Saturday, June 22, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥

ओवी : आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥ 

अर्थ : जे ब्रह्म आनंदरूप, एकटे, अविनाश, निर्मळस्वरूप आहे व ज्या निजवस्तूचे योगीजन ध्यान करितात, ते विठ्ठलाचे रूप भीमेच्या तीराला समचरण जोडून कटावर कर ठेवून शोभिवंत दिसत आहे, ते तुम्ही पहा. 

भावार्थ : तुकाराम महाराजांनी या अभंगात विठ्ठलाचे रूप छान वर्णिले आहे. ब्रह्म म्हणजेच विठ्ठल. तर हे ब्रह्मरूप कसे आहे तर आनंदरूप आहे. विठ्ठल म्हणजेच आनंद. विठ्ठलाचे रूप पाहिल्यावर मन आनंदी होते. मनाला सुख प्राप्त होते. त्याच्याजवळच आनंद ओसंडून वाहत असतो. म्हणूनच ते आनंदरूप आहे. विठ्ठल हा एकटा आहे म्हणजेच त्याच्याजवळ कोणतेही पाश नाहीत. त्याच्याजवळ कोणतीही अभिलाषा नाही. विठ्ठलरूप हे अविनाश आहे म्हणजेच ह्या रुपाला अंत नाही, हे रूप अनंत आहे. हे रूप कधीही नाश पावणार नाही. विठ्ठलरूप निर्मळस्वरूप आहे म्हणजेच या रुपाजवळ मोह, माया, क्रोध, वासना, लोभ, मत्सर हे दुर्गुण फिरकत नाहीत. उलट आनंद, शांती, समाधान, सुख हे सद्गुण ओतप्रोत भरलेले आहेत. हे रूप पाहिल्यावर मन प्रसन्न होते, आनंदी होते, समाधान पावते. म्हणूनच योगीजन व संत-महंत या रूपाचे ध्यान करितात. 

          हे विठ्ठलाचे रूप भीमेच्या तीराला समचरण जोडून व कटावर कर ठेवून (कंबरेवर हात ठेवून) विटेवर उभे आहे तसेच दोन्ही कानात मकरकुंडले घातली आहेत, डोक्यावर सोन्याचा मुकुट परिधान केला असून गळ्यात वैजयंती माळ घातली आहे तसेच तुळशीमाळा घातल्या आहेत. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे. कंबरेला पीतांबर नेसला असून अंगावर भरजरी शेला पांघरला आहे. असा हा शोभिवंत मदनाचा पुतळाच आहे. हे विठ्ठलाचे शोभिवंत, डोळ्यांना सुख देणारे रूप सर्वानी पाहावे असे तुकाराम महाराज सांगत आहेत. 

ओवी : पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥ तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥

अर्थ : जे पुराणास कळले नाही व ज्याचे वर्णन वेदश्रुतीस होत नाही ते पुंडलिकरायाकरीता साकार झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या पांडुरंगाचे ध्यान सनकादिक करतात ते आमचे कुळदैवत आहे. 

भावार्थ : विठ्ठल हा भक्तवत्सल आहे. त्याचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम आहे. आपल्या भक्तांसाठी तो माउलीसमान आहे. आपल्या भक्तांची तो काळजी वाहत असतो तसेच त्यांच्या हाकेला ओ देतो. विठ्ठल व भक्ताचे नाते प्रेमाचे, मायेचे, ममतेचे आहे. या नात्यामुळेच, प्रेमापोटी पुंडलिकाकरीता विठ्ठल सगुण साकार झाला. हे विठ्ठलाचे आनंदमय, अविनाश, निर्मळ असे स्वरूप पुराणासही कळले नाही व वेदश्रुतीतही तो सापडत नाही असे हे स्वरूप भक्तांसाठी धावून येणारे रूप आहे. म्हणूनच या पांडुरंगाचे ध्यान संत-महंत, सनकादिक करतात. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आपले सर्वस्व मानले आहे. त्यांचे घरातच पहिल्यापासून विठ्ठलाची पूजा केली जायची, पंढरपूरची वारी केली जायची. तुकाराम महाराजही विठ्ठलाची पूजाअर्चा करू लागले, त्याचे नामस्मरण करू लागले. पंढरपूरच्या वारीला जावू लागले. विठ्ठलाची अखंड भक्ती करू लागले. विठ्ठलालाच त्यांनी आपले कुळदैवत मानले. म्हणूनच ते म्हणतात कि, पांडुरंग आमचे कुळदैवत आहे.

 

आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, June 21, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥

तुकाराम महाराज गाथा - अभंग - माझी विठ्ठल माउली । प्रेमेंपान्हा पान्हाइली ॥

माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥४॥

ओवी : माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥ कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥

अर्थ : माझी विठ्ठल आई आहे ती मजविषयीच्या प्रेमपान्ह्याने पान्हावली आहे. मला कुरवाळून तिने आपल्या स्तनी लाविले आहे. ती माझ्या जवळून दूर जात नाही. 

भावार्थ : तुकाराम महाराजांचे व विठ्ठलाचे नाते वात्सल्याचे आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांची आई आहे तर तुकाराम महाराज विठ्ठलाचे लेकरू. आई आपल्या लेकरावर मनापासून प्रेम करत असते म्हणूनच आपल्या लेकराला पाहिल्यावर तिला पान्हा फुटतो. लेकराला प्रेमाने कुरवाळून आपल्या स्तनाला लावून लेकरू तृप्त होईपर्यंत दूध पाजते. लेकरू दुध पिवून तृप्त झाले कि आईला समाधान होते. तसेच विठ्ठलालाही तुकाराम महाराजांना पाहिल्यावर प्रेमपान्हा फुटतो. म्हणजेच विठ्ठल तुकाराम महाराजांवर अतोनात प्रेम करतो. आपल्या प्रेमपान्ह्याने तुकाराम महाराजांना चिंब भिजवतो. तुकाराम महाराज तृप्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करतो. जोपर्यंत तुकाराम महाराज तृप्त होत नाहीत, समाधान पावत नाहीत तोपर्यंत विठ्ठल त्यांच्यापासून दूर जात नाही.  

ओवी : केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥४॥

अर्थ : मी जो जो म्हणून हट्ट करीत आहे तो तो ती पुरवीत आहे, कारण ती निष्ठूर नसून कनवाळू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ती माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास घालीत आहे. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांची आई असल्याने आपल्या भक्तांवर कधीच निष्ठूर नसते उलट आपल्या भक्तांबाबत प्रेमळ,कनवाळू असते. या प्रेमामुळेच विठ्ठल आपल्या भक्तांचे लाड करीत असतो. भक्त जे जे हट्ट करतील ते ते हट्ट प्रेमाने पुरवीत असतो. विठ्ठल तुकाराम महाराजांची आई झाल्याने त्यांच्याबाबतही प्रेमळ, कनवाळू आहे व या प्रेमापोटीच तुकाराम महाराज जे जे हट्ट करतील ते ते हट्ट लाडीकपणे पुरवीत असतो. तसेच आई जसे प्रेमाने आपल्या बाळाला घास भरविते तसेच विठ्ठलही तुकाराम महाराजांना प्रेमाने ब्रह्मरसाचा घास भरवीत आहे.  

