Sunday, October 3, 2021

अवीट गोडीचे गाणे - देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा । उघड दार देवा आता उघड दार देवा ।।

 

अवीट गोडीचे गाणे - देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा । उघड दार देवा आता उघड दार देवा ।।

          हे गीत 'आम्ही जातो आमुच्या गावा' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६८ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट कमलाकर तोरणे यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात उमा भेंडे, श्रीकांत मोघे, सूर्यकांत मांढरे, धुमाळ, गणेश सोळंकी, मधू आपटे यांच्या मुख्य भुमिका आहेत. 

         हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे तसेच आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हे भक्तीगीत असून अजूनही ऐकायला गोड वाटते. 

       संताजी, धनजी आणि सयाजी (सूर्यकांत मांढरे, धुमाळ, गणेश सोळंकी) हे श्रीधर पंतच्या दारात येतात. ते पंतला समजावून सांगतात की ते प्रवासी आहेत आणि पंत त्यांना काही दिवस त्यांच्या घरी ठेवण्याची संधी देतात. एके रात्री संधी बघून तिघेजण श्रीधर पंतांची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या कानावर ह्या गीताचे बोल पडतात. तिथेच त्यांचे हात थबकतात व तिजोरी फोडण्याचा विचार सोडून देतात. जेव्हा तिघे तिजोरी फोडत असतात तेव्हा त्यांच्या मनात एक भीती असते कि एका सज्जन माणसाच्या घरी आपण चोरी करत आहोत म्हणून त्यांच्या हाताला कंप सुटतो म्हणजेच त्यांचे हात थरथर कापतात. जगदीश खेबूडकरांनी 'मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची, सरावल्या हातांनाही कंप का सुटावा' या ओळीतून सुंदर मांडले आहे. जगदीश खेबूडकरांनी हे भक्तिगीत उत्तम लिहिले आहे व सुधीर फडके यांनी आपल्या सुरेल आवाजात गावून अजरामर केले आहे. 

     

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा

उघड दार देवा आता उघड दार देवा ।। धृ ।।

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची

मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची

सरावल्या हातांनाही कंप का सुटावा ।। १ ।।

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप

ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप

दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा ।। २ ।।

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा ।। ३ ।।

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी 

मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी 

मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा ।। ४ ।।

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला 

बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला  

आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा ।। ५ ।।
 

 

Wednesday, September 15, 2021

अमर अकबर अँथोनी

 

 अमर अकबर अँथोनी 

           हा चित्रपट २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक मनमोहन देसाई आहेत. या चित्रपटाची कथा जीवनप्रभा देसाई यांनी लिहिली असून पटकथा प्रयागराज यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आहेत. ह्या चित्रपटातील गाणी मोहमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, मुकेश, महेंद्र कपूर, शैलेंद्र सिंग यांनी गायली आहेत. अमिताभने किशोर कुमार समवेत 'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' हे गाणे गायले आहे. 'अमर अकबर अँथोनी' हे टायटल सॉंग अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेले गाणे लोकप्रिय झाले. 

          अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, नीतू सिंग, परवीन बॉबी, शबाना आझमी, निरुपा रॉय, प्राण, जीवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

           या चित्रपटाची कहाणी तीन भावांवर आधारीत आहे. हे तीन भाऊ लहानपणी एकमेकांपासून वेगळे होतात व तीन धर्मांच्या परिवारातील लोक त्यांचा सांभाळ करतात. अमर (विनोद खन्ना) हिंदू धर्मात जातो व पोलीस इन्स्पेक्टर बनतो. अकबर (ऋषी कपूर) मुस्लिम धर्मात जातो व गायक बनतो. अँथोनी (अमिताभ बच्चन) ख्रिश्चन धर्मात जातो व देशी दारूच्या दुकानाचा मालक होतो.   हे तिघेही एका दिवशी रस्ता अपघातात जखमी झालेल्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी रक्त देतात. त्या तिघांना माहिती नाही की ती त्यांची आई भारती आहे, जी फूल विक्रेते म्हणून काम करते.

अकबर डॉक्टर सलमा अली ( नीतू सिंग ) च्या प्रेमात पडतो . पण त्याचे वडील तैयब अली यांना अकबर अजिबात आवडत नाही. पण एकदा घरात आग लागली की तो त्या लोकांना घराच्या आगीपासून वाचवतो आणि या घटनेपासून तो तिला आवडायला लागतो. अमर लक्ष्मी ( शबाना आझमी ) च्या प्रेमात पडतो , जो तिच्या सावत्र आईच्या अत्याचाराला बळी पडला आहे. अमर तिच्या सावत्र आईला, तिच्या आजीला अटक करतो आणि तिला पुन्हा घरी आणतो. लंडनहून भारतात आलेल्या जीनी ( परवीन बाबी ) च्या प्रेमात अँथनी पडतो .

            रॉबर्टने जेनीचे अपहरण केले, तर लक्ष्मीचा तिचा भाऊ रणजीतनेही अपहरण केले, जो रॉबर्टसाठी काम करतो.  अमर, अकबर आणि अँथनी हे तिघे मिळून वेषांतर करून सलमाबरोबर रॉबर्टच्या घरात  शिरले. सलमा जैनी आणि लक्ष्मीची सुटका करते. त्याच वेळी, तीन भाऊ रॉबर्ट आणि त्याच्या गुंडांची हत्या करतात आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतात. किशनलालला त्याच्या जुन्या गुन्ह्यांसाठी पुन्हा शिक्षा मिळते, पण तो भारतीला सांगतो की आता त्याची तीन मुले एक झाली आहेत आणि हेच महत्त्वाचे आहे. यासह कथा संपते.

अमिताभचा विनोदी सीन --

          अमिताभ बच्चन दारू पिऊन व बॉक्सिंग रिंगमध्ये मार खाऊन जखमी अवस्थेत आपल्या खोलीत येतो. आरशासमोर उभे राहतो आणि आरशातील आपल्याच प्रतिमेबरोबर बोलत राहतो व आरशातील प्रतिमेलाच अँथोनी समजून मलमपट्टी करतो. खरे तर हा दोन मिनिटाचा सीन पण अमिताभने केलेल्या विनोदी अदाकारीमुळे हा सीन कायम लक्षात राहणारा आहे व प्रेक्षकांना हसवत ठेवणारा आहे. 

 अँथोनी गोन्साल्विस पात्राची रंजक कथा --

          दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना अमिताभच्या पात्रासाठी पहिल्यांदा अँथोनी फर्नांडिस या नावाची योजना केली. मनमोहन देसाई यांनी आनंद बक्षींकडून 'माय नेम इज अँथोनी फर्नांडिस' हे गाणेही लिहून घेतले. देसाई यांनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना हे गीत ऐकवले परंतु त्यांना अँथोनी फर्नांडिस हे नाव काही रुचले नाही. प्यारेलाल यांनी प्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक अँथोनी गोन्साल्विस यांचे नाव देण्यास सुचविले व गाण्यात 'माय नेम इज अँथोनी फर्नांडिस' ऐवजी 'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' हा बदल करण्यास सांगितला. अशा तऱ्हेने अमिताभने साकारलेले अँथोनी गोन्साल्विस हे पात्र प्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक अँथोनी गोन्साल्विस यांचे नावावरून सुचले व प्रसिद्धही झाले. 

           'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' या गाण्यात अमिताभने विनोदी अभिनय केला आहे. हे गाणे अमिताभ व परवीन बॉबी यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे अमिताभने किशोर कुमार समवेत गाणे गायले आहे. 

