Saturday, September 9, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।


तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।

नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
   तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥
         तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

 ओवी : नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥

अर्थ : संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या आणि आईबाप असणाऱ्या विष्णूदेवा तू अपार आणि अनंत आहेस. तुला माझे नमन आहे. मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी. 

भावार्थ : विष्णुदेव हा संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. सजीव-निर्जीव, मनुष्य-प्राणी, झाडे-झुडपे, वेली, किडा-मुंगी, पक्षी, दगड-माती तसेच कणाकणात, चराचरात त्याचा वास आहे. सृष्टीचा निर्माता असल्याने सारी सृष्टीच त्याने व्यापलेली आहे. त्यामुळे विष्णुदेव हा अपार आणि अनंत आहे. तसेच विष्णुदेव आपल्या सर्व भक्तांची काळजी वाहणारा आहे. त्याच्या मनात आपल्या भक्तांबद्दल प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य ओसंडून वाहत आहे म्हणूनच तो आपल्या भक्तांचा आईबाप झालेला आहे. अशा विष्णुदेवाला तुकाराम महाराज नमन (नमस्कार) करतात व म्हणतात कि, "मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी."

ओवी : तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥

अर्थ : देवा, तुमची स्तुती करण्यात वेद देखील थकला म्हणून 'नेती,नेती' असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, पुष्कळ कविलोक आणि सिध्दपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत.  

भावार्थ : विष्णूचे कितीही गुणवर्णन केले तरी संपत नाहीत. त्याची कीर्ती अगाध आहे. ती वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. ऋषी, मुनींनी ग्रंथातून, पुराणांतून, शास्त्र-उपनिषदातून, श्लोकातून, पोथींमधून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे. सिद्धपुरुषांनी, संत-महंतांनी कीर्तनातून, प्रवचनातून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे तसेच विष्णूची महती व कीर्ती गायली आहे. वेदांमधूनही विष्णूची स्तुती केलेली आहे तरी ती अपुरीच आहे. 

         विष्णूची कितीही स्तुती केली, त्याचे गुणवर्णन गायले तरी ते अपुरेच आहे. कारण विष्णू हा असा भगवंत आहे तो संकट काळाला धावून येणारा आहे. विविध रूपात येऊन आपल्या भक्तांचे संरक्षण करणारा आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास झाला व अधर्माची वाढ झाली, पापकर्मे वाढू लागली, चांगल्या गोष्टींचा व कर्मांचा नाश होऊन वाईट कर्मे वाढू लागली तेव्हा विष्णूने दशावतार (१. मत्स्य, २. कूर्म, ३. वराह, ४. नरसिंह, ५. वामन, ६. परशुराम, ७. राम, ८. कृष्ण, ९. गौतम बुद्ध, १०. कल्की) धारण करून अधर्माचा व पापकर्माचा नाश केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरसिंह अवतार. या अवतारात येऊन हिरण्यकश्यपू  सारख्या पापी माणसाचा वध केला. राम अवतारात येऊन अहंकारी रावणाचा वध केला. तर कृष्ण अवतारात येऊन पापी कंसाचा व असुरांचा वध केला तर अधर्माने वागणाऱ्या दुर्योधनाचा व त्याच्या साथीदारांचा पांडवांकरवी वध केला. म्हणजेच साधू-संत, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी व धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी विष्णूने दहा अवतार धारण केले. म्हणूनच विष्णूचे कितीही गुणगान गायले त्याची किर्ती, महती वर्णन केली तरी कमी पडत आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "देवा, तुमची स्तुती करण्यास वेद देखील थकला म्हणून 'नेति नेति' (या संस्कृत वचनाचा अर्थ 'हेही नाही, तेही नाही' असा होतो) असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत"

ओवी : तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे.