 


Monday, June 17, 2024

बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट - १९८५ अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान

 

बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट - १९८५ अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 

अंतिम सामना - १० मार्च १९८५ (दिवस-रात्र) 

 भारत विरुद्ध पाकिस्तान 

श्रीकांतच्या धडाकेबाज खेळीमुळे व रवी शास्त्रीच्या टिच्चून फलंदाजीमुळे भारत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स 

          हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळवण्यात आला. या सामन्यात रेमंड इशरवूड (ऑस्ट्रेलिया) व टोनी क्राफ्टर (ऑस्ट्रेलिया) यांनी पंच म्हणून काम पाहिले. धडाकेबाज खेळीमुळे (७७ चेंडूत ६७ धावा) के श्रीकांतला सामनावीर पुरस्कार दिला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

          भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात दोन आशियाई व शेजारील देश चषकासाठी खेळत होते. हा सामना बघण्यासाठी ३५२९६ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात नसूनसुद्धा इतक्या प्रेक्षकांनी उपस्थिती लावणे म्हणजे एक आश्चर्यच होते. अंतिम सामना जिंकून  बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट चषकावर कुणाचे नाव कोरले जाणार याची उत्सुकता उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना व दूरदर्शनवरून बघणाऱ्या तमाम प्रेक्षकांना लागून राहिली होती. भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ ची विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे सर्व देशांचे लक्ष भारताकडे लागले होते. भारताने या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती त्यामुळे अंतिम सामन्यातही उत्कृष्ठ कामगिरी करून भारत चषकावर आपले नाव कोरणार का याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली होती. 

          पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला सुरवात केली. डावाची सुरवात मुदस्सर नजर व मोहसीन खान यांनी केली. दोघांनी डावाची सुरवात सावध केली. धावसंख्या १७ झाली असताना मोहसीन खान अवघ्या ५ धावा काढून कपिल देवाच्या गोलंदाजीवर मोहमद अझरुद्दीनकडे झेल देऊन बाद झाला. धावसंख्या २९ झाली असताना कपिल देवने मुदस्सर नजरला १४ धावांवर यष्टीरक्षक विश्वनाथकडे झेल द्यायला लावून पाकिस्तानला झटका दिला. अशा तऱ्हेने कपिल देवने सलामीची जोडी २९ धावात तंबूत धाडली. कपिल देवनेच सुंदर चेंडू टाकून कासीम उमरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाबाद करून आणखी एक झटका दिला. उमर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची ३ बाद २९ अशी अवस्था झाली. धावसंख्या ३३ झाली असताना चेतन शर्माने रमीझ राजाला श्रीकांतकडे झेल द्यायला लावून पाकिस्तानला जबरदस्त हादरा दिला. रमीझ राजाला अवघ्या ४ धावा करता आल्या. अशा तऱ्हेने भारतीय गोलंदाजांनी विशेषतः कपिल देवने सुंदर गोलंदाजी करत ४ पैकी ३ बळी मिळवत ३३ धावात वरची फळी गारद करून पाकिस्तानला चांगेलच अडचणीत आणले. 

          पाकिस्तानचा संघ ४ बाद ३३ अशा अडचणीत सापडला असताना जावेद मियांदाद व इम्रान खान यांनी सावध व संयम राखून खेळायला सुरवात केली. त्यांनी एकेरी, दुहेरी धावसंख्येवर भर देत धावफलक हालता ठेवला. दोघांनी धावसंख्या १०१ पर्यंत नेली. दोघांच्यात ६८ धावांची भागीदारी झाली. हीच भागीदारी पाकिस्तानसाठी सर्वोच्च ठरली. हि जोडी टिकेल असे वाटत असतानाच इम्रान खान ३५ धावा (६७ चेंडू २ चौकार) काढून धावबाद झाला. सुनील गावस्करने अचूक फेकीने त्याला धावबाद केले. इम्रान खान बाद झाला तरी जावेद मियांदाद भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करीत होता. त्याने सलीम मलिकला हाताशी धरून धावसंख्या १३१ पर्यंत नेली. दोघांच्यात ६ व्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी झाली. शिवरामकृष्णनने आपल्या फिरकी माऱ्याने सलीम मलिकला जाळ्यात ओढून चेतन शर्माकडे झेल द्यायला लावून बाद केले. मलिकने फक्त १४ धावा काढल्या. १३१ याच धावसंख्येवर  शिवरामकृष्णनने जावेद मियांदादला चकवून यष्टीरक्षक विश्वनाथकरवी यष्टिचित करून महत्वाचा बळी मिळवला. जावेद मियांदादने सयंमी व सावध खेळी करत ९२ चेंडूत २ चौकार मारत ४८ धावा केल्या. पाकिस्तानसाठी याच धावा सर्वोच्च ठरल्या तसेच त्याने इम्रान खानबरोबर केलेली ६८ धावांची भागीदारी व सलीम मलिक बरोबर केलेली ३० धावांची भागीदारी पाकिस्तानसाठी मोलाची ठरली. जावेद मियांदाद बाद झाला तेव्हा पाकिस्तानची ७ बाद १३१ अशी अवस्था झाली. 

          जावेद मियांदाद बाद झाला तेव्हा पाकिस्तान चांगेलच दडपणाखाली होते कारण दीडशेच्या आत महत्वाचे खेळाडू तंबूत परतले होते. वसीम राजा व ताहीर नकाश खेळपट्टीवर होते. १४२ धावसंख्या झाली असताना ताहीर नकाश १० धावा काढून रवी शास्त्रीच्या गोलंदाजीवर  यष्टीरक्षक विश्वनाथकडे झेल देवून बाद झाला. पाकिस्तान ८ बाद १४२. धावसंख्येत ३ धावांची भर पडल्यावर अनिल दलपत भोपळाही न फोडता शिवरामकृष्णनच्या गोलंदाजीवर रवी शास्त्रीकडे झेल देवून तंबूत परतला. दलपत बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था ९ बाद १४५ अशी होती. पाकिस्तानचा डाव लवकर संपवण्याची संधी भारतीय गोलंदाजांकडे होती परंतु हि संधी वसीम राजा व अझीम हाफीज यांनी मिळू दिली नाही. दोघेही शेवटपर्यंत भारतीय गोलंदाजीचा सामना करीत धावसंख्या वाढवत होते. शेवटी त्यांनी ५० षटकात १७६ पर्यंत धावसंख्या नेली. दोघांनी नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. वसीम राजा २१ धावा (२६ चेंडू १ चौकार) काढून नाबाद राहिला तर अझीम हाफीज ७ धावा काढून नाबाद राहिला. पाकिस्तानचा डाव ५० षटकात ९ बाद १७६ पर्यंत(३.५२ च्या धावगतीने) मर्यादित राहिला. भारतीय गोलंदाजांनी १८ अवांतर धावा (७ बाईज, ८ लेगबाय, २ नोबॉल, १ वाईड) देवून पाकिस्तानला धावसंख्या वाढवण्यास मदत केली. 

          भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ठ मारा करत पाकिस्तानला १७६ धावात रोखले. कपिल देवने उत्कृष्ठ मारा करत पाकिस्तानला पहिले तीन हादरे दिले. त्याच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण असे होते ९ षटके १ निर्धाव २३ धावा ३ बळी.  शिवरामकृष्णनने उत्कृष्ठ फिरकी मारा करत ९ षटकात ३५ धावा देत ३ गडी बाद केले. चेतन शर्मा व रवी शास्त्री यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

          विजयासाठी ५० षटकात १७७ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरवात रवी शास्त्री व के श्रीकांत यांनी केली. रवी शास्त्रीने सयंमी व सावध खेळी केली तर श्रीकांतने धडाकेबाज खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. या शतकी भागीदारीत महत्वाचा वाटा होता श्रीकांतचा. त्याने ७७ चेंडूत ६ चौकार मारत व २ उत्तुंग षटकार ठोकत जलदगती खेळी करत ६७ धावा केल्या. याच धावा भारतीय संघासाठी मोलाच्या ठरल्या तसेच त्याने शास्त्रीबरोबर केलेली १०३ धावांची भागीदारी भारतीय संघाच्या विजयाचा पाया घालून गेली. श्रीकांत बाद झाला तेव्हा भारताने १ बाद १०३ अशी मजल मारली होती. श्रीकांतच्या जागी मोहमद अझरुद्दीन खेळायला आला. त्याने व शास्त्रीने मिळून धावसंख्या १४२ पर्यंत नेली. दोघांच्यात उपयुक्त अशी ३९ धावांची भागीदारी झाली. अझरुद्दीन जलदगतीने खेळून धावा वाढवत होता. त्याने छोटी पण उपयुक्त खेळी खेळताना २६ चेंडूत ३ चौकार मारत २५ धावा केल्या. ताहीर नकाशने त्याला त्रिफळाबाद केले. 

          अझरुद्दीन बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती व भारताचे ८ फलंदाज खेळायचे बाकी होते तसेच रवी शास्त्री एका बाजूला घट्टपणे पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता व धावा वाढवत होता त्यामुळे भारत विजयाला कधी गवसणी घालणार व चषक आपल्या नावावर करणार याची एकच उत्सुकता तमाम भारतीय प्रेक्षकांना लागून राहिली होती. सर्व प्रेक्षक भारताच्या विजयाकडे डोळे लावून बसले होते व धावागणिक जल्लोष करीत होते. शेवटी शास्त्रीने व दिलीप वेंगसरकरने विजयासाठी उरलेल्या ३५ धावा काढून भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता संपवली. भारताने उत्कृष्ठ खेळ करत ४७.१ षटकात २ गडी गमावत १७७ धावा करून पाकिस्तानवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ह्या विजयात महत्वाचा वाटा होता श्रीकांतचा. त्याने ७७ चेंडूत ६७ धावा केल्या. रवी शास्त्रीही संयमी फलंदाजी करत अफलातून खेळी खेळला. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहात १४८ चेंडूंचा सामना करत ३ चौकार मारत उपयुक्त अशा ६३ धावा केल्या. दिलीप वेंगसरकरने १८ धावा करून विजयात खारीचा वाटा उचलला. फलंदाजीत व गोलंदाजीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ठ व अफलातून कामगिरी करत बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रॉफीवर (चषकावर) सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले.




          रवी शास्त्रीला 'स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू' म्हणून निवडण्यात आले तसेच त्याला बक्षीस म्हणून 'ऑडी १००' कार देण्यात आली. याच कार मधून भारतीय खेळाडूंनी मैदानावर फेरी मारली.

















 

 

 

 

 

 

 

 


Sunday, June 16, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥

 

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥

राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२।।
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३।।
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥

ओवी : राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२।।

अर्थ : हे पांडुरंगाचे विटेवरील ध्यान माझ्या डोळ्यांपुढे जसेचे तसे राहो, आणि माझे मन त्याठिकाणी सक्त होवो. मग आपल्या जीवामध्ये त्या ध्यानाला कोंडून धरीन आणि मजमध्ये असणारा जो देहभाव, तो मी त्याला वाहून पूजा करीन.  

भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीत, त्याचे नामस्मरणात अखंड बुडाले होते. विठ्ठलाच्या भक्तीरसात न्हाऊन निघत होते. भजन-कीर्तनात रंगून जात होते. त्यांनी विठ्ठलाला आपल्या अंतःकरणातच स्थान दिले होते. त्यांचे डोळ्यापुढे विठ्ठलाचे गोड गोजिरे रूप दिसत होते. कसे दिसत होते हे रूप तर डोक्यावर सोनेरी मुकुट परिधान केलेला, कानात मकरकुंडले घातलेली, कपाळी कस्तुरी मळवट भरलेला आहे, गळ्यात तुळशीमाळा घातलेल्या आहेत, कंठात कौस्तुभमणी झळकत आहे, कमरेला पितांबर नेसला आहे व त्याच्या तेजात सूर्यचंद्राच्या प्रभा लोपून गेल्या आहेत असे सावळे सुंदर विटेवर उभे राहिलेले रूप तुकाराम महाराजांना डोळ्यापुढे दिसत आहे व हे रूप (ध्यान) जसेच्या तसे डोळ्यांपुढे राहो असे त्यांना वाटत आहे. या विठ्ठलाच्या रूपावर आपले मन सक्त होवो (मन जडो) म्हणजेच विठ्ठलाच्या रूपावर आपले मन भाळले जावून विठ्ठलाबद्दल अधिकाधिक प्रेम वाढो असे त्यांना वाटत आहे. 

          तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवामध्ये त्या ध्यानाला कोंडून धरीन म्हणजेच पांडुरंगाला आपल्या जीवामध्ये म्हणजेच मनामध्ये साठवून ठेवीन. हृदयाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाला स्थान देईन. माझा संपूर्ण देह पांडुरंगाशी एकरूप होईल व मजमध्ये असणारा जो देहभाव म्हणजेच पांडुरंगाबद्दल असणारा भक्तिभाव, प्रेमभाव पांडुरंगाला वाहून त्याची पूजा करीन. 

ओवी : होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३।। तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥

अर्थ :  अशा प्रकारे ते ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाले, म्हणजे हि गोष्ट कळसाला आल्यासारखी होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोजिरवाण्या देवा, मला तुमच्या पाया पडू द्या. 

भावार्थ : तुकाराम महाराज पांडुरंगाची अंतःकरणापासून भक्ती करत होते. रात्रंदिवस त्याचे नामस्मरणात, भजन कीर्तनात तल्लीन होत होते. त्यांनी आपल्या मनामध्ये विठ्ठलाला साठवले होते. हृदयात स्थान दिले होते. त्यांच्या अंतःकरणात पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणालाही स्थान नव्हते. त्यांचे अंतःकरणातून पांडुरंगाचे ध्यान (रूप) निघू नये, ते कायमचे रहावे असे त्यांना वाटत होते म्हणूनच ते म्हणतात कि, पांडुरंगाचे ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाले म्हणजे हि गोष्ट कळसाला आल्यासारखी होईल. म्हणजेच पांडुरंगाची केलेली भक्ती, आराधना पूर्ण होईल. 