विलक्षण योगायोग --

          चार प्रसिद्ध दिग्गज गायकांनी एकत्र येऊन चित्रपटासाठी गाणे गायचे म्हणजे विलक्षण योगायोगच म्हणायला हवा व हा विलक्षण योगायोग जुळून आला तो या चित्रपटातील 'हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे' या गाण्याच्या वेळेस. मोहमद रफी, मुकेश, किशोर कुमार व लता मंगेशकर ह्या चार नावाजलेल्या गायकांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्यांदाच एकत्रितपणे  येऊन हे गीत गायले. ह्या गाण्यामध्ये मोहमद रफी ऋषी कपूरसाठी, मुकेश विनोद खन्नासाठी, किशोर कुमार अमिताभ बच्चनसाठी गायले तर लता मंगेशकर शबाना आझमी, नितु सिंग, परवीन बॉबी यांच्यासाठी गायल्या. 

          अमिताभ बच्चनला उत्कृष्ठ अभिनयामुळे फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'बेस्ट ऍक्टर' चा पुरस्कार मिळाला.

         

 









 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, July 23, 2021

आषाढी एकादशी -- आनंद व भक्तिमय सोहळा (सांगली सकाळला आलेला लेख)

  

आषाढी एकादशी -- आनंद व भक्तिमय सोहळा

          एका महिन्यात दोन एकादशी असतात. त्यात सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी व कार्तिकी एकादशी. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन हि देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रातीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होते म्हणजेच देवांची रात्र सुरु होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी म्हणतात. 

          आषाढी एकादशीला असंख्य भक्तजन विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला जात असतात व विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरात भक्तजनांचा मेळाच भरलेला असतो. या दिवशी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज व इतर संतांच्या पालख्या व त्यांच्या बरोबर आलेल्या वारकऱ्यांच्या दिंडया पंढरपुरात दाखल होतात. सगळीकडे टाळ, मृदूंगाच्या निनादात विठूनामाचा गजर चालू असतो. विठ्ठलाच्या दर्शनामुळे सर्व भक्तजन पंढरपूरच्या वाळवंटात आनंदाने नाचत असतात, विठूनामाच्या गजरात डोलत असतात. " अवघे गरजे पंढरपूर, चालला विठूनामाचा गजर" या उक्तीनुसार संपूर्ण पंढरपूर विठूनामाच्या गजराने भरून गेलेले असते तसेच भक्तीमय वातावरणाने भारावून गेलेले असते. पंढरपूरनगरी भक्तीरसाने न्हाहून निघालेली असते. पंढरपुरात या दिवशी आनंद, चैतन्यदायी सोहळाच भरलेला असतो. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात एकादशीचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, "आज आहे एकादशी । चला जाऊ पंढरीसी ।। १ ।।  चंद्रभागे करुनि स्नान । घेऊ देवाचे दर्शन ।। २ ।। वाळवंटी झाली दाटी । संत महंत होतील भेटी ।। ३ ।। तुका म्हणे पंढरपूर । साधू  संतांचे माहेर ।। ४ ।।

          एकादशी व्रत हे पवित्र, निर्मळ आहे. या दिवशी उपवास करावा. विठ्ठलाचे चिंतन करावे, नामस्मरण करावे, भजन-कीर्तन गावे. हरीकथा वाचावी. ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज गाथा, एकनाथी भागवत असे ग्रंथ वाचावेत. एकादशी व्रत कसे करावे हे पुढील अभंगात सांगितले आहे, "एकादशी, एकादशी । जया छंद अहर्निशी ।। १ ।। व्रत करी जो नेमाने । तया वैकुंठीचे येणे ।। २ ।। नामस्मरण, जाग्रण । वाचे गाये नारायण ।। ३ ।। तोचि भक्त सत्य याचा । एक जनार्दन म्हणे वाचा ।। ४ ।।" पुढील अभंगात असे म्हणले आहे कि, "पवित्र व्रत एकादशी । करा रे उपवासी ।। १ ।। करा रे हरीचे चिंतन । वाचे गावे हरीचे भजन ।। २ ।। चला जावू पंढरीला । विठू माऊलीच्या दर्शनाला ।। ३ ।। घेऊ विठुरायाचे दर्शन । स्वच्छ, निर्मळ होईल मन ।। ४ ।।