भावार्थ : तुकाराम महाराज म्हणतात, "जिथे विष्णूची स्तुती करण्यास वेद थकला, ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष कितीही विष्णूचे गुण वर्णन करीत असले तरी त्यांचे शब्द अपुरे पडत आहेत तिथे तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे? म्हणजेच तुमची किर्ती वर्णन करण्याइतकी व तुमची महती गाण्याइतके शब्द माझ्याकडे नाहीत." 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, September 8, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥

  वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ।।१।।
       करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ।।२।।
दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ।।३।।
तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळ ।।४।। 

ओवी : वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ।।१।। करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ।।२।।

अर्थ : विठ्ठलाचे सेवक हे मोठे शूर आहेत, म्हणून काळ त्यांच्या पाया पडतो. ते निरंतर विठ्ठलनामाच्या जयजयकाराचा घोष करितात, त्या योगाने मोठमोठे पापांचे डोंगरही जळून जातात. 

भावार्थ : विठ्ठलाचे सेवक (भक्त) सतत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असतात. भजन-कीर्तनात दंग असतात. त्यांचे मुखातून 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग-पांडुरंग' असा विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. विठ्ठलावर त्यांची अपार श्रद्धा असते. त्यांनी विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थान दिलेले असते. तसेच ते विठ्ठलाशी एकरूप झालेले असतात. विठ्ठलही आपल्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. त्यांच्या अडीअडचणीला धावून येतो. भक्तांवर आलेली संकटे स्वतः झेलतो तसेच संकटांचे निवारण करतो. म्हणूनच विठ्ठलाचे भक्त हे निर्धास्त असतात. विठ्ठल पाठीराखा असल्याने विठ्ठलभक्त कुणालाही घाबरत नाहीत अगदी काळालासुद्धा. विठ्ठलामुळे काळच त्यांच्याजवळ यायला घाबरतो तसेच त्यांच्या पाया पडतो. विठ्ठलनामात फार मोठी ताकत आहे. सतत विठ्ठलाचे नाम घेतल्याने (जयजयकाराचा घोष केल्याने) मन पवित्र, निर्मळ होते. मनात असलेले वाईट विचार निघून जातात. हातून घडलेल्या पापांचे क्षालन होते. म्हणूनच विठ्ठलभक्त सतत विठ्ठलनामाच्या जयजयकाराचा घोष करतात त्यायोगाने त्यांचे हातून घडलेल्या पापांचे क्षालन होते.(पापांचे डोंगर जळून जातात.) 

ओवी : दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ।।३।। तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ।।४।।

अर्थ : त्या वीरांच्या हातामध्ये दया क्षमा शांति हे न तुटणारे बाण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या भूमंडळामध्ये तेच एक बलाढय आहेत. 

भावार्थ : विठ्ठलाचे भक्त हे मनाने प्रेमळ असतात. ते सहसा कुणावर क्रोधीत होत नाहीत. त्यांच्याविषयी कुणी अपशब्द वापरले अथवा त्यांची निंदानालस्ती केली तरी ते करणाऱ्यावर चिडत नाहीत. शांतचित्ताने सर्व ऐकून घेतात व करणाऱ्याला चार चांगल्या उपदेशपर गोष्टी सांगतात. त्यांच्या प्रेमळ व शांत स्वभावामुळे ते रंजल्या-गांजलेल्याना, दीन-दुबळ्या, गरीबांना आपलेसे करतात. त्यांना पाहिजे ती मदत करतात. अशा लोकांवर ते प्रेम करतात. जर एखादा वाईट मार्गाने जात असेल, वाईट विचाराने वागत असेल तर अशा माणसाला विठ्ठलभक्त क्षमा करतात व त्याला दुष्कृत्य करण्यापासून रोखतात तसेच चांगल्या मार्गावरून चालण्यास व विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करतात. दया क्षमा शांति या त्रिसूत्रीनुसार त्यांचे आचार विचार असतात. 'दया क्षमा शांति, तेथे देवाची वस्ती' या उक्तीनुसार त्यांचेजवळ देवाची वस्ती आहे. त्यामुळे संकटे, अडचणी, दुःख त्यांचेपासून लांब राहतात. देवच त्यांचा पाठीराखा असल्याने ते बलाढय आहेत. ते कुणाला घाबरत नाहीत. म्हणूनचं तुकाराम महाराज म्हणतात कि, "त्या वीरांच्या (विठ्ठल भक्तांच्या) हातामध्ये दया क्षमा शांति हे न तुटणारे बाण आहेत म्हणूनच ते ह्या भूमंडळामध्ये (पृथ्वीमध्ये) बलाढय आहेत."