          तुकाराम महाराजांना पांडुरंगाचे गोजिरवाणे रूप डोळ्यासमोर दिसत आहे. या रूपावर ते भाळले आहेत. त्यांना पांडुरंगाबद्दल प्रेम वाटू लागले आहे. या प्रेमापोटीच त्यांना पांडुरंगाच्या पाया पडण्याचा मोह आवरता येईना. म्हणूनच ते पांडुरंगाला विनवणी करतात कि, हे गोजिरवाण्या देवा, मला तुमच्या पाया पडू द्या. 

 

                       हे पांडुरंगाचे विटेवरील ध्यान माझ्या डोळ्यांपुढे जसेचे तसे राहो

 

 

 

 

 

 

 

Saturday, February 24, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

 

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या र डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥
 
ओवी :
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या र डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥ 
 
अर्थ : हे माझे वाचे, तू विठोबाचे गोड नाव निरंतर घेत जा. अहो डोळे हो, तुम्ही विठोबाचे गोड मुख पहा आणि याचे सुख घ्या. 
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलभक्तीत रमू लागले होते. रात्रंदिवस ते विठ्ठलाची भक्ती करीत होते, त्याचे नामस्मरण घेत होते. विठ्ठलाच्या भजन-कीर्तनात तल्लीन होत होते. त्यांनी आपला संपूर्ण देहच विठ्ठलाला अर्पण केला होता. त्यांच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठयापर्यंत विठ्ठल खेळत होता. त्यांची सर्व इंद्रिये विठ्ठलाच्या अधीन झाली होती. त्यांच्या नसानसात विठ्ठल होता तर त्यांच्या हृदयात विठ्ठलाने वास केला होता. त्यांचे मुखात सतत विठ्ठलाचे नाव असायचे, तर डोळ्यांनी विठ्ठलाचे सावळे, सुंदर, मनोहरी रूप पहायचे. मुखात विठ्ठलाचे गोड नाम असल्याने व डोळ्यांनी मनोहरी रूप पाहिल्याने त्यांच्या मनाला सुख प्राप्त व्हायचे, समाधान वाटायचे. मनाला आनंद वाटायचा. म्हणूनच ते म्हणतात कि, '' हे माझे वाचे, तू विठोबाचे गोड नाव निरंतर घेत जा. अहो डोळे हो, तुम्ही विठोबाचे गोड मुख पहा आणि याचे सुख घ्या."

ओवी :
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥ 
 
अर्थ : अहो कान हो, तुम्ही विठोबाचे नेहमी गुणानुवाद ऐकत जा. हे मना तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठोबाचे पायापाशी सतत राहा. 
भावार्थ : तुकाराम महाराजांचे मुखातून सतत विठ्ठलाचे गोड नाम बाहेर पडायचे तसेच सतत भजन-कीर्तनात तल्लीन असायचे. हे सुस्वर त्यांचे कानात सतत घुमायचे. विठ्ठलाचे गुणानुवाद ऐकायचा त्यांना छंदच लागला होता. कुठेही गेले तरी त्यांचे कानावर विठ्ठलनामाचे शब्द पडायचे त्यामुळे त्यांचे मन समाधानी, आनंदीत व्हायचे तसेच त्यांचे मन सतत विठ्ठल भक्तीकडे धाव घ्यायचे. त्यांचे मनातच विठ्ठल असायचा त्यामुळे त्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलेली असायची. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो व त्याच्या चरणांपाशी बसतो असे सतत त्यांचे मनात यायचे. म्हणूनच ते म्हणतात कि, "अहो कान हो, तुम्ही विठोबाचे नेहमी गुणानुवाद ऐकत जा. हे मना तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठोबाचे पायापाशी सतत राहा."
 
ओवी : तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥
 
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवा, तू केशव देवाला टाकू नकोस. 
भावार्थ : तुकाराम महाराज आपल्या जीवाला सांगत आहेत कि, तू केशव देवाला म्हणजेच विठ्ठलाला टाकू नकोस. यातून त्यांना असे सांगायचे आहे कि, जो पर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत विठ्ठलाचे विस्मरण होऊ देऊ नको. त्याचे गोड नाम मुखात असू दे. त्याच्या भक्तीत खंड पडू देऊ नकोस. तुकाराम महाराज विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करत असत. त्यांची भक्ती अखंड चाललेली असे. विठ्ठल त्यांचा जीव कि प्राण होता. म्हणूनच ते म्हणतात कि, "माझ्या जीवा, तू केशव देवाला टाकू नकोस."












 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Saturday, January 20, 2024

 


 अवीट गोडीचे गाणे - रामजी की निकली सवारी

          'रामजी की निकली सवारी' हे  अवीट गोडीचे गाणे सरगम या चित्रपटातील आहे. हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिले असून मोहमद रफी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हे गीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले. हे गीत ऋषी कपूर यांचेवर चित्रित केलेले आहे. 

           आनंद बक्षी यांनी पहिल्या कडव्यात रामाचे किती सुंदर वर्णन केले आहे. डोक्यावर मुकुट सजवलेला आहे. चेहरा प्रसन्न असून त्यावर आनंद आहे. हातात धनुष्य असून गळ्यात पुष्पमाला आहे. असा हा सगळ्यांचा स्वामी असून आपण त्याचे दास म्हणजेच सेवक आहोत. असा हा विष्णूचा अवतार राम असून त्याच्यापुढे नतमस्तक होऊ या. 

             राम रावणाचा वध करून अयोध्येत परत आला आहे व त्याची मिरवणूक निघालेली आहे. सर्व स्त्री-पुरुषांना रामाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. त्याचे दर्शन व्हावे यासाठी सर्व अयोध्यावासी व्याकुळ झालेले आहेत. त्याचे एकदा दर्शन घेतले तरी मन भरणार नाही. परत परत (शंभरवेळा) दर्शन घेतले तरच मन भरणार आहे. म्हणूनच रथ हाकणाऱ्याला सांगितले कि तुझा रथ हळू हळू चालव म्हणजे सर्व अयोध्यावासीयांना रामाचे मन भरून दर्शन घेता येईल. 

           तिसऱ्या कडव्यात आनंद बक्षी यांनी थोडक्यात रामाची गोष्ट सांगितली आहे. रामाने चौदा वर्ष वनवास भोगून आपल्या आई-वडिलांचे वचन पाळले. रावणाने रामाला फसवून सीतेचे अपहरण केले. रामाने हनुमान व वानरांच्या मदतीने रावणाचा वध करून सीताला सोडवले व लंका जिंकली. राम विजयी होऊन अयोध्येत परत आला आहे व त्याची मिरवणूक निघालेली आहे.

         चौथ्या कडव्यात आनंद बक्षी यांनी रथात आरूढ झालेल्या रामचे वर्णन असे केले आहे, 'एका बाजूला लक्षुमण उभा आहे तर दुसऱ्या बाजूला सीता उभी आहे. मध्ये जगाचा पालनकर्ता असा राम उभा आहे. या तिघांची मिरवणूक अयोध्येतून निघालेली आहे.'  