          एकादशी व्रत हे फलप्राप्ती करून देणारे व्रत आहे. हे व्रत केल्याने अंतर्मन व बाह्यमन शुध्द, निर्मळ होते. मोह, माया, मत्सर, क्रोध, लोभ, अहंकार या दुर्गुणांपासून मन बाजूला होते व विठ्ठलाशी एकरूप होते. विठ्ठल हे विष्णूचे रूप असल्याने विठ्ठलामार्फत विष्णूपाशी जायला मिळते हा आषाढी एकादशी करण्याचा मोठा फायदा आहे. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात कि, "ज्यासी घडे एकादशी । जाणे लागे विष्णूपाशी ।। तुका म्हणे पुण्यराशी । तोचि करी एकादशी ।।" म्हणजेच जो एकादशी करतो त्याच्या जवळ विठ्ठलाच्या रूपात पुण्याच्या राशी ओतल्या जातात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Thursday, July 22, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आज आहे एकादशी ।



तुकाराम महाराज गाथा -- अभंग - आज आहे एकादशी ।

आज आहे एकादशी । चला जाऊ पंढरीसी ।। १ ।।

चंद्रभागे करुनि स्नान । घेऊ देवाचे दर्शन ।। २ ।।

     वाळवंटी झाली दाटी । संत महंत होतील भेटी ।। ३ ।।

तुका म्हणे पंढरपूर । साधु संतांचे माहेर ।। ४ ।।

ओवी : आज आहे एकादशी । चला जाऊ पंढरीसी ।। १ ।। चंद्रभागे करुनि स्नान । घेऊ देवाचे दर्शन ।। २ ।।

अर्थ : आज एकादशी आहे त्यानिमित्ताने पंढरीला जाऊ. चंद्रभागेमध्ये स्नान करून देवाचे दर्शन घेऊ. 

भावार्थ : पंढरपुरात विठ्ठलाचे वास्तव्य आहे. तिथे विठोबा आपल्या भक्तांची वाट बघत विटेवर उभा आहे. कधी एकदा आपल्या भक्तांना डोळे भरून पाहतो असे विठ्ठलाला झाले आहे. तर भक्तांनाही विठ्ठलभेटीची आस लागलेली आहे. म्हणूनच भक्त लांबलांबहून चालत येवून एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. एकादशी हा पवित्र दिवस आहे. जो कोणी या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेईल त्याला विठ्ठल सुखीसमाधानी ठेवतो. त्याच्या अडीअडचणी दूर करतो. म्हणूनच असंख्य भाविक विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात गर्दी करतात. तुकाराम महाराजही एकादशीच्या दिवशी पंढरपुरात जावून विठ्ठलाचे दर्शन घेत होते. विठ्ठलाचे दर्शन झाल्याने त्यांना सुख प्राप्त होत होते. मन समाधानी, आनंदी होत होते. म्हणूनच ते म्हणतात कि, "आज एकादशी आहे त्यानिमित्ताने पंढरीला जाऊ. चंद्रभागेमध्ये स्नान करून देवाचे (विठ्ठलाचे) दर्शन घेऊ."

 ओवी : वाळवंटी झाली दाटी । संत महंत होतील भेटी ।। ३ ।। तुका म्हणे पंढरपूर । साधु संतांचे माहेर ।। ४ ।।

अर्थ : भाविकांची वाळवंटी दाटी झाली आहे. संत महंतांचीही भेट होईल. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे साधु संतांचे माहेर आहे. 