 

 

 

 

 

 

 

   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Friday, July 28, 2023

अवीट गोडीचे गाणे - पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥

                 

 अवीट गोडीचे गाणे

 पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥

           "पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥" हि रचना संत ज्ञानेश्वर माउली यांनी केली आहे व लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहे. ह्या रचनेला संगीत दिले आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. 

 पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

            कावळा हा शब्द उच्चारायला जरा कठीण/ जड वाटतो की काय म्हणून "काऊ" हा शब्द माऊलींनी असा काही वापरलाय की तिथेच आपल्या मनात एक दाद दिली जाते - की कसा मऊसूत शब्द आहे हा.. - काऊ - विशेषतः अगदी लहान मुलांना कावळा दाखवताना "काऊ" हाच शब्द घरोघरी वापरला जातो तोच माऊलींनी नेमका उचललाय - कारण त्या शब्दामागे एक जिव्हाळा आहे - एक आपुलकी आहे - मनात एक सहज उमटणारे नाते आहे - हा कावळा आता एक साधा पक्षी राहिलेला नसून एक निरोप्या, एक सहचर झालाय - काऊ या शब्दाने तो नेमका प्रगट होतोय. आणखी एक म्हणजे - कावळा हा तसा कर्कश्श ओरडणारा म्हणून प्रसिद्ध -त्याची काव, काव बर्‍याच वेळेला नकोशी होते पण इथे ती काव, काव कर्कश नसून हवीहवीशी झालीये म्हणून त्या ओरडण्यालाही कोकताहे असा मवाळ शब्द माऊलींनी योजलाय..
एवढे या काऊविषयी माऊली आज जिव्हाळा का दाखवतात बरे ?? तर कारण सहाजिकच तेवढे मोलाचे आहे इथे - हे पाहुणे साधे-सुधे नसून प्रत्यक्ष पंढरीराय आहेत काय म्हणून माऊलींना तो कावळा -त्याचे ते ओरडणे हे सगळे हवेहवेसे होत आहे - त्यांचे जणू प्राण त्या वाट पहाण्यात अडकलेत इतक्या उत्कंठेने ही विराणी प्रकटलीये..

            माऊलींना भगवंताखेरीज कुठलीच गोष्ट मोलाची वाटत नसल्याने त्यांना साधा कावळा ओरडला तरी तो शकुन वाटतोय - न जाणो हा संकेत ते पंढरीराय येण्याचा तर आहे का ?? ही अनावर उत्कंठा कशी ओसंडतीये या सगळ्या विराणीतून .... या कावळ्याचे ओरडणे हाच मोठा शकुन आणि मग त्या कावळ्याचे कोडकौतुक तर किती करु नि किती नको असे माऊलींना झालंय पार .....

            तुझे सोन्यानें मढवीन पाऊ - अरे, एवढी मोठी शकुनाची गोष्ट जर घडणार असेल तर तुझे पंखसुद्धा मी सोन्याने मढवून देईन बघ ...तुला दहीभात आवडतो ना त्याचीच उंडी तुला भरवीन बघ .... पण - जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ... या माझ्या जीवाला ज्याची अत्यंत आवड आहे त्याची काही खबरबात सांग तर जरा - मला त्यातच गोडी आहे रे - अगदी पटकन सांग बरं.... जराही वेळ लावू नकोस बघ ...

            आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे - अरे तू तर आंब्याची रसाळ फळे खाणारा आहेस त्या रसाळ फळांनी तुझी वाणीही रसाळ झालीये तेव्हा सांग ना रे हाच शकुन (पंढरीनाथ आगमनाचा) आहे ना तो ?


 

Saturday, June 10, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।।

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।।

 

 बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।। १ ।।

     जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ।। २ ।।

जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ।। ३ ।।

तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ।। ४ ।।

ओवी : बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।। १ ।। जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ।। २ ।।

अर्थ : जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये. अहो गोविंदा, तुम्हाला विसरून ज्याचेकडून संतांची निंदा झाली आहे. 