          या गीतात आनंद बक्षी यांनी विजयी होऊन अयोध्येत परतलेल्या रामाचे सुंदर वर्णन केले आहे. मोहमद रफी यांनीही आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. म्हणूनच हे गीत परत परत ऐकावेसे वाटते. 

 सर पे मुकुट सजे मुख पे उजाला
मुख पे उजाला
हाथ धनुष गले में पुष्प माला
हम दास इनके यह सबके स्वामी
अंजान हम यह अंतरयामी
शीश झूकाओ राम गुण गाओ
बोलो जय विष्णु के अवतारी

रामजी की निकली सवारी,॥
रामजी की लीला है न्यारी ,

धीरे चला रथ ओ रथ वाले,
तोहे खबर क्या ओ भोले भाले,
एक बार देखे दिल ना भरेगा,
सौ बार देखो फिर जी करेगा ,
व्याकुल बड़े हैं काब्से खड़े हैं ,
दर्शन के प्यासे सब नर और नारी,
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला हैं न्यारी न्यारी ,

चौदह बरस का वनवास पाया,
माता पिता का वचन निभाया ,
धोखे से हर ली रावण ने सीता,
रावण को मारा लंका को जीता ,
तब तब यह आए तब तब यह आए ,
जब जब ये दुनिया इनको बुलाये,
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला है न्यारी

रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला है प्यारी
एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता
बीच में जगत के पालनहारी
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला हैं न्यारी, 
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला है न्यारी 

 


 


Sunday, January 14, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥


 तुकाराम महाराज गाथा - अभंग - डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥ 

डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२।।
मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥ 

ओवी : डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२।।

अर्थ : डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भुतें आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण आत्मानुभवाची खूण तेथे नसते. 

भावार्थ : बरेच लोक असे असतात कि, ते आपल्या डोक्यावर केसांच्या जटा वाढवतात. अंगावर भस्म लावतात, गळ्यात मोठमोठया माळा घालतात व स्वतःला संत म्हणवतात. खरे तर हे लोक ढोंगी, पाखंडी असतात. त्यांना देवाविषयी, भक्तीविषयी काही ज्ञान नसते. परंतु खोटे ज्ञान सांगून लोकांना फसवण्याचा धंदा करतात. ह्या लोकांच्यात स्वार्थभाव दडलेला असतो. यांचे मन कधीही शुद्ध नसते. मन विषयांनी भरलेले असते. वरवर हे लोक संतांचा आव आणत असले तरी यांचे मन संसारचक्रात, मोहमायेत अडकलेले असते. त्यामुळे यांची भक्ती देवापर्यंत पोचू शकत नाही. त्यांच्या भक्तीत तेवढी ताकत नसते. त्यांच्यात आत्मानुभवाची खूण नसते म्हणजेच देवाने यांना दर्शन दिले आहे किंवा संकटकाळी देवाने यांना मदत केली आहे तसेच या लोकांनी देवाच्या मदतीने संकटात सापडलेल्या लोकांना सोडवले आहे असा काही त्यांना अनुभव आला नाही कारण त्यांच्या आत्म्याची ओळख देवाला कळली नाही. 

          खरे संत आहेत त्यांना केसांच्या जटा वाढवून, अंगाला भस्म फासून, अंगात भूते आणून संत म्हणवून घेण्याची गरज नसते. हे संत ईश्वरकार्यानेच संतपदाला पोहोचतात. त्यांचा जन्मच ईश्वरकार्यासाठी झालेला असतो. ईश्वरच त्यांचे हातून सत्कर्म घडवून आणत असतो. हि संतमंडळीसुद्धा ईश्वराने सांगितलेले कार्य करत असतात. ईश्वरभक्ती करा, त्याचे नामःस्मरण घ्या, शुद्ध आचरण ठेवा, नितीचा मार्ग अवलंबा, सत्याच्या मार्गावरून चाला ह्या ईश्वराने सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हि संतमंडळी करत असतात. संतमंडळींनी संसार, घरदार, संपत्ती यांचा त्याग करून, मोहमयी जीवनापासून लांब जाऊन ईश्वरभक्तीत तल्लीन झालेले असतात. ईश्वरचिंतनात हरवून गेलेले असतात. अशावेळेस त्यांचा संपूर्ण देह ईश्वराशी एकरूप झालेला असतो. त्यांचे मन ईश्वराचे अधीन झालेले असते. त्यांना थोडावेळ का होईना ईश्वररूप प्राप्त होते. हा जो संतांना अनुभव येतो तो आत्मानुभव. हा आत्मानुभव ढोंगी संतांना येत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, "डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भुतें आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण आत्मानुभवाची खूण तेथे नसते."

ओवी : मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥ 

अर्थ : काही मूर्ख, पुरुष व बायका यांना जमवून कित्येक नाना प्रकारचे शकुन सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या मैंदाजवळ खरोखर गोविंद रहात नाही. 

भावार्थ  : काही लबाड ढोंगी लोक 'मला देवाची कृपा झाली आहे, त्याच्या आज्ञेनेच मी तुमचे भविष्य (शकुन) सांगतो.' असे पुरुष व बायका यांना जमवून सांगत असतात. पुरुष व बायकाही अंधपणाने या ढोंगी, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवतात. खरं तर हे लोक खोटेपणाने पुरुष व बायकांना आपल्या जाळ्यात ओढून फसवत असतात. मासेमारी करणारा पाण्यात गळ टाकून बसतो व खाण्याच्या आशेने मासे त्या गळाला फसतात. तसेच हे ढोंगी लोक खोटी भविष्यवाणी सांगण्याचा गळ टाकतात व स्त्री-पुरुष बरोबर याच्या गळाला फसतात. असे ढोंगी लबाड लोक आपले पोट भरण्यासाठी लोकांना फसवत असतात. त्यांचे मनात स्वार्थभाव दडलेला असतो. मनात लालसा उत्पन्न झालेली असते. या लालसेपोटीच त्यांनी शकुन (भविष्यवाणी) सांगण्याचा खोटा धंदा उघडलेला असतो. या ढोंगी लोकांचे मन कधीही शुद्ध नसते. देवाला आवडतो निस्वार्थ व शुद्ध भाव. तोच या ढोंगी-लबाड लोकांकडे नसतो म्हणूनच गोविंद (विठ्ठल) यांचेजवळ रहात नाही.










 

 

 

 

 

 

 

 

 










 

 

 

 

 

 

 

 

Friday, November 10, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - हाकेसरशी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥

 



 तुकाराम महाराज गाथा - अभंग - हाकेसरशी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥


हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

ओवी :  हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥

अर्थ : प्रल्हादाने नारायण नामाने हाक मारल्याबरोबर देव त्याजकरिता धाव घेवून खांब फोडून प्रगट झाले. अशी कृपावंत माझ्या विठाई माऊलीवाचून कोण आहे ?

भावार्थ : प्रल्हाद हा राजा हिरण्यकश्यपू याचा मुलगा होता. प्रल्हादाची भगवान विष्णूवर अतोनात भक्ती होती. तो सतत विष्णूच्या नामःस्मरणात तल्लीन असायचा त्याचे मुखातून 'नारायण-नारायण' हे शब्द बाहेर पडायचे. त्याची हि भक्ती हिरण्यकश्यपूला आवडायची नाही. प्रल्हादाची भक्ती तुटण्यासाठी हिरण्यकश्यपू त्याचा हर प्रकारे छळ करायचा. कधी त्याला चाबकाचे फटके द्यायचा, त्याच्यावर गरम तेल ओतायचा. अशी त्याला शिक्षा द्यायचा. हि शिक्षा होऊनही प्रल्हादाची भक्ती तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली. प्रल्हादाची वाढत चाललेली भक्ती बघून हिरण्यकश्यपूला आणखी राग यायला लागला. त्याने प्रल्हादाला विचारले, "तु एवढा नारायण-नारायण करतोस तर कुठे आहे तुझा नारायण?" प्रल्हाद म्हणाला, "नारायण चराचरात आहे, कणाकणात आहे, आकाशी आहे पाताळी आहे, सजीवात आहे निर्जीवात आहे, त्याने सर्व विश्व व्यापले आहे. तो सर्वेश्व, विश्वात्मा आहे." हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याने एका खांबाकडे बोट दाखवून प्रल्हादाला विचारले कि, "ह्या खांबात तुझा नारायण असेल तर दाखव मला." असे म्हणून हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली. प्रल्हादाने नारायणाचा धावा करायला सुरवात केली. त्याची हाक ऐकून नारायण नरसिंहाच्या रूपात खांब तोडून प्रकट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. 

          नारायणाने जसे नरसिहांचे रूप घेऊन प्रल्हादाला संकटातून सोडवले तसेच नारायण तसेच नारायण विठ्ठलाचे रूप घेऊन सर्व संतांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरला. त्याने सर्व संतांना संकटातून मुक्त केले. त्यांच्यावरील सर्व दुःखे स्वतः झेलली व त्यांना सुख प्राप्त करून दिले. अशी हि कृपावंत विठाई माउली म्हणजेच प्रल्हादाला संकटातून सोडवणारे नारायणाचे रूप आहे. 

ओवी :  करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

अर्थ : तिचा आठव केल्याबरोबर मोठ्या प्रेमाने धाव घेवून ती आठव करणारास मिठी घालते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते. 

भावार्थ : विठाई माऊली हि आपल्या भक्तांबाबत प्रेमळ आहे, कृपावंत आहे. आपल्या भक्ताने अंतःकरणापासून केलेली भक्ती विठाई माऊलीला आवडते. आई जसे आपल्या मुलावर माया करते, प्रेम करते तसेच विठ्ठल आपल्या भक्तांची आई बनून, माऊली बनून भक्तांना लेकरासमान मानून त्यांच्यावर प्रेम करते, माया लावते. विठ्ठलाचे व भक्ताचे नाते वात्सल्याचे आहे. भक्तसुद्धा विठ्ठलाला आपल्या माऊलीसमान मानतो. मुलगा कसा 'आई-आई' म्हणून आठवण काढतो व आईसुद्धा आपल्या मुलाकडे धाव घेते व मुलाला प्रेमाने मिठीत घेते तसेच विठाई माऊलीचा आठव केल्याबरोबर म्हणजेच विठ्ठलाचे नामःस्मरण केल्याबरोबर विठ्ठल धावत येतो व आपल्या भक्ताला प्रेमाने मिठी मारतो. 

          तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते. विठ्ठलाचे नाम हे गोड असून पवित्र, निर्मळ आहे. या नामात दडली आहे प्रसन्नता, सात्विकता. म्हणूनच जो हरीचे(विठ्ठलाचे) नाव घेईल त्याला जीवनात सुख, शांती प्राप्त होईल. जगातील परमोच्च आनंद प्राप्त होईल. मनुष्याने जर नित्यनियमाने हरीचे(विठ्ठलाचे) नामःस्मरण केले तर त्याला देवाजवळ जाता येते. विठ्ठलालाही आपले नामःस्मरण केलेले आवडते. जो कोणी भक्त नित्यनियमाने विठ्ठलाचे गुणगान गात असेल, त्याचे नामःस्मरण घेत असेल त्याच्यावर विठ्ठल प्रसन्न होतो व त्याला संसारचक्रातून सोडवतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो व मोक्षपदाला नेतो. विठ्ठल त्याला सायुज्यता मिळवून देतो.

 

 

 

 

 

 

 

 

 










 

 

 

 

 

 

 

 

 

Thursday, November 9, 2023

अवीट गोडीचे गाणे - मैने कहा फूलों से, हँसो तो वो खिल खिला के हंस दिए (चित्रपट - मिली)

 



अवीट गोडीचे गाणे -  मैने कहा फूलों से, हँसो तो वो खिल खिला के हंस दिए (चित्रपट - मिली)

         "मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए" हे अवीट गोडीचे गाणे मिली या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता एन सी सिप्पी व हृषीकेश मुखर्जी असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटातील गाणी योगेश यांनी लिहिली असून एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार यांनी गायली असून मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए हे एकमेव गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे. या चित्रपटात जया भादुरी, अमिताभ बच्चन, अशोक कुमार, अरुणा इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

            "मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए" हे अवीट गोडीचे गाणे जया भादुरी यांच्यावर चित्रित झाले असून लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. हे गीत कानाला फारच मोहक वाटते व परत परत ऐकावेसे वाटते.


मैने कहा फूलों से
हँसो तो वो खिल खिला के हंस दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई हँसने के लिए

हो मैने कहा फूलों से
हँसो तो वो खिल खिला के हंस दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई हँसने के लिए
हँसने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)

सूरज हसा तो बिखर बिखर गयी किरणें
सूरज हसा तो बिखर बिखर गयी किरणें
सूरज हंसा रे
किरण किरण चुन कर धरती ये
सज के सुनेहरी बन गयी रे
मैने कहा
ओ मैने कहा सपमों से
सजो तो वो मुस्कुरा के सज गये
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई सजने के लिए
सजने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)

ये शाम तो यूँ हँसी जैसे हँसी दुल्हन

ये शाम तो यूँ हँसी जैसे हँसी दुल्हन
ये शाम तो नीले नीले सांवले अंबर में
रंग जो गुलाबी लगे भरने
मैने कहा
ओ मैने कहा रंगों से
छलको तो वो जग ये सारा रंग गये
और ये कहा जीवन है

भाई मेरे भाई रंगने के लिए
रंगने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)

मौसम मिला वो कहीं एक दिन मुझको
मौसम मिला वो कहीं एक दिन मुझको
मौसम मिला रे
मैने कहा रूको खेलो मेरे संग तुम
मौसम भला रुका जो वो हो गया गुम
मैने कहा

ओ मैने कहा अपनों से चलो तो वो
साथ मेरे चल दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई चलने के लिए
चलने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)
 

 

 

Wednesday, November 8, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं । ताकाचे उपकार तरी करा ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं ।

नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥

ओवी : नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
         नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥

अर्थ :  अहो, तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या). तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा.