भावार्थ : एकादशीच्या दिवशी असंख्य भाविक पंढरपुरात आले आहेत व त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. हे भाविक विठ्ठलाचे दर्शन मिळाल्याने वाळवंटात आनंदाने नाचत आहेत. तर काही वैष्णव टाळ-मृदूंगाच्या साथीत डोलत आहेत. सर्व वैष्णवांनी वाळवंटात एकच दाटी केली आहे व मुखाने हरीनामाचा गजर करीत आहेत. संपूर्ण वाळवंट हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. प्रत्येक भाविक विठ्ठलमय झाला आहे व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. वाळवंट वैष्णवांच्या भक्तीरसाने फुलून गेले आहे. 

          या दिवशी संत महंतही विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेले आहेत. त्यांचे येण्याने पंढरपूर नगरी पावन झाली आहे. पंढरपुरात आल्यावर त्यांचीही भेट होईल. त्यांचा सहवास घडल्याने व त्यांचे उपदेशपर बोल ऐकल्याने मनाला समाधान प्राप्त होईल. त्यांच्यात देवाचा अंश असल्याने त्यांची भेट झाली म्हणजेच देवाची भेट झाल्यासारखेच आहे व त्यांची भेट होणे म्हणजे पुण्य कमावण्यासारखेच आहे. म्हणूनच एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन मिळणे व संत महंतांची भेट घडणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "एकादशीच्या दिवशी पंढरपुरात गेल्यावर विठ्ठलाबरोबरच संत महंतांचीही भेट होईल."

         जेव्हा मुलगी सासरहून माहेराला येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तिला तिचे आई-वडील, भाऊ, नातेवाईक भेटणार असतात. तसेच साधुसंतही विठ्ठलाला भेटणार असतात. म्हणूनच त्यांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. विठ्ठल त्यांची माउली आहे. माऊली आपल्या मुलांचा सांभाळ करते तसेच विठ्ठलही माऊली बनून साधुसंतांचा सांभाळ करतो. साधुसंतही विठ्ठलापुढे लहान मुलाप्रमाणे हट्ट करतात. मुलीला माहेरी आल्यावर आई-वडील भेटल्यावर जे सुख प्राप्त होते तसे सुख साधुसंतांना पंढरपुरात आल्यावर व विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर प्राप्त होते. साधुसंतांना पंढरपुरात जे सुख अनुभवता येते ते सुख त्यांना कुठेही अनुभवता येत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "पंढरपूर हे साधुसंतांचे माहेर आहे."

                                                                        

























 

 



Sunday, June 13, 2021

अवीट गोडीचे गाणे -- कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

 अवीट गोडीचे गाणे -- कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

          "कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम" हे भक्तीगीत देव पावला या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला. हे गाणे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले असून माणिक वर्मा यांनी गायले आहे. पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गीत सुलोचना यांचेवर चित्रित झालेले आहे. 

          या गीतात देव आणि भक्त यांचे नाते सांगितले आहे. देव आपल्या भाबडया भक्तासाठी काहीही काम करायला तयार असतो. देव फक्त भक्ताची भाबडी भक्ती बघतो. या गीतातसुद्धा राम आपला भाबडा भक्त कबीर याला शेले विणायला मदत करत असतो. कबीराला हे माहीतच नसते. तो आपला रामनामात दंग असतो. कबीर रामनामाचे गीत गात असतो तर इकडे कौसल्येचा राम एकेक धागा गुंतत जातो. शेवटी रघुनंदन सर्व शेला विणून पूर्ण करतो व गुप्त होतो. कबीर जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला दिसते कि सर्व शेला रघुवीरने विणला आहे. कबीर धन्य होतो व रामाला वंदन करतो. 

          हे भक्तीगीत कानांना ऐकायला किती गोड वाटते. हे गाणे ऐकले कि मनात भक्तीभाव जागृत होतो व आपोआप डोळ्यासमोर राम उभा राहतो व रामाला हात जोडले जातात.  ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या ह्या अवीट गोडीच्या गाण्याचे माणिक वर्मा यांनी आपल्या सुरेल आवाजात गावून सोने केले आहे. 