भावार्थ : तुकाराम महाराजांनी या अभंगात असे म्हणले आहे कि, जो कोणी गोविंदाला (पांडुरंगाला) विसरून, त्याची भक्ती करायची सोडून वाईट मार्गाने जात आहेत. तसेच संतांबद्दल अपशब्द बोलून त्यांची निंदा करत आहेत. त्यांची वचने, चांगले विचार ऐकत नाहीत तसेच त्यांना संतांचा सहवास आवडत नाही अशा दुर्जन माणसांशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये कारण दुर्जन माणसांच्या सहवासात आल्यावर व त्यांच्याशी बोलल्यावर ते जसे संतांची निंदा करतात व त्यांचे तोंडातून संतांबद्दल अपशब्द बाहेर पडतात तसेच आपल्याही तोंडातून संतांबद्दल अपशब्द बाहेर पडतील व त्यांची निंदा केली जाईल म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, 'जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये.'  

ओवी : जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ।। ३ ।। तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ।। ४ ।।

अर्थ : त्याचे तोंडाला आग लागो. असला तो भांडखोर माझे दृष्टीपुढेसुद्धा नको. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, असल्या दुर्जनापासून मला दूर ठेवा.  

भावार्थ : जे संतांची निंदा करतात, सतत भांडतात तसेच त्यांच्या तोंडातून अपशब्द म्हणजेच शिव्याशाप बाहेर पडतात अशा लोकांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात कि, 'त्याचे तोंडाला आग लागो. अशा लोकांचे तोंडसुद्धा मला पाहण्याची इच्छा नाही. असला तो भांडखोर माझे दृष्टीपुढेसुद्धा नको.' तुकाराम महाराज देवाला विनवणी करताना म्हणतात कि, जे संतांची निंदा करतात व तुझे नामस्मरण घेत नाहीत व तुझी भक्ती करत नाहीत अशा माणसांपासून मला दूर ठेवा. त्यांचा सहवास मला नको कारण त्यांचे सहवासाने मी तुमची भक्ती करायची विसरून व संतांची वचने, चांगले विचार ऐकायचे सोडून त्यांचेप्रमाणेच संतांची निंदा नालस्ती करीन व सतत भांडत राहीन.

 

 

 

 

 

 

 

 

कविता - पंढरीची वारी

 

कविता - पंढरीची वारी 

 

पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी,

आणि म्हणाला, 'आवर लवकर बयो, निघालेत वारकरी, ।

मी म्हणाले, 'निघते हं विठू, घरचं एकदा बघते,

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते ।

लगबग माझी सुरु झाली,

नवऱ्याचे कपडे बघू कि 

मुलांसाठी खाऊ करू,

एवढया कमी अवधीत 

सगळं कसं आवरू ।

शेवटी एकदाची तयार झाले,

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

काळजातली गलबल लपवु पाहत होते,

डोळ्यांमधले अश्रू थोपवू पाहत होते ।

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी,

मीच मला समजावत होते परोपरी ।

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असू दे, बघु पुढे केव्हांतरी ।

माझा एक पाय आत, एक पाय बाहेर,

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना, 

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना ।

मी म्हणाले, 'सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं,

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।

उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी,

तूच आता काहीतरी दे बाबा हमी ।

कुणी म्हणत ममत्व सोड,

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे,

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे ।

एकच भीती वाटते विठु, 

प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक 

तुटून जाईल ही श्वासाची दोरी,

आणि कधीच घडणार नाही रे 

तुझ्या पंढरपूरची वारी ।

माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले, 

त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले ।

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, 

'संसार सोडू नकोस एक फक्त कर,

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव,

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।

इंद्रियांना  करू देत त्यांचं काम,

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही, 

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही ।

तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी,

त्याचीच असुदे तुझ्यावर सत्ता, मग बघ 

मन, बुद्धी, चित्त, अहंकार 

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता । 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल,

