Saturday, September 9, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।


तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।

नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
   तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥
         तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

 ओवी : नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥

अर्थ : संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या आणि आईबाप असणाऱ्या विष्णूदेवा तू अपार आणि अनंत आहेस. तुला माझे नमन आहे. मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी. 

भावार्थ : विष्णुदेव हा संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. सजीव-निर्जीव, मनुष्य-प्राणी, झाडे-झुडपे, वेली, किडा-मुंगी, पक्षी, दगड-माती तसेच कणाकणात, चराचरात त्याचा वास आहे. सृष्टीचा निर्माता असल्याने सारी सृष्टीच त्याने व्यापलेली आहे. त्यामुळे विष्णुदेव हा अपार आणि अनंत आहे. तसेच विष्णुदेव आपल्या सर्व भक्तांची काळजी वाहणारा आहे. त्याच्या मनात आपल्या भक्तांबद्दल प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य ओसंडून वाहत आहे म्हणूनच तो आपल्या भक्तांचा आईबाप झालेला आहे. अशा विष्णुदेवाला तुकाराम महाराज नमन (नमस्कार) करतात व म्हणतात कि, "मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी."

ओवी : तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥

अर्थ : देवा, तुमची स्तुती करण्यात वेद देखील थकला म्हणून 'नेती,नेती' असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, पुष्कळ कविलोक आणि सिध्दपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत.  

भावार्थ : विष्णूचे कितीही गुणवर्णन केले तरी संपत नाहीत. त्याची कीर्ती अगाध आहे. ती वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. ऋषी, मुनींनी ग्रंथातून, पुराणांतून, शास्त्र-उपनिषदातून, श्लोकातून, पोथींमधून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे. सिद्धपुरुषांनी, संत-महंतांनी कीर्तनातून, प्रवचनातून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे तसेच विष्णूची महती व कीर्ती गायली आहे. वेदांमधूनही विष्णूची स्तुती केलेली आहे तरी ती अपुरीच आहे. 

         विष्णूची कितीही स्तुती केली, त्याचे गुणवर्णन गायले तरी ते अपुरेच आहे. कारण विष्णू हा असा भगवंत आहे तो संकट काळाला धावून येणारा आहे. विविध रूपात येऊन आपल्या भक्तांचे संरक्षण करणारा आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास झाला व अधर्माची वाढ झाली, पापकर्मे वाढू लागली, चांगल्या गोष्टींचा व कर्मांचा नाश होऊन वाईट कर्मे वाढू लागली तेव्हा विष्णूने दशावतार (१. मत्स्य, २. कूर्म, ३. वराह, ४. नरसिंह, ५. वामन, ६. परशुराम, ७. राम, ८. कृष्ण, ९. गौतम बुद्ध, १०. कल्की) धारण करून अधर्माचा व पापकर्माचा नाश केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरसिंह अवतार. या अवतारात येऊन हिरण्यकश्यपू  सारख्या पापी माणसाचा वध केला. राम अवतारात येऊन अहंकारी रावणाचा वध केला. तर कृष्ण अवतारात येऊन पापी कंसाचा व असुरांचा वध केला तर अधर्माने वागणाऱ्या दुर्योधनाचा व त्याच्या साथीदारांचा पांडवांकरवी वध केला. म्हणजेच साधू-संत, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी व धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी विष्णूने दहा अवतार धारण केले. म्हणूनच विष्णूचे कितीही गुणगान गायले त्याची किर्ती, महती वर्णन केली तरी कमी पडत आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "देवा, तुमची स्तुती करण्यास वेद देखील थकला म्हणून 'नेति नेति' (या संस्कृत वचनाचा अर्थ 'हेही नाही, तेही नाही' असा होतो) असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत"

ओवी : तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे.

भावार्थ : तुकाराम महाराज म्हणतात, "जिथे विष्णूची स्तुती करण्यास वेद थकला, ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष कितीही विष्णूचे गुण वर्णन करीत असले तरी त्यांचे शब्द अपुरे पडत आहेत तिथे तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे? म्हणजेच तुमची किर्ती वर्णन करण्याइतकी व तुमची महती गाण्याइतके शब्द माझ्याकडे नाहीत." 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक ...