Wednesday, March 22, 2023

पांडुरंगाच्या भूपाळ्या

 

 पांडुरंगाच्या भूपाळ्या 


१) उठा पांडुरंगा आता प्रभातसमयो पातला ।
    वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ।। १ ।। 
    गरुडपारा पासुनी महाद्वारापर्यंत ।
    शुकसनकादिक नारद-तुंबर भक्तांच्या कोटी ।
    त्रिशूल डमरू घेऊनि उभा गिरिजेचा पती ।। २ ।।
    कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।
    पाठीमागे उभी डोळा लावुनिया जनी ।। ३ ।।

२) उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ।
    झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ।। १ ।।
    संत साधू मुनी अवघे झालती गोळा ।
    सोडा शेज सुखे आता बघू द्या मुखकमळा ।। २ ।।
    रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी ।
    मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ।। ३ ।।
    राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।
    शेजे हालवुनी जागे करा देवराया ।। ४ ।।
    गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।
    स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ।। ५ ।।
    झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
    विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकडा ।। ६ ।।

३)  उठा उठा साधुसंत साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत ।। धृ ।। 
    उठोनि वेगेशी चला जाऊ राऊळांशी । जळती पातकांच्या राशी कांकड आरती देखलीया ।। १ ।। 
    उठोनि पहाटे विठ्ठल पहा उभा विटे । चरण तयाचें गोमटें अमृतदृष्टी अवलोका ।। २ ।।          
    जागे  करा रुक्मिणीवरा देव जागा कि निदुसरा । वेगें निंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। ३ ।। 
    पुढे वाजंत्री वाजती ढोल ढमामे गर्जती । होते कांकड आरती पांडुरंगरायाची ।। ४ ।। 
    सिंहनाद शंखभेरी गजर होतो महाद्वारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।। ५ ।।

४)  भक्ती चिये पोटी बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।। १ ।। 
     ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा । दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा ।। धृ ।      माया अविद्या पीळ घालुनी कांकडा केला । अनुसंधान स्नेहामाजी सगळा भिजवीला ।। २ ।। 
     काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती । कोटी ब्रह्महत्या काळ मुख पाहतां जाती ।। ३ ।। 
     विटेसहित पाऊले जीवेभावे ओवाळू । कोटी रविशशी जैसे उगवले भानू ।। ४ ।। 
     एकीकडे राही एकीकडे रखुमाबाई । मयूर पिच्छ चामरे ढाळिती ठाईंच्या ठायी ।। ५ ।।    
     तुका म्हणे दीप घेऊनि जन्मनीत शोभा विटेवरी उभा जैसा लावण्य गाभा ।। ६ ।। 
     महाद्वारापासूनि गरुड परापर्यंत । झाली सुखाची दाटी नामदेव जोडुनिया हात ।। ७ ।। 
     असो नसो भाव, आलो तुझिया पाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरिराया ।। ८ ।। 
     अखंडित बैसावें ऐसे वाटते पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ।। ९ ।। 
     तुका म्हणे आम्ही तुझी   वेडी-वाकुडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ।। १० ।।

५)  पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली । ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी । भक्त मंडळी ।। 
     पुंडलिकाच्या साठी देवा येथे आलासी । विटेवरी नीट उभा हात कटेशी । 
     महाद्वारी गरुड उभा तुझ्या सेवेशी ।। ओवाळिती तुला रे देवा ।। १ ।। 
     दामाजीच्या साठी देवा महार झालाशी । कान्होपात्रा कलावंतीण नेली पायाशी । 
     मीराबाईसाठी देवा विष प्रशिशी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। २ ।। 
     नाम्यासंगे एका ताटी तूच जेविशी । एकनाथगृही देवा पाणी वाहीशी । 
     जनाबाई सुळी देता तिजशी रक्षिसी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। ३ ।।  
     चोख्यामेळ्यासंगे देवा ढोरे ओढीशी । गोऱ्याकुंभाराची देवा मडकी घडविशी । 
     प्रल्हादाच्या भक्तीसाठी देवा स्तंभी प्रगटशी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। ४ ।। 
     इतुके भक्त जमुनी तुझी दृष्ट काढिती । प्रपंचाचा वीट येऊनि आले पायाशी । 
     रुक्मिणीही विनविते तुझ्यारे चरणाशी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। ५ ।। 
 
 
 
 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...