भावार्थ : काही लोक दानधर्म करण्याबाबत आपला हात आकडता घेतात. आपल्याकडे आहे त्यातील थोडे का होईना गरजुंना, गरिबांना, दीन-दुबळ्यांना द्यावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. या लोकांना जर दिले तर आपल्याकडे आहे ते संपेल असे या लोकांना वाटते. पण देणारा (देव) तर वर बसला आहे.   तो सढळ हाताने देत असतो. काही कमी पडू देत नाही. म्हणून आपण शक्यतो तितकी मदत गरजूना, अडलेल्याना करावी. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या)." तसेच तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा" म्हणजेच काही लोकांना द्यायची दानत नसते तसेच दुसऱ्यांना देण्याबाबत त्यांचा हात आकडता असतो अशा लोकांना उद्देशून  तुकाराम महाराज म्हणतात. खरे तर पाणी हे जीवन आहे. एकवेळ अन्नावाचून माणूस जगू शकेल परंतु पाणी मिळाले नाही तर माणूस तडफडून मरेल. माणूस पाण्याच्या शोधात लांब लांब भटकत असतो. जिथे पाण्याचा ठिपूस नसतो तिथल्या लोकांचे हाल होतात. एखाद्याला तहान लागली आणि त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासावीस होतो. म्हणूनच पाणी हे जीवन आहे व आपण दुसऱ्याला पाणी पाजतो म्हणजेच त्याला आपण जीवनच देत असतो. खरे तर आपल्या हातून सत्कर्म घडत असते. पुण्य प्राप्त होत असते. तहानलेल्या माणसाला पाण्याचा एक थेंब जरी मिळाला तरी त्याचा आत्मा शांत होतो. तो आपल्याला चांगला आशिर्वाद देतो. चांगला आशिर्वाद मिळणे हीच खरी फलप्राती होय. 

ओवी :  तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'

भावार्थ : तुकाराम महाराजांना हरीचे सगुणरूप बघण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचा जीव तळमळत आहे. तुकाराम महाराजांनी हरीची एवढी भक्ती केली कि त्यांना हरीच्या सगुणरूपाच्या दर्शनाची आस(ओढ) लागली आहे. कधी एकदा हरीचे सावळे, सुंदर, मनोहारी  रूप डोळ्यात साठवतो असे त्यांना झाले आहे. म्हणूनच ते संत-सज्जन लोकांना विनवणी(विनंती) करितात कि, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'







तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।



तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।

 

धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

ओवी :  धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
             सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥

अर्थ : परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो व आपले जे सेवक आहेत त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही. आपण मात्र आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करिते. 

भावार्थ : जे भक्त चिकाटीने परमार्थ करतात, त्यात खंड पडू देत नाहीत. परमार्थ करतात म्हणजेच मनात कुठलीच आशा, लोभ, मोह याचा विचार न करता निःस्वार्थ भावनेने सेवा करतात, सत्कर्म करतात, चांगली कार्ये करतात व हि कार्ये, सत्कर्म त्यांचे हातून नियमित घडत असतात. हि कार्ये, सत्कर्म साधू-संत, सज्जन ह्या लोकांकडून होत असतात. ह्या लोकांनाच नारायण साह्य होतो, ह्या लोकांच्या पाठीमागे उभा राहतो. त्यांना हवी ती मदत करतो. त्यांचा सर्व भार आपल्या शिरावर घेतो. त्यांना कुठलेही श्रम पडू देत नाही कि चिंता करू देत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि,"परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो व आपले जे सेवक(भक्त) आहेत त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही."

          परमार्थ केल्याने नारायण साह्य होतो व आपल्या भक्तांना कुठलेही श्रम पडू देत कि त्यांच्यावर कुठलेही संकट येऊ देत नाही. आलेल्या संकटाचे लगेच निवारण करतो. तो भक्तांची काळजी वाहतो.   म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि,"हरीचे आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करिते." म्हणजेच हरीचे आनंदाने कीर्तन केल्याने व त्याचे गुण गायल्याने हरी आपल्यावर प्रसन्न होतो व आपल्यावरील संकटाचे निवारण करतो. 

ओवी :  जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

अर्थ : लहान मुलाला काही दुखणेबाने आले असता त्याची आई आपला जीव देखील देण्यास तयार होते. हि प्राकृत आईची गोष्ट झाली आणि हा तर दाता प्राकृतासारखा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "हि माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट सांगितली. मात्र निःस्सीम भक्त बनले पाहिजे वरवर भक्ती केली असता काही उपयोग होत नाही."

भावार्थ : आई व मुलाचे नाते वात्सल्याचे आहे, प्रेमाचे आहे. आईला आपले मुलं काळजाचा तुकडा वाटतो. म्हणूनच आई आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. तिचा सर्व जीव आपल्या मुलावर असतो. म्हणूनच आपल्या मुलाला काही दुखले खुपले तर आई स्वतःचा जीव द्यायला मागेपुढे पाहत नाही. खरेतर जगातील कुठलीही आई आपल्या मुलासाठी जीव द्यायला तयार होते आणि हे स्वाभाविकच आहे. कारण आईच्या पोटातून मुलाचा जन्म होतो व आई आपल्या पोटच्या गोळ्याला कधीही दूर सारत नाही. 

         जसे आई व मुलाचे नाते असते तसेच हरीचे व भक्ताचे नाते मायेचे, प्रेमाचे, वात्सल्याचे असते. हरी आपल्या भक्तांवर अंतःकरणापासून प्रेम करतो. आपल्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. त्यांना कधीही अंतर देत नाही. भक्तांवर कुठलेही संकट येवू देत नाही व आलेच तर त्याचे लगेच निवारण करतो. थोडक्यात हरी आपल्या भक्तांची आई झालेला असतो. परंतु भक्ताची हरीवर नितांत श्रद्धा पाहिजे, त्याची निःस्सीम भक्ती पाहिजे. अंतःकरणापासून  केलेली भक्ती हरीपर्यंत पोहोचते. वरवर केलेली (भक्तीचा दिखावूपणा केलेली) व स्वार्थापोटी केलेली भक्ती हरीपर्यंत पोहचत नाही. हरी हा भक्तीचा भुकेला आहे व जो भक्त निःस्सीम भक्ती करतो तोच हरीला आवडतो. हरी त्याला आपल्या हृदयात स्थान देतो. 

         तुकाराम महाराज अंतःकरणापासून हरीची (विठ्ठलाची) भक्ती करायचे, त्याचे नामःस्मरण घ्यायचे. विठ्ठलनामात तल्लीन व्हायचे. हीच भक्ती हरीला आवडायची. म्हणूनच हरी तुकाराम महाराजांवरील संकटाचे निवारण करायचा. त्यांना कुठलेही श्रम पडू देत नव्हता कि कुठलीही चिंता करू देत नव्हता. सतत परमार्थ करत राहिल्याने नारायण त्यांना साह्य होता व हाच त्यांना आलेला अनुभव त्यांनी या अभंगात सांगितला आहे.