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ
राजा घनश्याम

दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
गुप्त होई राम

हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम  


 

Saturday, June 12, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।।

 तुकाराम महाराज गाथा 

 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।।

 भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।। १ ।।

शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ।। २ ।।

देवाविण भक्ता । कोण देतां निष्कामता ।। ३ ।।

तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ।। ४ ।।

ओवी : भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।। १ ।। शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ।। २ ।।

अर्थ : भक्ताखेरीज देवाला साकारत्व कसे येईल व भक्तावाचून त्याची सेवा तरी कोणी करील ? जसे सोन्याची आंगठी आणि त्यातील हिऱ्याचे कोंदण हि एकमेकांच्या योगाने सुशोभित आहेत, तसे देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत. 

भावार्थ : या अभंगात तुकाराम महाराजांनी देव आणि भक्ताचे नाते सांगितले आहे. भक्ताने जर देवाची अंतःकरणापासून भक्ती केली, त्याची सेवा केली तरच त्याला देवपण (साकारत्व) येईल, नाहीतर देव म्हणजे नुसता दगड होऊन बसेल. आपण दगडालाही देव मानतो, त्याची पुजाअर्चा करतो म्हणूनच दगडातही देव साकारतो व त्या दगडाचीही सेवा केली जाते. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात कि, भक्ताखेरीज देवाला साकारत्व (देवपण) येणार नाही व भक्तच त्याची सेवा करेल. देव आणि भक्त दोघेही एकच आहे. देवाला भक्ताने केलेली भक्ती, सेवा मनापासून आवडते व भक्ताला देवाची भक्ती करायला, त्याचे नामःस्मरण घ्यायला मनापासून आवडते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा हि संतमंडळी पांडुरंगाचे सतत नामःस्मरण घ्यायचे. त्याच्या भक्तीतच रंगून जायचे. त्यांना सगळीकडे पांडुरंग दिसायचा. त्यांच्या हृदयातच पांडुरंग होता. एवढी त्यांची पांडुरंगावर दृढ श्रद्धा, भक्ती होती. पांडुरंगसुद्धा त्यांना संकटात मदत करायचा. त्यांच्या हाकेला ओ द्यायचा. संत तुकाराम महाराजांनीही पांडुरंगाची भक्ती, सेवा केली. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत आणि यासाठी त्यांनी सोन्याची आंगठी आणि हिऱ्याचे उदाहरण दिले आहे. जसे सोन्याची आंगठी व त्यात बसविलेला हिरा यामुळे दोघांनाही शोभा येते तसेच देव आणि भक्त हे परस्परांच्या योगामुळे शोभिवंत होतात. 

 ओवी : देवाविण भक्ता । कोण देतां निष्कामता ।। ३ ।। तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ।। ४ ।।

अर्थ : देवाखेरीज भक्ताला निष्कामपद देणारा कोण आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, जसा मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध आहे. ह्या दृष्टांताचा संबंध ध्रुव पदाशी आहे. 

भावार्थ : भक्ताने देवाची अंतःकरणापासून व निस्वार्थभावनेने भक्ती, सेवा केल्यावर देव त्याला अशा ठिकाणी नेवून बसवतो कि तेथे मोह, माया, मत्सर, क्रोध, अहंकार, वासना या अवगुणांना थारा नाही. हे निष्कामपद म्हणजेच निरपेक्ष, निरासक्त, निर्मोही, वासनारहित पद देवाशिवाय भक्ताला कोणी देऊ शकत नाही. देव आणि भक्तात एवढे पवित्र नाते निर्माण झालेले असते कि, देवाला आपल्या भक्ताबाबत वात्सल्य, माया निर्माण झालेली असते. थोडक्यात देव भक्ताची माऊली झालेली असते. भक्त व देव यांचे नाते आई आणि मुलगा या पवित्र नात्यापेक्षाही उच्चं कोटीचे नाते निर्माण झालेले असते व या नात्याचा संबंध ध्रुव पदापर्यंत म्हणजेच अढळ स्थानापर्यंत पोचतो. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 












