जंजीर -- अमिताभ पर्वाची सुरवात
हा चित्रपट ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक प्रकाश मेहरा होते. या चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली. अमिताभ बच्चन, जया भादुरी, प्राण, ओम प्रकाश, अजित आणि बिंदू यांच्या मुख्य भूमिका होत्या.
अमिताभ बच्चन यांनी इन्स्पेक्टर विजय खन्नाची भूमिका केली. जया भादुरीने मालाची भूमिका केली. प्राणने शेरखान पठाणची भूमिका केली. अजितने गँगस्टर तेजाची भूमिका केली. अमिताभ इन्स्पेक्टर विजयच्या भूमिकेत चांगलाच शोभला. त्याची उंची व भारदस्त आवाजाने अमिताभने प्रेक्षकांवर चांगली छाप पडली. त्याला जया भादुरीने चांगली साथ दिली. प्राण व अजितचीही भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आधी राज कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि देव आनंद यांना विचारण्यात आले होते. यासर्वांनी नकार दिल्यावर अमिताभ यांना विचारण्यात आले. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी अमिताभचे १२ चित्रपट फ्लॉप झाले होते तर आनंद व बॉम्बे टू गोवा हे दोनच चित्रपट यशस्वी ठरले होते.
या चित्रपटातील गाणी गुलशन बावरा यांनी लिहिली आहेत. प्रकाश मेहरा यांनी 'दिल जालोंका दिल जला के' हे गाणे लिहिले आहे. या गाण्यांना कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिले आहे. आशा भोसले, मन्ना डे, लता मंगेशकर, मोहमद रफी यांनी गाणी गायली आहेत. मन्ना डे यांच्या आवाजातील प्राणवर चित्रित झालेले 'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी' हे गाणे चांगलेच गाजले. या गाण्यासाठी यांचे 'बेस्ट मेल प्ले बॅक सिंगर' चे फिल्मफेअर ऍवॉर्ड नॉमिनेट झाले होते.
अमिताभ बच्चन यांनी इन्स्पेक्टर विजय खन्नाची भूमिका उत्कृष्ठ केली. या भूमिकेमुळे त्यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. या भूमिकेमुळे त्यांच्यावर असलेला अपयशाचा शिक्का पुसला गेला. या चित्रपटामुळे अमिताभच्या रूपाने एका 'angry young man' चा जन्म झाला. अमिताभ यांनी दमदार अभिनयामुळे व करारी आवाजामुळे प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली. गुंडांशी लढताना दोन हात प्रेक्षकांना चांगलेच भावले. 'ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही' हा अमिताभ यांच्या आवाजातील संवाद चांगलाच गाजला. अमिताभ यांना फिल्मफेअर तर्फे दिल्या जाणाऱ्या 'बेस्ट ऍक्टर' या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.