 

 

 

 

 

 

 

 

 

Saturday, October 28, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - दूध दही ताक पशूचे पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥


 तुकाराम महाराज गाथा - अभंग - दूध दही ताक पशूचे पाळण ।

दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हेचि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोह कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरी हें धन हातीं लागे ॥३॥

अर्थ - 'दूध दही ताक ह्यांच्या प्राप्तीकरिता गाई म्हशींचे रक्षण करितात, परंतु ह्या सगळ्याचे सार तूप आहे. आम्हा भाविक भक्तांच्या हातामध्ये तुपासारखे सारभूत असणारे वर्म राम हे आहे, म्हणून आम्ही त्याला चित्तात धरिला आहे.'

भावार्थ - गायी म्हशींपासून दूध मिळते. दुधापासून दही ताक तयार होते. दह्यापासून लोणी व लोण्यापासून तूप मिळते. म्हणजेच तूप मिळवण्यासाठी गाई-म्हशींचे रक्षण करणे आलेच. ह्या सर्व गोष्टींचे सार तूप आहे. भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टी केल्याने रामाची प्राप्ती होते. म्हणजेच ह्या सर्व गोष्टींचे सार राम आहे. रामाच्या प्राप्तीकरिता भक्त वरील गोष्टी करीत असल्याने त्यांना रामाची प्राप्ती होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, 'आम्हा भाविक भक्तांच्या हातामध्ये तुपासारखे सारभूत वर्म राम हे आहे. म्हणून आम्ही त्याला चित्तात धरिला आहे.'

अर्थ - 'लोखंड गारगोटी कापूस हि अग्नीच्या सिद्धीकरिता संग्रहास ठेवावी लागतात. नाही तर ह्यांचे ओझे कोण बाळगीत बसले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भूमिगत धन हस्तगत होईपर्यंत खोरे टिकाव पहार ह्यांचे रक्षण करावे लागते.'

भावार्थ -  लोखंड गारगोटी कापूस हे ओझे जरी वाटत असले तरी वेळप्रसंगी अग्नी पेटवण्याकरीता (सिद्धीकरिता) त्याचा उपयोग होतो. तसेच भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टी कष्टपद वाटल्यातरी राम प्राप्तीसाठी ह्याचा उपयोग होतो. अग्नी पेटवायचा नसेल तर किंवा अग्नीची सिद्धी नको असेल तर लोखंड गारगोटी कापूस ह्या गोष्टींचे ओझे वाटू लागते. तसेच रामाची प्राप्ती नको असेल तर भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टी कष्टप्रद, निर्रथक वाटू लागतात. 

          भूमिगत धन (जमिनीत असलेले धन) मिळवण्यासाठी जमीन खोदावी लागते यासाठी  खोरे टिकाव पहार ह्या गोष्टी लागतात. जोपर्यंत भूमिगत धन हस्तगत होत नाही (मिळत नाही) तोपर्यंत खोरे टिकाव पहार ह्यांचे रक्षण करावे लागते. तसेच रामाच्या प्राप्तीसाठी (रामाला मिळवण्यासाठी) भक्ती, नामःस्मरण, चिंतन, मनन, ध्यान-धारणा ह्या गोष्टींची आवश्यकता असते. जोपर्यंत रामाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कराव्या लागतात. या गोष्टींची आवश्यकता असते.










Saturday, September 9, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।


तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।

नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
   तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥
         तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

 ओवी : नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥

अर्थ : संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या आणि आईबाप असणाऱ्या विष्णूदेवा तू अपार आणि अनंत आहेस. तुला माझे नमन आहे. मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी. 

भावार्थ : विष्णुदेव हा संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. सजीव-निर्जीव, मनुष्य-प्राणी, झाडे-झुडपे, वेली, किडा-मुंगी, पक्षी, दगड-माती तसेच कणाकणात, चराचरात त्याचा वास आहे. सृष्टीचा निर्माता असल्याने सारी सृष्टीच त्याने व्यापलेली आहे. त्यामुळे विष्णुदेव हा अपार आणि अनंत आहे. तसेच विष्णुदेव आपल्या सर्व भक्तांची काळजी वाहणारा आहे. त्याच्या मनात आपल्या भक्तांबद्दल प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य ओसंडून वाहत आहे म्हणूनच तो आपल्या भक्तांचा आईबाप झालेला आहे. अशा विष्णुदेवाला तुकाराम महाराज नमन (नमस्कार) करतात व म्हणतात कि, "मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी."

ओवी : तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥

अर्थ : देवा, तुमची स्तुती करण्यात वेद देखील थकला म्हणून 'नेती,नेती' असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, पुष्कळ कविलोक आणि सिध्दपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत.  

भावार्थ : विष्णूचे कितीही गुणवर्णन केले तरी संपत नाहीत. त्याची कीर्ती अगाध आहे. ती वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. ऋषी, मुनींनी ग्रंथातून, पुराणांतून, शास्त्र-उपनिषदातून, श्लोकातून, पोथींमधून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे. सिद्धपुरुषांनी, संत-महंतांनी कीर्तनातून, प्रवचनातून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे तसेच विष्णूची महती व कीर्ती गायली आहे. वेदांमधूनही विष्णूची स्तुती केलेली आहे तरी ती अपुरीच आहे. 

         विष्णूची कितीही स्तुती केली, त्याचे गुणवर्णन गायले तरी ते अपुरेच आहे. कारण विष्णू हा असा भगवंत आहे तो संकट काळाला धावून येणारा आहे. विविध रूपात येऊन आपल्या भक्तांचे संरक्षण करणारा आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास झाला व अधर्माची वाढ झाली, पापकर्मे वाढू लागली, चांगल्या गोष्टींचा व कर्मांचा नाश होऊन वाईट कर्मे वाढू लागली तेव्हा विष्णूने दशावतार (१. मत्स्य, २. कूर्म, ३. वराह, ४. नरसिंह, ५. वामन, ६. परशुराम, ७. राम, ८. कृष्ण, ९. गौतम बुद्ध, १०. कल्की) धारण करून अधर्माचा व पापकर्माचा नाश केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरसिंह अवतार. या अवतारात येऊन हिरण्यकश्यपू  सारख्या पापी माणसाचा वध केला. राम अवतारात येऊन अहंकारी रावणाचा वध केला. तर कृष्ण अवतारात येऊन पापी कंसाचा व असुरांचा वध केला तर अधर्माने वागणाऱ्या दुर्योधनाचा व त्याच्या साथीदारांचा पांडवांकरवी वध केला. म्हणजेच साधू-संत, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी व धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी विष्णूने दहा अवतार धारण केले. म्हणूनच विष्णूचे कितीही गुणगान गायले त्याची किर्ती, महती वर्णन केली तरी कमी पडत आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "देवा, तुमची स्तुती करण्यास वेद देखील थकला म्हणून 'नेति नेति' (या संस्कृत वचनाचा अर्थ 'हेही नाही, तेही नाही' असा होतो) असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत"

ओवी : तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे.

भावार्थ : तुकाराम महाराज म्हणतात, "जिथे विष्णूची स्तुती करण्यास वेद थकला, ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष कितीही विष्णूचे गुण वर्णन करीत असले तरी त्यांचे शब्द अपुरे पडत आहेत तिथे तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे? म्हणजेच तुमची किर्ती वर्णन करण्याइतकी व तुमची महती गाण्याइतके शब्द माझ्याकडे नाहीत."



 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...