 

Friday, June 11, 2021

क्रिकेटचा कर्नल -- दिलीप वेंगसरकर

 क्रिकेटचा कर्नल -- दिलीप वेंगसरकर 

          ७ जून १९८६ रोजी म्हणजे बरोबर ३५ वर्षांपूर्वी लॉर्डसच्या मैदानावर एक इतिहास घडला तो म्हणजे लागोपाठ तीन शतके ठोकण्याचा विक्रम. हा विक्रम रचणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणजे दिलीप वेंगसरकर. 

          ३५ वर्षांपूर्वीचा काळ कसोटी क्रिकेटचा काळ होता. तेव्हा तंत्रशुद्ध व कलात्मक खेळाला महत्व होतं. जे फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजी करायचे त्यांना क्रिकेट जगतात आदर दिला जायचा. सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ हे आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने क्रिकेट जगतात मानाचे स्थान पटकावून बसले होते. या यादीत आणखी एका खेळाडूचे नाव घेता येईल ते म्हणजे दिलीप बळवंत वेंगसरकर उर्फ 'कर्नल वेंगसरकर'. मुंबईचा हा उंचपुरा खेळाडू आपल्या कलात्मक व फलंदाजीतील नजाकतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचा. तो फलंदाजीला आला कि प्रेक्षकांना एक बहारदार खेळ पाहायला मिळायचा. त्याच्या खेळीत स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राइव्ह, हुक, पूल या सर्व फटक्यांचा समावेश असायचा. स्क्वेअर कटवर तर त्याची हुकूमत असायची. या फटक्याने चेंडू कधी सीमापार व्हायचा ते क्षेत्ररक्षकाला देखील कळायचे नाही. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. दडपणाखाली तर त्याचा खेळ आणखी बहरायचा. मितभाषी, कुठल्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकणारा व प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. 

          दिलीप वेंगसरकारने ७ जून १९८६ रोजी म्हणजे बरोबर ३५ वर्षांपूर्वी एक इतिहास घडवला तो म्हणजे लॉर्डसवर लागोपाठ तीन शतके ठोकण्याचा विक्रम. या आधीही त्याने १९७९ आणि १९८२ साली शतके ठोकली होती. इंग्लंडमधील लॉर्डसला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. या मैदानावर शतक ठोकण्याचे प्रत्येक खळाडूंचे स्वप्न असते. बिनीचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग यांना अजूनही हि कामगिरी करता आलेली नाही. परंतु वेंगसरकरने तब्बल तीन वेळा शतक झळकावून हा इतिहास रचला आहे. अशी दैदिप्यमान कामगिरी करणारा पहिला भारतीय व आशियायी खेळाडू म्हणून त्याचा मान आहे. तर जगातील अशी कामगिरी करणारा तो सहावा खेळाडू आहे. याआधी सर जॅक हॉब्स, सर लेन हटन, डेनिस कॉम्प्टन, जॉन एड्रीच आणि जेफ्री बॉयकॉट यांनी लॉर्डसवर तीन शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. हे सर्व महान फलंदाज होते आणि यांच्या पंक्तीत दिलीप वेंगसरकर बसला आहे. यावरूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते व या गुणवत्तेमुळेच त्याच्या तीन शतकांचा समावेश विस्डेनच्या यादीत करण्यात आला आहे. 

          त्याच्या या लॉर्ड्सवरील खेळीने सामन्याला महत्व प्राप्त झाले होते. या खेळीत त्याने नाबाद १२६ धावा झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. त्याची हि खेळी संपूर्ण तंत्रशुद्ध व कलात्मक होती. या त्याच्या खेळीमुळेच त्याला कर्नल हि पदवी देण्यात आली व त्याचा गौरव केला गेला. त्याची हि खेळी पाहणारे खरोखरच भाग्यवान होते. 














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...