तुकाराम महाराज गाथा - अभंग - दूध दही ताक पशूचे पाळण ।
दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हेचि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोह कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरी हें धन हातीं लागे ॥३॥
अर्थ - 'दूध दही ताक ह्यांच्या प्राप्तीकरिता गाई म्हशींचे रक्षण करितात, परंतु ह्या सगळ्याचे सार तूप आहे. आम्हा भाविक भक्तांच्या हातामध्ये तुपासारखे सारभूत असणारे वर्म राम हे आहे, म्हणून आम्ही त्याला चित्तात धरिला आहे.'
भावार्थ - गायी म्हशींपासून दूध मिळते. दुधापासून दही ताक तयार होते. दह्यापासून लोणी व लोण्यापासून तूप मिळते. म्हणजेच तूप मिळवण्यासाठी गाई-म्हशींचे रक्षण करणे आलेच. ह्या सर्व गोष्टींचे सार तूप आहे. भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टी केल्याने रामाची प्राप्ती होते. म्हणजेच ह्या सर्व गोष्टींचे सार राम आहे. रामाच्या प्राप्तीकरिता भक्त वरील गोष्टी करीत असल्याने त्यांना रामाची प्राप्ती होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, 'आम्हा भाविक भक्तांच्या हातामध्ये तुपासारखे सारभूत वर्म राम हे आहे. म्हणून आम्ही त्याला चित्तात धरिला आहे.'
अर्थ - 'लोखंड गारगोटी कापूस हि अग्नीच्या सिद्धीकरिता संग्रहास ठेवावी लागतात. नाही तर ह्यांचे ओझे कोण बाळगीत बसले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भूमिगत धन हस्तगत होईपर्यंत खोरे टिकाव पहार ह्यांचे रक्षण करावे लागते.'
भावार्थ - लोखंड गारगोटी कापूस हे ओझे जरी वाटत असले तरी वेळप्रसंगी अग्नी पेटवण्याकरीता (सिद्धीकरिता) त्याचा उपयोग होतो. तसेच भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टी कष्टपद वाटल्यातरी राम प्राप्तीसाठी ह्याचा उपयोग होतो. अग्नी पेटवायचा नसेल तर किंवा अग्नीची सिद्धी नको असेल तर लोखंड गारगोटी कापूस ह्या गोष्टींचे ओझे वाटू लागते. तसेच रामाची प्राप्ती नको असेल तर भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टी कष्टप्रद, निर्रथक वाटू लागतात.
भूमिगत धन (जमिनीत असलेले धन) मिळवण्यासाठी जमीन खोदावी लागते यासाठी खोरे टिकाव पहार ह्या गोष्टी लागतात. जोपर्यंत भूमिगत धन हस्तगत होत नाही (मिळत नाही) तोपर्यंत खोरे टिकाव पहार ह्यांचे रक्षण करावे लागते. तसेच रामाच्या प्राप्तीसाठी (रामाला मिळवण्यासाठी) भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टींची आवश्यकता असते. जोपर्यंत रामाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कराव्या लागतात. या गोष्टींची आवश्यकता असते.