसार, घरदार, संपत्ती यांचा त्याग करून, मोहमयी जीवनापासून लांब जाऊन ईश्वरभक्तीत तल्लीन झालेले असतात. ईश्वरचिंतनात हरवून गेलेले असतात. अशावेळेस त्यांचा संपूर्ण देह ईश्वराशी एकरूप झालेला असतो. त्यांचे मन ईश्वराचे अधीन झालेले असते. त्यांना थोडावेळ का होईना ईश्वररूप प्राप्त होते. हा जो संतांना अनुभव येतो तो आत्मानुभव. हा आत्मानुभव ढोंगी संतांना येत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, "डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भुतें आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण आत्मानुभवाची खूण तेथे नसते."
ओवी : मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥
अर्थ : काही मूर्ख, पुरुष व बायका यांना जमवून कित्येक नाना प्रकारचे शकुन सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या मैंदाजवळ खरोखर गोविंद रहात नाही.
भावार्थ : काही लबाड ढोंगी लोक 'मला देवाची कृपा झाली आहे, त्याच्या आज्ञेनेच मी तुमचे भविष्य (शकुन) सांगतो.' असे पुरुष व बायका यांना जमवून सांगत असतात. पुरुष व बायकाही अंधपणाने या ढोंगी, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवतात. खरं तर हे लोक खोटेपणाने पुरुष व बायकांना आपल्या जाळ्यात ओढून फसवत असतात. मासेमारी करणारा पाण्यात गळ टाकून बसतो व खाण्याच्या आशेने मासे त्या गळाला फसतात. तसेच हे ढोंगी लोक खोटी भविष्यवाणी सांगण्याचा गळ टाकतात व स्त्री-पुरुष बरोबर याच्या गळाला फसतात. असे ढोंगी लबाड लोक आपले पोट भरण्यासाठी लोकांना फसवत असतात. त्यांचे मनात स्वार्थभाव दडलेला असतो. मनात लालसा उत्पन्न झालेली असते. या लालसेपोटीच त्यांनी शकुन (भविष्यवाणी) सांगण्याचा खोटा धंदा उघडलेला असतो. या ढोंगी लोकांचे मन कधीही शुद्ध नसते. देवाला आवडतो निस्वार्थ व शुद्ध भाव. तोच या ढोंगी-लबाड लोकांकडे नसतो म्हणूनच गोविंद (विठ्ठल) यांचेजवळ रहात नाही.
No comments:
Post a Comment