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।

अहंकार गेला कि ममत्वही सुटेल,

रज-तमाच कवाड एक एक करून मिटेल ।

हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश,

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।

निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल,

आणि विश्वास ठेव पोरी,

पैलतीरावर हात देण्यासाठी,

चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी,

चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, May 16, 2023

अवीट गोडीचे गाणे -- भरजरी ग पितांबर दिला फाडुन

 

वनमालाबाई(शामची आई) व माधव वझे(शाम)

 अवीट गोडीचे गाणे -- भरजरी ग पितांबर दिला फाडुन

            'भरजरी गं पितांबर दिला फाडुन' हे अवीट गोडीचे गाणे शामची आई या चित्रपटातील आहे. साने गुरुजींच्या शामची आई या कादंबरीवर आचार्य अत्रेंनी सिनेमा काढला होता. त्या सिनेमात माधव वझेंनी शामची तर वनमाला बाईंनी आईची भूमिका केली होती. या गाण्याला संगीत दिलंय, वसंत देसाई यांनी तर याचे बोल लिहीलेत, प्रत्यक्ष प्रल्हाद केशव अत्रेंनी. हे गाणं आपल्या सुमधूर आवाजाने सजवलंय, आशा भोसले यांनी. या सिनेमातली सगळीच गाणी सुंदर आहेत. सुवर्णपदक मिळवणारा हा पहिला सिनेमा होता. पहिल्या मराठी चित्रपटाला सुवर्ण पदक मिळाले. आशाताईंचा आवाज म्हणजे प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा असा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. अगदी आज जरी ही गाणी ऐकली तरी लगेच डोळ्यांतून आपोआप पाणी येतं. 

          हे गीत म्हणजे भाऊ बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमाचा अविष्कार आहे. पहिल्या कडव्यात अत्रे म्हणतात कि, श्रीहरीचे बोट कापले असूनसुद्धा सुभद्रा पाठची बहीण असूनही चिंधी फाडून देत नाही. तिला श्रीहरीच्या बोटापेक्षा शालू नि पैठणी महत्वाची वाटते. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, पाठची बहीण झाली वैरीण. 

         दुसऱ्या कडव्यात अत्रेंनी द्रौपदीचे श्रीहरीवरील असलेल्या प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे. द्रौपदी म्हणते, हरीची मी कोण आहे तरी हरीने म्हणजेच श्रीकृष्णाने मला बहीण मानली आहे. या भावाने मला वसने म्हणजेच वस्त्रे देऊन माझी लाज राखली आहे. तोच हरी आज चिंधीसाठी माझ्याकडे आला आहे. त्याचे माझ्यावर एवढे ऋण आहे कि माझ्या काळजाची चिंधी करून हरीला देईन. द्रौपदीने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपला भरजरी पितांबर फाडला व चिंधी म्हणून हरीला दिला. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. 

          खरोखरच द्रौपदीचे हरीवर मनापासून व निःस्वार्थ प्रेम आहे. म्हणूनच तिने आपला भरजरी पीतांबर फाडून दिला. भक्ती, प्रेम असावे तर द्रौपदी सारखे. तिला भरजरी पीतांबरपेक्षा हरीवरील भक्ती, प्रेम मोलाचे वाटले. जे रक्ताच्या नात्याला अंतरीचे प्रेम कळले नाही ते मानलेल्या नात्याला कळले. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, 'रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटलि पाहिजे अंतरीची खुण' द्रौपदीची निःस्वार्थ (लाभाविण) भक्ती, प्रेम बघून हरी प्रसन्न झाले.

          प्रल्हाद केशव आत्रे यांनी जितके भावपूर्ण व अर्थपूर्ण हे गीत लिहिले आहे  तितक्याच उत्कटपणे व सुरेल आवाजात आशा भोसले यांनी हे गीत गायले आहे. अजूनही या गाण्याचे स्वर कानावर पडले कि, मन प्रसन्न, आनंदी होतं.

भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी?”
पाठची बहीण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न

 


 

Sunday, May 14, 2023

अभिमान


 
अभिमान 

          हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता सुशीला कामत व पवन कुमार जैन असून हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. मोहमद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली आहेत. अमिताभ बच्चन, जया भादुरी, असरानी, बिंदू यांच्या मुख्य भुमिका आहेत. 

           हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या उत्कृष्ठ चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात जया बच्चन यांचा एकमेव आवाज लता मंगेशकर होता, तर अमिताभ बच्चन यांना तीन गायकांनी आवाज दिला होता.

           मनहर उधासने "लुटे कोई मन का नगर"  या गाण्यासाठी साठी डेमो रेकॉर्ड केला आणि तो मुकेशने गायला होता ; तथापि मुकेशने नकार दिला कारण त्याला वाटले की डेमो चांगला आहे आणि उधासला संधी दिली पाहिजे. हे गाणे मनहर उदास व लता मंगेशकर यांच्या आवाजात गायले गेले व अजरामर झाले. मुकेशमुळेच मनहर उदासला चांगले गीत गायला संधी मिळाली व या संधीचे मनहर उदासने सोने केले. 

          समीक्षकांच्या म्हणण्यानुसार सितारवादक रवी शंकर व अन्नपूर्णा देवी यांच्या वैवाहिक जीवनातील तणावावर हा चित्रपट आधारित आहे तर काहींच्या  म्हणण्यानुसार  गायक किशोर कुमार व त्यांची पहिली पत्नी रुमा घोष यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट भारताबरोबर श्रीलंकेमध्येसुद्धा सुपरहिट झाला तसेच कोलंबोमधील एम्पायर चित्रपटगृहात सलग ५९० दिवस दाखवला गेला.

कथानक --

               सुबीर कुमार (अमिताभ बच्चन) हा एक व्यावसायिक गायक आहे ज्याची कारकीर्द प्रतिभावंत असून वाढत आहे. तो लग्न करण्याचा विचार करत नाही - जोपर्यंत तो उमाला भेटत नाही, उमा(जया भादुरी)  एक गोड खेडेगावची मुलगी जी संगीताने प्रतिभावान आहे. सुबीर उमाच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो आपल्या नववधूला घेऊन मुंबईला परततो.  सुबीर एक गायक म्हणून आपली कारकीर्द चालू ठेवतो आणि उमाच्या गाण्याच्या कारकिर्दीला चालना देतो. तथापि, उमाची गायन कारकीर्द जोमाने भरभराटीस येऊ लागते व सुबीरची कारकीर्द गडगडते.

               अखेरीस, उमा  तिच्या पतीपेक्षा अधिक यशस्वी होते.  सुबीरकडून ईर्ष्या निर्माण होते. त्याचा अभिमान आणि मत्सर हे लग्न मोडून काढण्यास कारणीभूत ठरतात. सुबीरचा अहंकार वाढतो व तिचा द्वेष करू लागतो यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव उत्पन्न होतो. यानंतर दोघे वेगळे होतात. सुबीर आपल्या ईर्षेवर मात करू शकेल का हा प्रश्न पडतो. जेव्हा जोडपे वेगळे होतात आणि उमाचा गर्भपात होतो तेव्हा चित्रपट अतिशय संवेदनशील परिस्थितीत पोहोचतो. त्याच्या काकूंकडून जोरदार टीका झाल्यानंतर, ते पुन्हा भावनिक पुनर्मिलनमध्ये एकत्र येतात आणि ते एकत्र गातात.

               अमिताभ बच्चन व जया भादुरी यांनी उत्कृष्ठ काम केले. आपली जोडीदार आपल्या बरोबरीच्या कलाक्षेत्रात आपल्याला मागे टाकून पुढे जाते, प्रसिद्धी मिळवते तेव्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन आपल्याच जोडीदाराचा आपण तिरस्कार करू लागतो हे अमिताभने आपल्या अभिनयातून उत्कृष्ठपणे सादर केले आहे. जया भादुरीनेही अमिताभला उत्तम साथ दिली. दोघांच्या उत्कृष्ठ कलाकारीने हा चित्रपट सुंदर झाला व परत परत बघावासा वाटतो. सुंदर अभिनयामुळे जया भादुरीने फिलेफेअरचा 'बेस्ट एक्टरेस' (उत्कृष्ठ नायिका) हा किताब मिळवला.

 

 


                                     "लुटे कोई मन का नगर" सुपरहिट गाणे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक ...